शिष्याकडून गुरुला वाढदिवसाची भेट

    15-Dec-2024
Total Views |
world chess champion d gukesh


संपूर्ण जगाचे लक्ष लागलेली जागतिक बुद्धीबळ विजेतेपदाची स्पर्धा संपन्न झाली. यास्पर्धेचे निकाल हे भारताला सुखावणारे आहेत. भारताचा डी गुकेश या 18 वर्षीय युवा खेळाडूने संयम, धारिष्ट्य. लढाऊ वृत्तीचे प्रदर्शन करत दैदिप्यमान विजय मिळवला. त्याने मिळवलेला विजय हा बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध असल्याने त्याचे महत्व अधिक मोठे होते. गुकेशच्या या विजयाचा घेतलेला आढावा...

'जागतिक बद्धिबळ संघटना’अर्थात फिडे आयोजित, ‘जागतिक बद्धिबळ विजेते’पदाची स्पर्धा, दि. 13 डिसेंबर 2024 रोजीच्या शुक्रवारी सिंगापूरमध्ये समारोपाच्या समारंभाने संपन्न झाली. त्या स्पर्धेचा झटपट आढावा घेताना, सर्वप्रथम आपल्याला दोन जण आठवतात. त्यातील एक होता, आज केवळ 18 वर्षांचा असलेला युवक. तर, दुसर्‍याने त्याचा 55वा वाढदिवस साजरा केला होता.

विश्वनाथन आनंदचा नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन विरुद्धचा चालू असलेला सामना, 2013 साली आज 18 वर्षे वयाचा असलेला तो युवक, काचेच्या बॉक्सच्या आत पाहत होता. तेव्हा त्याचे दुसरे मन त्याला विचारत होते की, एक दिवस काचेच्या बॉक्सच्या दुसर्‍या बाजूला मी असेन, तर ते किती छान होईल. त्या सामन्यात विश्वनाथन आनंदला हारताना पाहून, त्याला वाईट तर वाटलेच. पण, दुसरीकडे एक दिवस जेतेपद जिंकण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्यात निर्माण झाली. “जेव्हा मॅग्नस जिंकला तेव्हा मला वाटले की, मला खरोखरच भारतात जेतेपद परत आणायचे आहे. दहा वर्षांपूर्वीचे हे स्वप्न, माझ्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली आहे.” असे तो युवक सांगत होता. कोणी फुशारकी मारत म्हणतोय की, तो भारतीय युवक तमिळ आहे, तर कोणी म्हणतोय की, तो तेलुगू आहे. असे वाद समाजमाध्यमांवर रंगत असले, तरी मुळ चेन्नईला जन्मलेला डी गुकेश अर्थात डोम्माराजूू गुकेश हे त्या युवकाचे नाव. दि. 12 डिसेंबर 2024 रोजीच्या गुरुवारी, त्याची ती आकांक्षा पूर्ण झाली, जेव्हा एक भारतीय खेळाडू 14व्या खेळात उशिरा, लिरेनच्या चुकीचे भांडवल करून आनंद यांच्यानंतर जागतिक बुद्धिबळ विजेता बनणारा दुसरा भारतीय झाला. योगायोगही असा आला होता की, त्या चौदा फेर्‍यांच्या दरम्यान आलेल्या दि. 11 डिसेंबर रोजी डोमराजू गुकेश ज्याला गुरुस्थानी मानतो, असा भारताचा पहिला विश्वविजेता ठरलेला विश्वनाथन आनंद त्याच्या वयाचे 55वे वर्ष पार करत होता.

भारताचा युवा बुद्धिबळपटू गुकेश याने, गुरुवारी ‘जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली. आपल्याला आदरणीय असलेल्या विशी सरांना जणू त्याने दिलेली वाढदिवसाची भेटच होती. त्याने चिनचा ग्रॅण्डमास्टर डिंग लिरेनचा पराभव केला. डी. गुकेश विश्वनाथन आनंदनंतर आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून, तो जगातील सर्वात कमी वयाचा विश्वविजेता ठरला आहे. त्याने गॅरी कास्पोरोव्ह याचा विक्रमही मोडला आहे. डोम्माराजू गुकेशने जगज्जेतेपद संपादन करणे, ही भारतीय बुद्धिबळासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मात्र, गुकेशने ज्या वयात हे यश मिळविले, ते फारच अद्भुत आहे. गॅरी कास्पारोव्हने 22व्या वर्षी जगज्जेतेपद मिळवले, त्यावेळी हा विक्रम कधी मोडला जाईल असा कोणी विचारही केला नव्हता.

