मुंबई, दि.१७: प्रतिनिधी आपल्या २५०व्या वर्धापनदिनानिमित्त, माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड(MDL)ने दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी माझडॉक मुंबई १०K चॅलेंजच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुंबईकरांनी सहभाग नोंदविला. या आयोजनातून एमडीएलच्या जहाजबांधणीतील २५० वर्षांच्या उत्कृष्टतेवर प्रकाश टाकण्यासोबतच नावीन्य, गुणवत्ता आणि राष्ट्रीय विकासासाठी कंपनीची सतत असलेली वचनबद्धता दर्शविण्यात आला.
या मॅरेथॉनला प्रसिद्ध स्पोर्ट्स आयकॉन्स मोनालिसा बरुआ मेहता, डायना एडुलजी, ललिता बाबर आणि अमन चौधरी यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. या कार्यक्रमाला एमडीएलचे वरिष्ठ अधिकारी संजीव सिंघल (सीएमडी), बिजू जॉर्ज (संचालक, जहाजबांधणी), सीडीआर यांच्यासह उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी कंपनीच्या २५० वर्षांच्या वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला आणि प्रतिष्ठित नवरत्न दर्जा मिळविणारे पहिले शिपयार्ड म्हणून एमडीएलचे वेगळेपण अधोरेखित केले. मॅरेथॉन केवळ जहाजबांधणीमध्ये एमडीएलच्या उत्कृष्टतेचा वारसा साजरी करत नाही तर समाजात आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या संस्कृतीला प्रोत्साहन देते यावर त्यांनी भर दिला. माझगाव मॅरेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीत 10K चॅलेंज आणि 3K फन रन या दोन शर्यती श्रेणींमध्ये सहा हजाराहून अधिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी विजेत्यांना ५.५ लाख रकमेची बक्षिसे देण्यात आली.
माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड विषयी
माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड, मुंबई हे भारतातील अग्रगण्य शिप बिल्डिंग यार्डांपैकी एक आहे. माझगाव डॉकचा इतिहास १७७४चा आहे, जेव्हा माझगाव मध्ये एक लहान ड्राय डॉक बांधण्यात आला होता. गेल्या काही वर्षांमध्ये, एमडीएलने दर्जेदार कामासाठी नावलौकिक मिळवला आहे आणि सामान्यत: शिपिंग जगतात आणि भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी कुशल आणि संसाधनपूर्ण सेवेची परंपरा स्थापन केली. माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेडने २८ युद्धनौकांसह एकूण ८०२ जहाजे तयार केली आहेत, ज्यात प्रगत विनाशकांपासून ते क्षेपणास्त्र नौका आणि ७ पाणबुड्यांचा समावेश आहे. भारतातील तसेच परदेशातील विविध ग्राहकांसाठी मालवाहू जहाजे, प्रवासी जहाजे, पुरवठा जहाजे, बहुउद्देशीय समर्थन जहाज, पाण्याचे टँकर, टग्स, ड्रेजर, फिशिंग ट्रॉलर, बार्ज आणि बॉर्डर आउट पोस्ट देखील वितरित केल्या होत्या.