राष्ट्रीय पातळीवर आपल्या चित्रकलेतून ख्याती मिळविलेल्या सातार्यातील विनया गिरीष कुलकर्णी याच्या कला कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख...
नुकतीच नवी दिल्लीत ‘ऑलिम्पिया आर्ट 2024’ या जगातील सर्वात मोठ्या ‘वॉटर कलर फेस्टिव्हल’चे दुसरे पर्व संपन्न झाले. या प्रदर्शनात जगभरातील 60 देशांचे 550 चित्रकार सहभागी झाले होते. या फेस्टिव्हलमध्ये विनया यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातून सातार्यातील विनया गिरीष कुलकर्णी यांनी सहभागी होत आपल्या चित्र प्रदर्शनातून महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाची मान उंचावली. मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील विनया गिरीष कुलकर्णी यांचा जन्म दि. 11 जानेवारी 1980 रोजी झाला. विनया यांना लहानपणासूनच चित्रकलेची आवड होती. विनया यांच्या आई छंद म्हणून चित्र काढायच्या. आईकडे बघूनच विनया यांनी ही कला आत्मसात केली. कालांतराने शाळेत आयोजित विविध स्पर्धांमधून विनया यांनी आपल्या या कलाकारीला आकार दिला. अशातच या स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशाने विनया यांना आपली आवड करिअरमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळाली.
विनया यांचे कलाशिक्षण जी. डी. आर्ट, डिप्लोमा ए. एड., डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन असे विविध विषयांत झाले आहे. जे. डी. आर्टचे शिक्षण सांगलीमधील कलाविष्कारमधून त्यांनी घेतले आहे. तर डिप्लोमा ए. एड हे अभिनव महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण होताच विनया यांनी ‘कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय, सोलापूर’ येथे कलाशिक्षक म्हणून नोकरी केली. पंढरपूरमध्येही ‘सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालया’त त्या शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. याचकाळात त्यांचा विवाह झाला आणि त्या सातार्यात स्थायिक झाल्या. विवाहानंतर काही वर्षे ‘क्रांतिस्मृती ज्युनिअर कॉलेज’मध्ये त्यांनी नोकरी केली. मात्र, कालांतराने कौटुंबिक जबाबदार्यांमुळे त्याचा हा शिक्षकीपेशा मागे पडला.
कालांतराने पुन्हा एकदा सासरकडून त्यांना आपली कला जोपासावी यासाठी आग्रह धरण्यात आला. यावेळी त्यांनी ‘घरगुती चित्रकला क्लासेस’ घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण पंचक्रोशीतून विनया यांच्याकडे चित्रकलेत आवड असणारे अनेक विद्यार्थी येऊ लागले. तर, लहान मुले आपली आवड जोपासावी म्हणून विनया यांच्याकडे ही कला शिकण्यास येऊ लागले. क्लासेसला मिळणारा प्रतिसाद पाहता विनया यांच्या सासर्यांनी आणि पती गिरीष कुलकर्णी यांनी विनया यांना स्वतःची आर्ट गॅलरी सुरु करावी, अशी संकल्पना मांडली. विनया यांचे कित्येक वर्षाचे हे स्वप्न सत्यात उतरणार होते. त्यांनी लगेचच या आर्ट गॅलरीवर काम सुरु केले. 2019 साली सातार्यात विनया कुलकर्णी यांनी ‘मिडास आर्ट गॅलरी’ नावाने स्वतःची आर्ट गॅलरी उभारली.
आज या आर्ट गॅलरीत 100 हून अधिक चित्रे उपलब्ध आहेत. याचठिकाणी विनया दर महिन्याला विविध उपक्रमांचे आयोजन करतात. यामध्ये लाईव्ह पोट्रेट डेमो, चित्रकलेची आवड असणार्यांसाठी कार्यशाळा, विविध स्पर्धांचे आयोजन विनया याठिकाणी करतात. लोकांचा, चित्रकलेची आवड असणार्यांचा अधिकाधिक सहभाग करून घेत, रांगांमध्ये रमायला विनया यांना आवडते, हीच आवड जपत त्या अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पनांसह सतत नवे उपक्रम राबवतात. यासोबतच विनया यांचा भर विद्यार्थ्यांनी सातार्याबाहेरील काही स्पर्धा, कलाकार यांच्या कलाकृतींचा आढावा घेतला पाहिजे यावर असतो. यासाठी त्या सतत आग्रही असतात. यातूनच त्यांनी पुणे फेस्टिव्हल, कॉसि कलर्स आर्ट वर्कशॉप, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यातील आणि देशभरात आयोजित विविध स्पर्धा आणि प्रदर्शनात आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतात. वर्षातून एकतरी राज्यभरातील कॅम्पमध्ये त्या सहभागी होतात.
आईवडील बर्याचदा एक छंद किंवा आवड म्हणून बघतात. मात्र, तसे नसून चित्रकलेतून मुलांचे व्हिज्युलायझेशन वाढते. त्यांच्यातील रंगाचे ज्ञान वाढते. साधे आपण मार्केटमध्येही कोणतीही वस्तू आणत नाही. आपल्याला डोळ्याला पाहायला आवडेल अशाच वस्तू आणतो. साधे जेवणाचे ताटही आपल्याला विविध रंगाच्या पदार्थानी सजलेले असेल, तर ते जास्त आवडते. म्हणून चित्रकला हवी. अनेक मुले पुढे जाऊन ऍनिमेशनमध्ये करिअर निवडतात त्यांना जर चित्रकलेचे रंगाचे ज्ञान असेल, तर त्या उत्तम करिअर करतात. इतकेच नाहीतर आर्किटेक्ट, इंजिनिअरिंग आणि मेडिकल या क्षेत्रांसाठीदेखील चित्रकारिता येणे आवश्यकच आहे. “पूर्वी चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र, आता याकडे करिअर म्हणून पालक आता पाहतात, हा खूप सकारात्मक बदल आता जाणवतो. मात्र, अजूनही तणाव व्यवस्थापनसाठी चित्रकलेचा वापर होताना दिसत नाही. तो अधिकाधिक व्हावा असे वाटते,” असे विनया कुलकर्णी आवर्जून सांगतात.
विनया यांच्या मार्गदर्शनात कलाशिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर कार्यरत आहेत. मिडास गॅलरीमधून तयारी करणारी अनेक मुले आज जे. जे. आर्ट स्कूलमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. विनया यांचे काही विद्यार्थी मोठ्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कलाकार घडवत आहेत. या विद्यार्थ्यांचे यश पाहून समाधानाची भावना विनया कुलकर्णी यांनी व्यक्त केली. महाविद्यालयात आणि शिक्षण घेत असताना विनया यांनी अनेक आर्ट गॅलरीला भेट दिली. चित्रांनी सजलेल्या त्या आर्ट गॅलरींनी कायमच विनया यांच्या स्वप्नांना बळ दिले. आपलीही एक आर्ट गॅलरी असावी असे स्वप्न उराशी बाळगले आणि ते सत्यात ही उतरले. स्वप्न बघणे हे आपल्या हातात असते. मात्र, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेकांचे आशीर्वाद आणि हातभार लागतात. विनया कुलकर्णी यांच्या पाठीशी सुरुवातीला आई-वडील तर होतेच. मात्र, त्यांना सासरीही कुटुंबाची आणि पतीची पूर्ण साथ लाभली ज्यामुळे आज त्या यशाच्या शिखरावर आहेत. त्यांचा हा कलात्मक वारसा असाच उत्तारोत्तर वाढत राहो हिच सदिच्छा! विनया कुलकर्णी यांना पुढील कारकिर्दीसाठी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.