वारसा सफर गिरगावची!

Total Views |
 varsa safar girgaonchi


‘भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत’तर्फे नुकतीच गिरगाव या गावाची वारसा सफर - ‘हेरिटेज वॉक’ अतिशय उत्साहात पार पडली. सुमारे चार-साडेचार तास मुंबईच्या स्थानिक इतिहासात रुची असणारा एक मोठा समुदाय पायी फिरत होता. चौक, मंदिरे, शाळा, इमारती, वाड्या, घरे, मंदिरे, मठ, चर्च, रस्ते, चित्रपटगृहे इत्यादींची माहिती घेत होता. यातले अनेकजण माजी गिरगावनिवासी होते, तर कित्येकजण वर्तमान गिरगावकर आहेत. पण, सर्वांच्या तोंडून समान उद्गार निघत होतेे, ‘अरे, आम्ही हे सगळं वर्षानुवर्षे बघत आलो आहोत, पण त्यांच्या मागे एवढा मोठा इतिहास आहे, हे आजच कळलं!

खरं तर एखाद्या शहराचा, गावाचा, स्थानिक परिसराचा इतिहास, तिथे घडलेल्या घटना, तिथे नांदून गेलेल्या व्यक्ती, त्यांच्या जीवनात घडून गेलेल्या हर्ष - अमर्षाच्या घटना, आजच्या स्थानिक पिढीला सांगणे, हाच ‘इतिहास संकलन समिती’च्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याकरिता व्याख्याने, कथाकथने, स्लाईड शो इत्यादींप्रमाणेच प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन तिथे घडलेल्या घटना ऐकणे, समजून घेणे हा सर्वांसाठीच एक खूप आनंदाचा अनुभव असतो. तो आनंद परवाच्या गिरगावच्या वारसा सफरीत सहभागी लोकांनी भरपूर लुटला.

ग्रँटरोड या रेल्वे स्थानकावरून पश्चिमेकडे गिरगाव चौपाटीकडे जाताना गावदेवी ही वस्ती लागते. गिरगाव या मुंबई शहरातल्या जुन्या गावाची ग्रामदेवता असणार्‍या लीलावती देवीवरून या सगळ्या भागालाच ‘गावदेवी’ हे नाव पडले आहे. गावदेवी ही गावाच्या शीवेवर-सीमेवर असतेे. म्हणून गावदेवीपासूनच या सफरीची सुरुवात करण्यात आली.

नाना चौकातील जगन्नाथ शंकरशेट उर्फ नाना (जन्म-1803 मृत्यू-1865) यांच्या अर्धपुतळ्याजवळ सर्व सहभागी जमले. नानांच्या प्रचंड सामाजिक कार्याची माहिती घेऊन सर्व सहभागी केनेडी पुलाच्या पायथ्याशी असलेल्या ‘ज्योती स्टुडिओ’कडे गेले. भारतातला पहिला बोलपट ‘आलम आरा’ - सन 1931 याची निर्मिती खानबहादूर अर्देशीर इराणी यांनी या ठिकाणी कशी केली, ‘मास्टर विठ्ठल’ हा या चित्रपटाचा मराठी भाषिक नायक, हा त्या काळातला सर्वाधिक मोबदला घेणारा अभिनेता कसा ठरला इत्यादी माहिती घेऊन सहभागी गावदेवी मंदिराकडे रवाना झाले.

गावदेवी हे देवस्थान सुमारे 1663 सालचे आहे, तर त्याच्या बाजूचे श्री नर्मदेश्वर देवस्थान हे 1832 साली यादवजी चौधरी यांनी बांधलेले आहे. याच रावबहादूर चौधरींनी सन 1811 मध्ये मुंबईच्या फोर्टमधली सुप्रसिद्ध टाऊन हॉल किंवा ‘एशियाटिक सोसायटी’ किंवा मध्यवर्ती ग्रंथालयाची इमारत बांधली होती. गावदेवी देवस्थानची आजची इमारत ही प्रख्यात वास्तुरचनाकार गजानन बाबुराव म्हात्रे (जी. बी. या आद्याक्षरांनी प्रसिद्ध) यांनी 1968 साली बांधलेली आहे. ‘आर्ट डेको’ ही वास्तुरचनेची एक विशिष्ट शैली म्हात्रे यांनीच मुंबईत रूढ केली.