गुकेशची कामगिरी भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. डिंगच्या चुकीमुळे गुकेश जगज्जेता झाल्याची टीकाही केली जात आहे. मात्र, कारकिर्दीत मोठा टप्पा गाठल्यानंतर टीका होतेच. त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे, असा सल्ला पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने आपला शिष्य गुकेशला दिला आहे. 32 वर्षीय डिंगपेक्षा खूपच तरुण असणारा गुकेश , जास्त चैतन्यशील दिसून आला. हा युवा आव्हानवीर पूर्ण ताकदीने प्रत्येक डाव खेळला आणि विजेता ठरला. “मी खूप खूश आहे. गुकेशच्या ऐतिहासिक यशाचा मी साक्षीदार होतो. टीका ही होतच राहणार. अगदी खरे सांगायचे, तर तुम्ही कारकिर्दीत एक मोठा टप्पा गाठलात की, तुमच्यावर होणारी टीका वाढते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. गुकेशची कामगिरी किती खास आहे, जगज्जेतेपदाच्या लढतीपर्यंत पोहोचण्यासाठीही त्याने किती मेहनत घेतली, हे सर्वांना ठाऊक आहे. ऑलिम्पियाड स्पर्धेतील त्याची कामगिरीही वाखाणण्याजोगी होती. ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत त्याने अनेक नामांकितांना मागे सोडले. त्यामुळे आता होणार्‍या टीकेकडे त्याने फार लक्ष देऊ नये. तुम्ही जगज्जेते व्हाल आणि तुमच्यावर टीका होणार नाही, हे शक्यच नाही,” असे आनंद म्हणाला.

गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत. तसेच, ते चेन्नईमध्ये ‘होम चेस ट्यूटर’ आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच, त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेशचे वडील डॉक्टर असून, आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. गुकेश हा सर्वात तरुण विश्वविजेता ठरला असून, अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. विश्वनाथन आनंद याआधी 2012 साली बुद्धिबळ चॅम्पियन झाला होता. गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी ‘फिडे मानाची बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली होती. आता गुकेशने चीनच्या लिरेनचा 14 डावानंतर , 7.5-6.5 अशा गुणांनी पराभव केला असून, तो विश्वविजेता ठरला आहे.

स्पर्धा जिंकल्यावर गुकेशने नम्रपणे, त्याच्या सवयीप्रमाणेच पटावरील सर्व मोहरे पुन्हा जागच्याजागी मांडून ठेवले आणि ज्या बुद्धिबळाच्या पटाने त्याला जगज्जेता बनवले, त्याला वाकून नमस्कार करुन भगवंताचे आभार मानल्यावरच खुर्चीवरची बैठक सोडली. सगळ्या खेळाडूंनी हे संस्कार गुकेशकडून जरुर शिकावेत, अशी गुकेशची वर्तणूक सगळ्या 14 डावात दिसून येते.

आनंद सांगतो की, “गुकेश कधीही पटकन माघार घेणार्‍यातला नाही. प्रतिस्पर्ध्याने डाव बरोबरीत सोडण्याचा प्रस्ताव जरी मांडला, तरीही गुकेश तो डाव जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो.” विश्वनाथन आनंदच्या ‘वेस्टब्रिज आनंद चेस अकादमी’तून आलेला, हा आनंदचा मोहरा आज आता जगात बुद्धिबळाचा राजा बनला आहे. आज भारतीय नवयुवकांपुढे आदर्शवत राहत, त्यांना शेवटपर्यंत कसे लढत विजयश्री खेचून आणायची याचे उदाहरण सादर करत आहे.
 
