मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ( Veer Savarkar ) यांच्याविषयी खोटे आरोप करण्यासाठी संसदेचा उपयोग केला आहे. ही विधाने त्यांनी संसदेच्या बाहेर केली, तर आम्ही त्यांच्या विरोध तक्रार करू. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून संसदेचा चुकीचा उपयोग करण्यात आला, असा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला.
रणजित सावरकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी धांदात खोटी विधाने केली आहेत; मात्र त्यांचे पणजोबा जवाहर नेहरू यांनी अनेकदा राज्यघटनेची पायमल्ली केली आहे. १० मे १९४७ या दिवशी व्हाईसरॉय लॉर्ड माऊंट बॅटन पत्नीसह नेहरू यांना घेऊन शिमला येथे गेले. तेथे माऊंट बॅटन यांनी नेहरू यांनी फाळणीची योजना सांगितली. त्या वेळी नेहरू यांनी चिडून माऊंट बॅटन यांचा फाळणीची प्रस्ताव फाडून फेकला होता; परंतु एका दिवसानंतर त्यांनी फाळणीचा सुधारित प्रस्ताव नेहरू यांनी मान्य केला. फाळणीला संमती देणारे नेहरू हे एकप्रकारे ब्रिटिशांचे दलाला होते, असे म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही.’’