मुलगी जगण्यासाठीची प्रेरणा!

16 Dec 2024 20:58:52
 
Girl inspiration
 
साहित्य हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे, असे मानून साहित्य निर्मिती करणार्‍या प्रतिथयश साहित्यिक कवी शुभांगी पासेबंद यांच्या विचारांचा मागोवा घेणारा लेख...
 
१९५८चे साल होते. मुलगी जन्माला आली. पण, चौथीही मुलगी झाली म्हणून तिच्या बाबांनी तिला घरी नेण्यास नकार दिला. तिच्या मामांनी त्या मुलीला घरी नेले. मात्र, मुलीच्या आईने पतीला ठामपणे म्हटले, “आपले बाळ आपल्यासोबत घरी न्यायचं.” बाबांना त्यांची चूक उमगली. मग ती मुलगी घरी आली. आज तीच मुलगी प्रतिथयश साहित्यिक आहे. तिची तब्बल 45 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच, एक ब्रेल लिपीतील पुस्तक, एक व्हिडिओ आणि ऑडियो बुकही प्रकाशित आहे. ती प्रखर सामाजिक कार्यकर्ता आहे. ‘मुली जन्माला येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे ती जनजागृती करते. देशात आणि परदेशातही तिने अनेक भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. ती मुलगी आज ज्येष्ठ नागरिक असून त्यांचे नाव आहे, शुभांगी पासेबंद.
 
सामाजिक आणि साहित्यिक सेवेबाबत त्यांना ‘महाराष्ट्र दीप सावित्रीबाई फुले पुरस्कार’, ‘डिके सांडू पुरस्कार’, ठाणे महानगरपालिका ‘उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार’ मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांचे ‘कवी प्रफुल्ल दत्त पुरस्कार’, ‘रेगे पुरस्कार’, ‘ठाणे गौरव’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
शुभांगी पासेबंद या माहेरच्या उषा देशमुख. मराठा समाजाचे देशमुख कुटुंब मूळचे धुळ्याचे. लक्ष्मण आणि दुर्गा देशमुख यांना चार मुली आणि एक मुलगा. उषा म्हणजेच, शुभांगी ही त्यांची कन्या. शुभांगी यांचा जन्म झाल्यावर त्यांना पहिल्यांदा मुलीला नाकारले. तरीसुद्धा मुलीला ज्यावेळी घरी आणले, त्यावेळेपासून त्यांनी शुभांगीच्या संगोपनात कोणतीच कमतरता ठेवली नाही. ती एक घटना. शुभांगी सात-आठ वर्षांच्या असतील. त्यावेळी त्यांना कुत्रा चावला. उपचार करायचे, तर गावाबाहेर शहरातील दवाखान्यात जावे लागणार. वाहन म्हणून गावात एकच टांगा असायचा. तो टांगाही उपलब्ध नव्हता. त्यावेळी लक्ष्मण हेसुद्धा आजारी होते. तापाने फणफणत होते. मात्र, लेकीवर तत्काळ उपचार व्हावा, म्हणून त्यांनी शुभांगी यांना खांद्यावर बसवले आणि तसेच चालत त्यांनी तालुक्याची वाट पकडली. बाबांचे प्रेम त्या वयात शुभांगी यांच्या मनावर कोरले गेले. शुभांगीची आई दुर्गाबाई अत्यंत समाजशील. गावातल्या महिलांना त्या वेगवेगळ्या प्रकारची उत्तम लोणची बनवायला शिकवत. गावातल्या सासरकरणीच्या आई किंवा आजी म्हणून त्या गावात ओळखल्या जायच्या. कारण, त्या गावातल्या आयाबायांना सहकार्य करायच्या, त्यांच्या गरजेच्यावेळी धावून जायच्या. हे सगळे शुभांगी यांनी अनुभवले होते.
 