रावबहादूर चौधरी यांची नात म्हणजे सुप्रसिद्ध डॉ. रखमाबाई. डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यानंतर परदेशी जाऊन डॉक्टर बनून डॉ. रखमाबाई भारतात परतल्या. त्यांनी प्रथम सुरत आणि नंतर राजकोट परिसरात अविरत वैद्यकीय सेवा दिली. निवृत्तीनंतर त्या गावदेवी परिसरात निवासाला आल्या. आपले सावत्र वडील प्रख्यात डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्या प्रशस्त बंगल्यामागेच त्यांनी स्वतःसाठी हे छोटेसे घर बांधले. 1955 साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच इच्छेप्रमाणे त्या घराच्या जागी ’शारदा मंदिर’ ही शाळा उभी राहिली. डॉ. रखमाबाईंचे स्मारकच असणारी ही शाळा, तिच्या पाठीमागे म्हणजे फ्रेंच ब्रिजच्या सुरुवातीलाच असणारे डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांचे टुमदार घर पाहून सहभागी राघववाडी समोर आले.

फ्रेंच ब्रिज-राघववाडी परिसरात खूप मोठ्या व्यक्ती नांदून गेल्या. काशिनाथ घाणेकर ज्यांना आपले गुरू मानत असत, ते नटवर्य रामचंद्र वर्दे इथे राहात असत. ’देहाची तिजोरी’, ’आकाशी झेप घे रे’ इत्यादी लोकप्रिय गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत. कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, त्यांचे बंधू अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी, डॉ. रखमाबाईंचे आजोबा रावबहादूर चौधरी, आकाशवाणीचे संगीतकार दिनकर अमेंबल (डी. अमेल), प्रख्यात चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर, त्यांचे थोरले सुपुत्र चित्रकार गजानन सावळाराम आणि धाकटे सुपुत्र आग्रा घराण्याचे नामवंत गायक बबनराव सावळाराम हळदणकर, प्रख्यात नाटककार मामा वरेरकर, साहित्य संघाचे आधारस्तंभ तात्या आमोणकर आणि त्यांच्या कन्या ललिता (केंकरे) व सुधा (करमरकर), जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कौसल्या मंजेश्वर ही सगळी झगमगती नक्षत्रे या भागात राहात होती.

फ्रेंच ब्रिजच्या दुसर्‍या टोकाला ’देवधर स्कूल ऑफ म्युझिक’ आहे. पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी शास्त्रीय गायनविद्येचा प्रसार सर्वसामान्य जनतेत व्हावा म्हणून ’गांधर्व महाविद्यालय’ काढले. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांचे पट्टशिष्य प्रा. बा. र. देवधर (‘बी. आर.’ या आद्याक्षरांनी प्रसिद्ध) यांनी 1925 साली ही संस्था सुरू केली. असंख्य शिष्य इथून शिकून बाहेर पडले. त्यातले जगद्विख्यात म्हणजे पंडित कुमार गंधर्व होत. खेरीज भारतीय संगीतातील ‘मेलडी’ आणि पाश्चिमात्य संगीतातील ‘हार्मनी’ यांचा तौलनिक अभ्यास करणारे प्रा. देवधर हे पहिले विद्वान होत. यासाठी त्यांना प्रा. जिओव्हानी स्क्रिंझी या मूळ इटालियन विद्वानाने प्रेरणा दिली. हा सगळा इतिहास ऐकून सहभागी चकित होत होते.

