संस्कार भारती, पश्चिम प्रांताचा 'श्रीमंतयोगी २०२५' दैनंदिनी प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला

    17-Dec-2024
Total Views |
 
image
 
पुणे : तुम्ही चित्रपटातून काय दाखवता, याचे पडसाद जगभरात उमटतात. आज ओटीटी सारख्या माध्यमाद्वारे सर्व जग एकत्र येवून एकाच पाटावर बसते, तेव्हा तुमचा देश, इतिहास, भाषा हे चित्रपटातून जगाला कळते. आपली मूळ ओळख काय आहे, हे समाजासमोर दाखविण्यासाठी चित्रपट, नाटक, सिनेमांतून आणि रोजच्या चर्चांमधून देखील ती ओळख दिसली पाहिजे. त्यामुळे नाटक आणि सिनेमा करताना भान बाळगून करणे गरजेचे आहे. ते संस्कारांचे मोठे माध्यम आहे असे प्रतिपादन चित्रपट निर्माते प्रविण तरडे यांनी संस्कार भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या 'श्रीमंतयोगी २०२५' दैनंदिनी प्रकाशन सोहळ्यात केले. हा सोहळा रविवार १५ डिसेंबर रोजी भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्कार भारती अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री सतिश कुलकर्णी , पश्चिम प्रांत अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे व पश्चिम प्रांत महामंत्री श्री. प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. मूर्ती शास्त्राचे अभ्यासक डॉ.गो.बं. देगलूरकर यांनी यावेळी संदेश पत्रातून शुभेच्छा दिल्या.
 
प्रास्ताविक करताना श्री. सतिश कुलकर्णी म्हणाले “ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासामध्ये, कारकिर्दीमध्ये महाराज कोणत्या दिवशी कोणत्या मोहिमेवर होते त्या दिवशी कोणता विशेष प्रसंग घडला, कोणता पराक्रम गाजविला पराक्रम गाजविला हे त्या त्या दिवशी त्या तारखेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी या दैनंदिनीत त्या प्रत्येक दिवसाच्या विशेष नोंदी केल्या आहेत. आज इतिहासाची इतकी मोडतोड करून ठेवली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस नक्की तारखेप्रमाणे साजरा करायचा की तिथीप्रमाणे, असा प्रश्न पडतो. प्रत्येकाची इतिहासाबद्दल आपापली अशी वेगळी भूमिका आहे अशा संवेदनशील विषयावर काम करायचे म्हणजे तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहेच. जास्तीत जास्त अचूक नोंदी वाचकांपर्यंत जाव्यात हा प्रयत्न या दैनंदिनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.”
 
प्रांत सहमहामंत्री श्री. विनायक माने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रांत महामंत्री श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.