मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वृक्षमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री तुलसी गौडा (tulsi gawda) यांचे सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील राहत्या घरी निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी लाखो झाडे लावली आणि त्या झाडांचे संगोपन देखील केले.
तुलसी गौडा यांचा जन्म १९४४ मध्ये होन्नल्ली गावात नारायण आणि नीली यांच्या पोटी झाला. त्या हलक्की आदिवासी समुदायातील होत्या. त्यांचे नाव तुळशी या पवित्र वनस्पतीवरून ठेवण्यात आले. जंगलात वाढलेल्या तुलसी यांना वयाच्या १२ व्या वर्षी निसर्गाशी, विशेषतः वनस्पती आणि झाडांविषयी ममत्व निर्माण झाले. म्हणूनच त्यांनी वृक्षरोपनाची सुरुवात केली. त्यामाध्यमातून जंगल उभे केले. जंगलात वाढणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे त्यांना सखोल ज्ञान होते. म्हणून लोक त्यांना 'जंगलांचा विश्वकोश' म्हणून संबोधत असत. ३०० हून अधिक देशी वनस्पती आणि झाडांविषयीची सखोल माहिती त्यांनी आत्मसात करुन घेतली होती. त्या दरवर्षी ३० हजाराहून अधिक रोपे लावत आणि त्यांचे संगोपन करत असत. तरुण वयातच त्यांच्या पतीचे निधन झाले. म्हणून दोन मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्या वन विभागात रोजंदारी कामगार म्हणून रुजू झाल्या. तिथे काम करत असताना, त्यांनी वनस्पतींचे संगोपन आणि काळजी घेणे सुरू ठेवले आणि विभागाकडून पगाराची अपेक्षा न करता वनीकरणाच्या कार्याला एक सेवा म्हणून समर्पित केले.
त्यांच्या योगदानाची दखल घेऊन धारवाड कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले. तसेच केंद्र सरकारने २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलसी गौडा यांच्या निधनामुळे दुख: झाल्याची भावना व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले, " त्यांनी आपले जीवन निसर्गाचे संगोपन केले. हजारो रोपे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्या पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शक राहतील. त्यांचे कार्य आपल्या ग्रहाचे संरक्षण करण्यासाठी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील."