कुर्ल्यातील अतिक्रमणे हटवा अन्यथा उपोषण...

17 Dec 2024 12:43:19

kurla

मुंबई, दि.१७: प्रतिनिधी 
कुर्ल्यात बेस्ट बस अपघातानंतरही मुंबई महानगरपालिकेडून अतिक्रमणे हटविण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होतो आहे. कुर्ला (प) स्थानक ते स.गो. बर्वे मार्ग- रॉयल हॉटेल पर्यंत तसेच कुर्ला (प)हॅप्पी होम ते श्रीकृष्ण चौक आणि सेंट जोसेफ हायस्कुल ते मार्केट पर्यंतचे सर्व फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने कायमस्वरुपी हटविणेबाबत भाजप जिल्हा सचिव व्यंकट बोद्दुल यांनी मुंबई महानगरपालिका एस विभाग आणि कुर्ला वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे. तसेच ही अतिक्रमणे न हटविल्यास शुक्रवार, दि.२० रोजी महापालिका कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, दि. ०९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला (प) मध्ये झालेला दिवस हा खुप भयावह असुन कुर्ल्यासाठी काळा दिवस ठरलेला आहे. बस चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे निष्पाप लोक जीवास मुकले व ३० लोक गंभीर जखमी झाले. ज्या लोकांना बसने उडवले ते लोक रस्त्यावरुन छाळत होते. कारण, कुर्ला (प) स्थानक ते स.गो. बर्वे मार्ग - रॉयल हॉटेल पर्यंत तसेच कुर्ला (प) हॅप्पी होम ते श्रीकृष्ण चौक आणि सेंट जोसेफ हायस्कुल ते मार्केट पर्यंतचे सर्व फुटपाथवर फेरीवाल्यांनी, दुकानदारांनी अतिक्रमण करुन हे फुटपाथ काबीज केले आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागत आहे.

हे फुटपाथ अतिक्रमीत नसते तर आज एवढी जिवीत हानी झाली नसती. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशी कोणतीही दुर्घटना घडू नये याकरीता आपण सदर घटनेची गंभीर दखल घेऊन कुर्ला (प) स्थानक ते स.गो. बर्वे मार्ग - रॉयल हॉटेल पर्यंत तसेच कुर्ला (प) हॅप्पी होम ते श्रीकृष्ण चौक आणि सेंट जोसेफ हायस्कुल ते मार्केट पर्यंतचे सर्व फुटपाथवरील अतिक्रमण येत्या दोन ते तीन दिवसात तातडीने कायमस्वरुपी हटविण्यात यावे अन्यथा आम्ही दि. २० डिसेंबर रोजी एल विभाग कार्यालयाच्या गेटसमोर उपोषणास बसणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हा सचिव व्यंकट बोद्दुल यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0