तृणमूल काँग्रेसचा नेता हकीम याचे आगलावे वक्तव्य!

16 Dec 2024 21:12:07
 
 
Trinamool Congress leader Hakeem
 
 
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका संपण्याची चिन्हे नाहीत. आधी बंगालमध्ये बाबरीसारखी मशीद उभारु, असे वक्तव्य तृणमूलच्या आमदाराने केल्यानंतर, आता कोलकाताच्या महापौरांनी अल्लाच्या कृपेने भविष्यात आपण बहुसंख्याक होईल, अशा आशयाचे विधान केले. पण, यावर लांगूलचालनातून मतपेढीचे राजकारण करणार्‍या ममतादीदींनी सोयीस्कर मौन धारण केले आहे.
 
प. बंगाल हे बांगलादेशला लागून असलेले राज्य. बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुस्लीम प. बंगालसह देशाच्या विविध भागात पसरले आहेत. त्यातील अनेकांनी आपले लहान-मोठे धंदेही सुरु केले आहेत. अन्य देशातून होत असलेली मुस्लीम लोकांची घुसखोरी ही आज ना उद्या भारताची मोठी डोकेदुखी ठरणार आहे. असे असतानाच, भारतातील काही मुस्लीम नेत्यांची जहाल, स्फोटक वक्तव्ये लक्षात घेता मुस्लीम नेते कशाप्रकारे विचार करीत आहेत, याची कल्पना त्यावरून यावी. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे एक नेते, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि कोलकाताचे महापौर असलेले फिरहद हकीम या नेत्याने केलेल्या अत्यंत स्फोटक वक्तव्याने सर्वत्र एकच प्रतिक्रिया उमटली आहे. तृणमूल नेता फिरहद हकीम याने एका कार्यक्रमात बोलताना,“अल्लाच्या कृपेने आम्ही एक न एक दिवस बहुमतात येऊ,” असे वक्तव्य केले आहे. मेणबत्ती मोर्चे काढण्यासारख्या प्रकारांचा आधार घेऊन मुस्लीम समाजास आता न्याय मागण्याची आवश्यकता नाही. अल्लाच्या कृपेने आगामी काळात मुस्लीम बहुमतात येतील, असे या नेत्याने म्हटले आहे.
 
कोलकाता येथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना या नेत्याने काही आकडेवारी प्रस्तुत केली. तृणमूल काँग्रेसचा हा नेता म्हणतो की, “प. बंगालमध्ये आपली (मुस्लीम समाजाची) लोकसंख्या ३३ टक्के आहे आणि संपूर्ण भारतात ती १७ टक्के आहे. त्यामुळे सध्या आपल्याला अल्पसंख्याक गणले जाते. पण, भविष्यात अल्लाच्या कृपेने आपण अल्पसंख्याक राहणार नाही. आपण बहुमतात येऊ. त्यामुळे न्याय मागण्यासाठी मेणबत्ती मोर्चे काढत बसावे लागणार नाही, तर न्यायाची मागणी न करताच आपोआप न्याय मिळवण्याच्या स्थितीत आपण असू.”
 
तृणमूल काँग्रेसचा नेता हकीम याने अशाप्रकारचे वक्तव्य प्रथमच केले असे नाही. यापूर्वी जुलै २०२४ साली, ज्यांनी इस्लाममध्ये जन्म घेतला नाही, ते दुर्दैवी आहेत, अशा आशयाचे वक्तव्य हकीमने केले होते. ‘अखिल भारतीय कुराण स्पर्धे’मध्ये त्याने हे वक्तव्य केले होते. “जे इस्लाममध्ये जन्मले नाहीत, त्यांना आपण इस्लाममध्ये आणले पाहिजे. आपण तसे केले, तर अल्लाला आनंद होईल,” असे हकीम याने त्या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. फिरहाद हकीम याच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हकीम याचे वक्तव्य पाहता, “भावी काळात मुस्लीम समाजास शांततापूर्ण मोर्चे काढण्याची आवश्यकता भासणार नाही, तर ते स्वत:च कायदा आपल्या हाती घेतील,” असे मालवीय यांनी म्हटले आहे. हकीम या नेत्याचे वक्तव्य अत्यंत चिंताजनक आहे, असे सांगून कोलकाता शहरातील झोपडपट्टी आणि अन्य भागात बेकायदेशीर घुसखोरांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये रोहिंग्या मुस्लिमांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, याकडे अमित मालवीय यांनी लक्ष वेधले.
 
फिरहद हकीम हा प. बंगाल सरकारमध्ये मंत्री आहे आणि तो कोलकाता शहराचा महापौरही आहे. घटनात्मक पदे भूषवित असलेली व्यक्ती अशी वक्तव्ये कशी काय करू शकते? अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करीत असलेल्या त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आशीर्वादाशिवाय हकीम असे वक्तव्य करणे शक्य नाही! प. बंगाल मंत्रिमंडळातील एक मुस्लीम मंत्री अशी स्फोटक वक्तव्ये करीत असल्याचे लक्षात घेता, मुस्लीम समाजास त्यांचे नेते कोणत्या दिशेने नेऊ पाहत आहेत याची कल्पना यावी. मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमनचा नेता अकबरुद्दिन ओवेसी याने २०२३ साली, “पोलिसांना १५ मिनिटांसाठी दूर ठेवा. मग, आम्ही कोण आहोत ते त्यांना दाखवून देऊ,” असे भडक वक्तव्य केले होते. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. प. बंगालच्या एका मंत्र्याचे ताजे वक्तव्य असे स्फोटक मानावे लागेल. हिंदू समाजाने अशा वक्तव्यावरून आवश्यक तो बोध तातडीने घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
बांगलादेश : हिंदू विद्यार्थ्यांकडून गीतापाठ!
 