मग ’रॉयल ऑपेरा हाऊस’ या 1911 साली ’बरोक’ या वास्तुरचना शैलीत बांधलेल्या इमारतीचे, थिएटरचे सौंदर्य अनुभवून सहभागी अवंतिकाबाई गोखले रोड किंवा जुने नाव ’तिसरी भटवाडी’ या रस्त्यावर आले. भारतीय संगीतातील ‘भेंडीबाजार’ घराण्याच्या नामवंत गायिका अंजनीबाई मालपेकर, महर्षि धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव ’समाजस्वास्थ्य’कार प्रा. रघुनाथ धोंडो कर्वे, ’स्वाध्याय परिवार’चे संस्थापक पू. पांडुरंगशास्त्री आठवले, भारताला ’पिन कोड’ची अनमोल व्यवस्था देणारे आणि मुळात संस्कृतचे महापंडित असणारे श्रीराम भिकाजी वेलणकर, तसेच ज्यांना ’ज्ञानतपस्वी रुद्र’ असे म्हटले जाते, ते प्रा. न. र. फाटक ही सगळी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे या रस्यावर राहात असत. यांपैकी प्रा. न. र. फाटक यांचे नातू डॉ. रघुनाथ फाटक यांनी सफरीतील सहभागींशी प्रत्यक्ष संवाद साधला. आपले ख्यातकीर्त आजोबा न. र. फाटक, पांडुरंगशास्त्री ऊर्फ दादा, श्री. भि. वेलणकर यांच्या काही आठवणीही त्यांनी सांगितल्या.

त्यांचे आभार मानून वारसा सफरीची दिंडी आता ’आर्यन शाळे’समोर आली. रत्नागिरी, पावसचे महान संत स्वामी स्वरूपानंद, मराठी साहित्यात नवकथेचे दालन उघडणारे लेखक गंगाधर गाडगीळ, थोर विद्यमान शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर हे सगळे ‘आर्यन’चे माजी विद्यार्थी. समोरच्याच इमारतीत ’मराठा हायस्कूल’ ही शाळा होती. क्रिकेटवीर एकनाथ सोलकर आणि रामनाथ पारकर हे तिथले नामवंत विद्यार्थी. ‘मराठा हायस्कूल’च्या आवारात एका तरुणाने आपले मोटार दुरुस्ती गॅरेज थाटले. हे गॅरेज इतके प्रसिद्ध झाले की फोर्टमधले मोठे मोठे इंग्रज साहेब आपल्या मोटारी दुरुस्तीसाठी इथे आणू लागले. प्रथम ‘भालू’ नंतर ‘आबा’ अशा नावाने परिचित असणार्‍या त्या तरुणाने एक दिवस तिथे आपली ’डेक्कन मोटर एजन्सी’ ही संस्था सुरू केली. आबा पुढे इंग्लंडला जाऊन आले. मग नानाविध उद्योगांमध्ये पडून त्यांनी आपला ’गरवारे ग्रुप ऑफ कंपनीज’ हा उद्योगसमूह स्थापन केला. प्रख्यात मराठी उद्योजक भालचंद्र दिगंबर ऊर्फ आबासाहेब गरवारे यांच्या उद्योगसाम्राज्याची सुरुवात या गिरगावातून झाली, हे ऐकून सहभागी थक्क झाले.

यानंतर टप्पा आला गिरगाव नाक्याचा. या नाक्यावरील ‘सेंट टेरेसा’ हे कॅथलिक चर्च 1773 साली उभारण्यात आले. त्याचवर्षी तिकडे आपल्या मराठी राज्यात राज्यलोभी राघोबादादांनी आपला सख्खा पुतण्या पेशवा नारायणराव याचा खून पाडला होता. या समकालीन घटना ऐकून सहभागींना गंमत वाटली. गिरगाव नाक्याच्या थोडे पलीकडे ‘सेंट्रल सिनेमा.’ ‘प्रभात’च्या ‘संत तुकाराम’ चित्रपटाने 1936 साली इथे सुवर्ण महोत्सव केला होता. हा विक्रम करणारा तो पहिला मराठी चित्रपट. त्यामागे असणार्‍या गोरेगावकरांच्या चाळीत अनंत हरी गद्रे राहात असत. स्वातंत्र्यवीर सावरकर, पूज्य गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून गद्रे यांनी महाराष्ट्रभरात 3 हजार, 500 सत्यनारायण घातले. या पूजेला आवर्जून एखाद्या दलित जोडप्याला बसवले जात असे. पूजेनंतर गद्रे त्या जोडप्याचे सर्वांसमक्ष पाय धूत आणि ते पदतीर्थ सर्वांसमोर प्राशन करत असत. त्यांच्या पत्नीही त्यांना साथ देत असत. म्हणून आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘समतानंद’ ही पदवी दिली होती. आज गिरगाव नाका हा चौक ‘समतानंद अनंत हरी गद्रे चौक’ म्हणून ओळखला जातो. या आठवणी ऐकून सहभागी स्तिमित झाले.