तसेच, लक्ष्मण हे गोष्टीवेल्हाळ होते. कोणतीही गोष्ट ते रंगवून सांगायचे. ‘१९६५ सालचे युद्ध’, ‘१९७१ सालचे युद्ध’ यावर आधारित कथा ते मुलांना सांगायचे. त्या कथा ऐकून शुभांगी यांच्या मनात कथा-कादंबर्‍यांबद्दल प्रेम आणि जिज्ञासा उत्पन्न झाली. त्यामुळेच त्यांना वाचनाचा छंद जडला. वाचन आणि त्यातून झालेल्या शब्दांच्या जादूंची ओळख ही पुढे आयुष्यभर त्यांची सांगाती आहे.
 
असो. लहानपणी शुभांगी यांना डॉक्टर व्हायचे होते. एकदा त्यांची आत्या नदीवर कपडे धुवायला गेली. तिथे तिच्या पायाला काहीतरी चावले. ती तशीच घरी आली आणि काही वेळाने गतप्राण झाली. वेळीच निदान आणि उपचार झाले असते, तर ती वाचली असती. या घटनेचा शुभांगी यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवले. त्या हुशार होत्या. मात्र, त्यांचा वैद्यकीय प्रवेश केवळ दोन गुणांसाठी हुकला. त्यांना खूप दु:ख झाले. पण, पुढे तर जायचे होते. त्यामुळे त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बी.एड. केले आणि बँकेच्या परीक्षा देऊ लागल्या. बँकेची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांना बँकेत नोकरी लागली. आपल्या आईबाबांनी आपली काळजी घेतली, आपणही त्यांच्या सेवेत कोणतीच कमतरता ठेवायची नाही, असे त्यांनी ठरवले. विवाहानंतरही आईबाबांची काळजी घ्यायची, असा पणच त्यांनी केला. या अटीमुळे त्यांचा विवाह जुळण्यास अडथळे आले. पण, शुभांगी निर्णयावर ठाम होत्या. एकदा शुभांगी यांच्या आई, भाऊ आणि वहिनी यांनी जगन्नाथ यात्रेसाठी रेल्वेने प्रवास करत होते. मात्र, अचानक रेल्वेमध्ये दुर्गाबाईंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शुभांगीच्या समोरच आईचा मृत्यू झाला
त्यानंतर एक गोष्ट घडली. विवाहानंतरही आईबाबांची काळजी घेणार, ही शुभांगी यांची अट मान्य करणार स्थळ आले. चंद्रशेखर देशमुख या उमद्या विचारांच्या तरूणाशी त्यांचा विवाह झाला. संसार चारचौघांसारखाच होता. त्यांना पहिला मुलगाच झाला. मात्र, दुसर्‍या गरोदरपणात त्यांचे बाळ पोटातच दगावले. त्यामुळे त्या काही दिवस कोमात गेल्या. शुद्धीत आल्यावर त्यांनी स्वत:शीच ठरवले, थांबून चालणार नाही. त्यांनी मन लिखाणात गुंतवले. अनेक वर्तमानपत्रांत, साप्ताहिकांमध्ये त्या स्तंभलेखन करू लागल्या. घर, नोकरी सांभाळून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यात त्यांना सुवर्णपदकही प्राप्त झाले. त्यांनी ‘लोककला अ‍ॅकेडमी’तूनही शिक्षण पूर्ण केले. ४५ पुस्तकेही लिहिली. त्याचवेळी मुलगा-मुलगी भेदापलीकडे जाऊन विकसित समाज आणि प्रगतीमान राष्ट्र निर्माण व्हावे, या तळमळीने त्या कार्य करू लागल्या. साहित्य आणि समाजसेवेसाठी त्यांनी बँकेतून निवृत्ती घेतली. साहित्यकृतीतून आणि सामाजिक कार्यातून त्यांनी भ्रूणहत्याविरोधी, महिला सक्षमीकरण जागृती कार्य सुरू केले. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेतला तर जाणवते की, एक मुलगी वंशाचा दिवाच नाही, तर ती स्वकर्तृत्वाने वंशासाठी नंदादीप होते. नकोशीच जीवन जगणार्‍या शुभांगी या अनेक कन्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत.
Powered By Sangraha 9.0