बांगलादेशमधील परिस्थिती तेथील हिंदू समाजासाठी दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. हिंदू समाजावर, मंदिरांवर, साधूसंतांवर, घरादारांवर हल्ले होण्याचे प्रकार त्या देशात घडत आहेत. पण, तेथील मोहम्मद युनूस यांचे सरकार धर्मांध मुस्लिमांवर अद्याप नियंत्रण प्रस्थापित करू शकलेले नाही. बांगलादेशमधील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरुद्ध जगभरातून आवाज उठविला जात असला, तरी तेथील सरकार काही कारवाई करताना दिसत नाही. एकीकडे तेथील हिंदू समाजावर धार्मिक अत्याचार होत असताना त्या देशातील खुलना विद्यापीठातील हिंदू विद्यार्थ्यांनी गीतापाठाचे आयोजन केले होते. आपल्या संस्कृतीबद्दल आदरभाव, अभिमान व्यक्त करण्यासाठी खुलना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बांगलादेशमधील अल्पसंख्याक समाजाबद्दल जे स्फोटक वातावरण निर्माण झाले आहे, त्या परिस्थितीतही या गीतापाठाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील विविध शाखांचे हिंदू विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या गीतापाठ कार्यक्रमामुळे हिंदू विद्यार्थ्यांचे नाते घट्ट होण्यास मदत झाली. हिंदू समाजावर त्या देशामध्ये हल्ले होत असले, तरी आम्ही हिंदू एक आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.
 
संभलमध्ये आढळले शिव-हनुमान मंदिर!
 
संभल या शहरामधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून अलीकडेच तेथे दंगल उसळली होती. पुरातत्त्व विभागाच्या पथकावर मुस्लीम समाजाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. समाजवादी पक्षाच्या एका मुस्लीम खासदाराने मुस्लीम समाजास भडकविल्यामुळे ती दंगल उसळली होती. त्या दंगलीची उत्तर प्रदेश सरकारकडून चौकशी सुरु आहेच. त्याच दरम्यान संभलमध्ये अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरु असताना, त्या अतिक्रमणामध्ये दबून राहिलेल्या एका शिव-हनुमान मंदिराचा शोध लागला. हे मंदिर अनधिकृत बांधकामांमध्ये 46 वर्षे दबून राहिले होते. १९७८ सालापासून ते मंदिर बंद होते. आता मंदिर पुन्हा उघडण्यात आले असून, तेथे पूजापाठ करुन आरती करण्यात आली. संभलचे पोलीस अधीक्षक क्रिशन कुमार आणि जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेनसिया यांनी, नव्याने शोध लागलेल्या या मंदिरात प्रार्थना केली. तसेच, या मंदिराच्या समोर असलेल्या एका विहिरीत काही देवतांच्या मूर्ती सापडल्या. या मूर्ती पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. नव्याने शोध लागलेल्या शिव-हनुमान मंदिरातील मूर्तींचे दर्शन घेता यावे, यासाठी पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त ठेवला आहे. या मंदिराचा शोध लागल्याने स्थानिक हिंदू भाविक दर्शनासाठी त्या मंदिरास भेट देत आहेत.
 
पोप फ्रान्सिस यांना ऋग्वेदाची प्रत भेट!
 
केरळमधून प्रसिद्ध होणार्‍या ‘जन्मभूमी’ या मल्याळम दैनिकातील ज्येष्ठ वृत्त संपादक आणि ऑनलाईन एडिटर पी. श्रीकुमार यांनी आपल्या व्हॅटिकन भेटीत पोप फ्रान्सिस यांना ऋग्वेदाची प्रत भेट म्हणून दिली. व्हॅटिकनमध्ये गेल्या दि. २९ - दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी या कालावधीत सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान पोपना ऋग्वेदाची ही प्रत भेट म्हणून देण्यात आली. या पूर्वी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री इ. के. नयनार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री पिनराई विजयनन (विद्यमान मुख्यमंत्री) यांनी पोप जॉन पॉल (द्वितीय) यांना भगवद्गीतेची प्रत भेटीदाखल दिली होती. त्याचे स्मरण पी. श्रीकुमार यांनी यानिमित्ताने करून दिले. पी. श्रीकुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या शिकवणुकीतून घेतलेल्या प्रेरणेतून आपण ऋग्वेदाची प्रत देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले आहे. पोप फ्रान्सिस यांना हा ग्रंथ भेट देताना, हिंदू तत्त्वज्ञानाचे पायाभूत सार या ग्रंथात सामावले आहे, असे आपण पोप यांना सांगितल्याची माहिती श्रीकुमार यांनी दिली.
 
दत्ता पंचवाघ 
Powered By Sangraha 9.0