आता हळूहळू सफरीचा अंतिम टप्पा येऊ लागला. गिरगाव रोडवरील ‘संझगिरी सदन’ या इमारतीमध्ये पूर्वी ‘चिकित्सक’ ही प्रसिद्ध शाळा होती आणि या शाळेतल्या सर्वाधिक मस्तीखोर मुलांना हाताशी धरून 1934 साली रा. स्व. संघ प्रचारक गोपाळराव येरकुंटवार यांनी मुंबई शहरातली पहिली संघ शाखा सुरू केली, हे ऐकून सहभागींना मोठी मौज वाटली, तर समोरच्या ‘मोहन’ इमारतीमध्ये महाराष्ट्रातले दोन ख्यातनाम हार्मोनियमवादक गोविंदराव टेंबे आणि गोविंदराव पटवर्धन हे वास्तव्यास होते, हे ऐकून सहभागी विस्मयचकित झाले.

आता सफरीचा अंतिम टप्पा आला, कांदेवाडी अक्कलकोट स्वामी मठ. हरिभाऊ तावडे हे स्वामी समर्थांचे लाडके शिष्य. स्वामी त्यांना आपला मुलगा-सुत म्हणत असत. त्यामुळे लोक हरिभाऊंना ’स्वामीसुत’ याच नावाने ओळखू लागले. स्वामींनी एकदा हरिभाऊंना आपल्या पायातल्या पादुका दिल्या आणि ‘दर्याकिनारी (म्हणजे मुंबईला) माझ्या नावाचा झेंडा फडकाव’ अशी आज्ञा केली. त्यानंतर हरिभाऊंनी मुंबईला येऊन पादुका स्थापन करून बांधलेला हा मठ म्हणजे मुंबईतल्या स्वामीभक्तांचे एक मोठेच श्रद्धास्थान आहे. मठाची विद्यमान वास्तू 1908 सालची आहे.
 
अशा रितीने स्वामीसुतांचा मठ, खुद्द स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्याबद्दल माहिती देऊन ‘गिरगाव वारसा सफरी’चा समारोप करण्यात आला. ‘भारतीय इतिहास संकलन समिती’ ही रा. स्व. संघ संबंधित, प्रेरित संस्थांपैकी इतिहासक्षेत्रात काम करणारी संस्था आहे. आपल्या देशाचा, प्रांताचा, शहराचा, परिसराचा योग्य इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम ही संस्था करते. ’वारसा सफर’ काढून लोकांना आपल्या परिसरात प्रत्यक्ष भ्रमण करीत करीत माहिती देणे, हा संस्थेच्या विविध कार्यांमधला एक उपक्रम आहे. ‘वारसा सफर’ हा उपक्रम संस्था विनामूल्य आयोजित करत असते. कारण, वारसा सफरीमध्ये अतिशय वेगळी, हटके, ‘एक्सक्लुझिव्ह’ स्वरुपाची, परंतु अस्सल आणि साधार माहिती दिली जाते. ही माहिती हेच समाजाचे सांस्कृतिक संचित, वारसा असून तो अनमोल आहे, अशी संस्थेची श्रद्धा आहे.


 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.