नाटक साकारणे फार कठीण : स्पृहा जोशी

14 Dec 2024 20:31:51
talk with actress spruha joshi


‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’, ‘सुर्यास्त’, ‘महासागर’, ‘नातीगोती’ अशी एकाहून एक दर्जेदार नाटके लिहिणारे ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांनी ४० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आले आहे. नाना पाटेकर आणि रिमा लागू यांची प्रमुख भूमिका असणार्‍या या मूळ नाटकाचे दिग्दर्शन विजया मेहता यांनी केले होते आणि आता जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘पुरुष’ या नाटकाचे ५० प्रयोग सादर करण्याचा निर्धार दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांच्यासह गुलाबरावाच्या भूमिकेतील शरद पोंक्षे यांनी केला आहे. या नाटकात अंबूची भूमिका अभिनेत्री स्पृहा जोशी हिने साकारली असून, ‘पुरुष’ नाटकाच्या निमित्ताने तिच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद...

'पुरुष’ नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्पृहा म्हणाली की, “पुरुष’ हे नाटक करावे अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा आणि स्वप्न असते. अनेक दिग्गज कलाकारांच्या यादीत माझ्या वाटेला अंबूची भूमिका जी ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांनी साकारली होती, ती करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी सगळ्यांचेच आभार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘पुरुष’ नाटक आणि त्यातील माझी भूमिका मला अभिनेत्री म्हणून जरा दडपण निर्माण करणारी आहे. कारण, नाना पाटेकर, रिमा लागू यांनी अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर केलेली कामे, जयवंत दळवी या ज्येष्ठ नाटककरांचे लेखन आणि विजय मेहता यांचे दिग्दर्शन असणार्‍या या नाटकाचा आवाका फार मोठा आहे. तो पेलवून प्रेक्षकांपर्यंत पुन्हा ताकदीने सादर करण्याची मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आल्यामुळे ती व्यवस्थित झालीच पाहिजे, हा विचार मला फार दडपणात आणणारा आहे.

मुळात ४० वर्षांपूर्वीचे मूळ नाटक मी पाहिलेले नाही. त्यामुळे केवळ हातात जयवंत दळवी यांनी लिहिलेली संहिता या पलीकडे माझ्याकडे काहीच संदर्भ नसल्यामुळे अगदी कोरी पाटी घेऊन मी रंगमंचावर पाय ठेवला आहे. अंबिका साकारताना रिमा लागू यांनी ती कशी साकारली होती हे मला ठाऊक नसल्यामुळे, मी माझ्या पद्धतीने आणि मला समजलेली अंबिका सादर करत आहे. त्यामुळे कुठेही नक्कल होणार नाही, पण अतिशय जबाबदारीने अंबिका माझ्याकडून साकारली जाईल, याची मी पुरेपूर खबरदारी घेत आहे.”

रंगभूमीशी असलेल्या अतुट नात्याबद्दल बोलताना स्पृहा म्हणाली की, “बालमोहन विद्यालया’त मी इयत्ता दुसरीमध्ये असताना पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवले होते. आचार्य अत्रे यांच्या ‘दिनुचं बिल’ या कथेवर आधारित ‘दिनुचं बिल’ ही एकांकिका आम्ही सादर केली होती आणि त्यामध्ये मी दिनुची भूमिका केली होती. त्यामुळे रंगमंचावर प्रेक्षकांच्या समूहासमोर अभिनय सादर करण्याची भीती काय असते, हे कधी जाणवलेच नाही. कारण, बालपणीच रंगभूमीची गट्टी जमली होती आणि त्यानंतर ‘रुईया महाविद्यालया’त माझ्या सुदैवाने मला उत्तम एकांकिकेच्या संहिता, दिग्दर्शक लाभल्यामुळे, माझ्यातील आत्मविश्वास अधिक दृढ होत गेला आणि अभिनेत्री म्हणून मी अधिक घडत गेले. त्यामुळे अभिनय क्षेत्रात उत्तम काम आपल्या वाट्याला येण्यासाठी शाळा, महाविद्यालयाचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो, असे म्हणत नाटक करणे तितकेच कठीण आहे,” असेदेखील स्पृहा म्हणाली.

‘पुरुष’ नाटकाबद्दल अधिक बोलताना स्पृहा म्हणाली की, “ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांनी ४० वर्षांपूर्वी समाजकारण, राजकारण, लोकांची मानसिकता, महिलांशी केली जाणारी वागणूक यावर फार पुढे जाऊन ‘पुरुष’ या नाटकात भाष्य केले आणि २०२४ सालीदेखील ‘पुरुष’ या नाटकाची कथा जराही कालबाह्य वाटत नाही. खरे तर हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच समाजातील परिस्थिती बदलावी, यासाठी पुन्हा एकदा ‘पुरुष’ नाटक रंगभूमीवर येणे अत्यंत गरजेचे आहे.”

२००८ साली ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘अग्निहोत्र’ या मालिकेमुळे मराठी चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वाला मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, मृण्मयी देशपांडे असे अनेक सशक्त कलाकार लाभले. या मालिकेच्या आठवणींना उजाळा देताना स्पृहा म्हणाली की, “अग्निहोत्र’ या मालिकेत मी काम करत असताना महाविद्यालयात शिकत होते आणि त्यावेळी विक्रम गोखले, मोहन आगाशे, शरद पोंक्षे, शुभांगी गोखले, मोहन जोशी, इला भाटे, अविनाश नारकर या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे माझ्यासाठी अभिनयाचे वर्कशॉपच होते. जणू ते पण नक्कीच ‘अग्निहोत्र’ या मालिकेने मला एक नवी ओळख दिली आणि अभिनेत्री म्हणून माझ्यातील बरेच पैलू उलगडण्यास मदत झाली.”



Powered By Sangraha 9.0