"...त्यांचा राज्यपालपदासाठी विचार केला जाऊ शकतो""; भुजबळांच्या नाराजीनंतर भाजप आमदाराचा मोठा दावा
17 Dec 2024 14:27:57
नागपूर : (MLA Ashish Deshmukh) महायुती सरकारच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळातून डावलले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याने पुढे ते नेमकी काय भूमिका घेणार, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळ यांना नेहमीप्रमाणे यंदाही मंत्रीपद मिळणार, याबद्दल अनेकांना खात्री होती. मात्र रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी ९ मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ यांचे नाव नसल्याने साऱ्यांनाच धक्का बसला. त्यांच्यासारखे ताकदवान ओबीसी नेतृत्व मंत्रिमंडळातून का वगळण्यात आले, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याबाबत भाजप आमदाराने मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले आशिष देशमुख?
छगन भुजबळ हे जर नाराज असतील तर त्यांनी सरकारपासून नाराज राहण्याचे काही कारण नसल्याचे भाजप नेते आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षांनी त्यांचा कायमच मानसन्मान केला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत त्यांचा १९८५ पासून मोलाचे योगदान आहे. आणि नक्कीच त्यांच्या पक्षाने मंत्रीपदापेक्षा काही मोठा विचार केला असेल . त्यांचं तसं नियोजन असेल मला माहित नाही, मी भाजपचा आहे. पण अजित पवारांच्या माध्यमातून छगन भुजबळांना मानाचं स्थान हे न्ककीच देण्याच काही नियोजन असेल ते या देशाच्या कोणा ना कोणा राज्याचे राज्यपाल बनणार असतील त्यांत योगदान पाहता त्यांच्या पक्षाने त्यांना कुठेतरी मोठ्या जागी मानसन्मान द्यावा. छगन भुजबळ यांचं मोठं योगदान आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छगन भुजबळ यांचं योग्य पुनर्वसन करेल, असे आशिष देशमुख म्हणाले.
देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे. ४ दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषविलेले आणि राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा असलेले छगन भुजबळ राज्यपाल पद स्वीकारतील का? हाच मोठा प्रश्न आहे. यावर आता छगन भुजबळांची काय प्रतिक्रिया असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.