आनंदमुळे आणि आता गुकेशमुळे भारतात बुद्धिबळाविषयी आदर, आत्मीयता, उत्सुकतेची जी लाट निर्माण झाली आहे, तितकी ती अन्य देशात रशियन, युरोप अशा देशातही निर्माण होऊ शकलेली नाही. या खेळाला आणि खेळाडूंना अनेक राज्यांमध्ये घसघशीत सरकारी पाठबळ मिळत आहे. बडेबडे उद्योगसमूह जगातील सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धा भरवू लागले आहेत. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसराच भारतीय जगज्जेता. त्यामुळे त्याच्या या विजयाला, एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

या विजयामुळे गुकेशच्या पाकिटात, 2.5 मिलियन डॉलर्स एवढी एकूण रक्कम जमा होत आहे. 3, 11 आणि 14 या खेळांचे, प्रत्येकी दोन लाख डॉलर्सप्रमाणे गुकेशला सहा लाख डॉलर्स मिळणार आहेत. गुकेशच्या चिनी प्रतिस्पर्ध्याला एक आणि 12व्या सामन्यासाठीचे चार लाख डॉलर्स मिळणार आहेत. स्पर्धेच्या एकूण रकमेतील बाकीची रक्कम दोघांना समान वाटली जाईल. अशाप्रकारे गुकेशच्या पाकिटात 1.35 मिलियन, तर डिंगच्या 1.15 मिलियन डॉलरची भर पडेल. गुकेश जेव्हा विश्वविजेता ठरला, तेव्हा त्याचे नाव जगभर प्रत्येकाच्या तोंडी घेतले जाऊ लागले. तो अशाप्रकाराने क्रिकेटपटूंसारखाच धनिकांमध्ये ओळखला जाऊ लागला. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ‘पाच करोडचा पुरस्कार’ गुकेशला जाहीर केला. राज्य आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने, गुकेशचे अभिनंदन करुन तसे प्रस्ताव संमत केले आहेत. गुकेशच्या सन्मानार्थ टपाल खात्याने विशेष आवरण सादर केले आहे. महाराष्ट्र टपाल खात्याने यासाठी पुढाकार घेतला आहे.

कोणताही क्रीडापटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना, स्पर्धकाला त्या-त्या क्रीडाप्रकाराच्या कौशल्याएवढीच खेळाडूच्या मानसिक स्थितीची परीक्षा घेतली जाते. तशी काही महिन्यांपूर्वी कॅन्डिडेट स्पर्धा जिंकल्यानंतर , गुकेशने ‘मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक’ शोधण्यास सुरूवात केली होती. त्याने पॅडी उपटन यांच्याशी संपर्क साधला होता. दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू राहिलेल्या, उपटन यांनी 2008 आणि 2011 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे ‘मेंटल कंडिशनिंग आणि स्टॅटर्जीक लिडरशीप’ प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीतच भारतीय क्रिकेट संघाने, धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेटचे विश्वविजेतेपद जिंकले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाला,‘पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024’ मध्ये कास्य पदक जिंकण्यात देखील मदत केली होती. गुकेशला त्याच्या जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये, डिंग लिरेनविरोधातही काही धक्के सहन करावे लागले होते. यामध्ये गुकेशला कमालीचा संयम दाखवावा लागला होता, मानसिक संतुलन राखावे लागले होते. त्यावर मात करत त्याने, स्पर्धेत जोरदार यशस्वी पुनरागमन करुन विजय संपादन केला होता. यासाठी लागणार्‍या गुरूचे पद स्वीकारले होते ते, पॅडी उपटन यांनीच.
 
क्रीडाक्षेत्रात गुकेश हा आता पुढे नमूद केलेल्या, कमी वयातील विलक्षण गुणसंपन्न असलेल्या अशा क्रीडापटूंच्या यादीत 18 व्या वर्षी समाविष्ट होत आहे. 17व्या वर्षी जगप्रसिद्ध होणारा फुटबॉलपटू पेले, डायव्हिंगमध्ये चिनचा 12व्या वर्षी फु मिन्सिकीया, 14व्या वर्षी जिमनास्ट नादिया कोमानेसी, बॉक्सिंगचा माईक टायसन 20व्या वर्षी, टायगर वुडस् गोल्फमधला 21व्या वर्षी.

पाच वेळचा बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदने, शेवटचे जागतिक अजिंक्यपद 2012 साली पटकावले. त्यानंतर 12 वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय बुद्धिबळ जगज्जेता पाहण्याची संधी, जगभरच्या भारतीय बुद्धिबळ रसिकांना मिळाली आहे. भारतात बुद्धिबळ हा खेळ याआधीही प्रसिद्ध होताच, तो गुकेशच्या विजयाने आता आणखीन प्रसिद्ध होईल. चला तर आपण सारे क्रीडापटू गुकेशचे अभिनंदन करु आणि आपल्यातही एखादा असा भारतीय क्रीडापटू घडवण्याचा प्रयत्न करु.

श्रीपाद पेंडसे 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकी पटू आहेत.)
9422031704