‘किल्ले दुर्गाडी’च्या एका प्रतिवादीचे मनोगत

    14-Dec-2024
Total Views |
kille durgadi


कल्याणमधील किल्ले दुर्गाडी ही जागा महाराष्ट्र राज्य शासनाच्या मालकीची असून, त्यावर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी ‘मजलिस-ए-मुशायरा’ या संघटनेचा मालकी हक्क दावा फेटाळला. दि. 10 डिसेंबर रोजी या दाव्याचा निकाल लागल्याने सर्व श्री दुर्गाभक्तांना आनंद झाला आहे. हा खटल्यातील एक प्रतिवादी असलेल्या दिनेश देशमुख यांनी यानिमित्ताने मांडलेले त्यांचे मनोगत...

लहानपणापासून किल्ले दुर्गाडीवर तसे जाणे-येणे होतेच. त्यामुळे माझ्यासाठी हा अत्यंत मायेचा आणि श्रद्धेचा विषय. बौद्धिक, सांघिक आणि निरनिराळ्या उत्सवांच्या वेळी इतिहासावरील व्याख्याने आम्ही याच किल्ल्याच्या पटांगणात बसून ऐकली आणि तो इतिहास समजून घेतला.

कल्याणमध्ये इतिहासप्रेमी मंडळ होते. त्यांच्या बैठका मॉर्डन व्ही स्कूल येथे होत. या बैठकांमध्ये इतिहासतज्ज्ञ कै. विवेकानंद गोडबोले मार्गदर्शन करीत. त्यांनी ‘कल्याण सुभे’ हे पुस्तकदेखील लिहिले होते. या पुस्तकात कल्याणचा इतिहास गोडबोले यांनी विशद केला आहे. ते सांगतात, “ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी ‘गॅजेट’ लिहिली. पण, त्यात अशी चूक करून ठेवली की, काही वास्तू बघताना ती वास्तू त्यांना मंदिर आहे की मशीद, हे ठरविता आले नाही. त्या ठिकाणी ‘मोस’ असा शब्द प्रयोग केल्याने वादग्रस्त ठिकाणे उभी राहिली. त्यातील एक ‘किल्ले दुर्गाडी’ होय.”

दि. 24 ऑक्टोबर 1657 साली छत्रपती शिवाजी महाराज कल्याणात आले. त्यांनी किल्ले दुर्गाडीवर श्री दुर्गामातेची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याचे आरमार बांधण्यास सुरुवात केली. त्यावेळेपासून तिथे पूजाअर्चा विधी झालेली दिसते. दि. 15 ऑगस्ट 1947 सालचे झेंडावंदनही किल्ल्यावर झाले. दि. 1 मे 1960 रोजी किल्ल्यावर कार्यक्रमासाठी लोकांना येण्यासाठी सुलभ व्हावे, म्हणून मंदिराच्या मागील बाजूस सिमेंटच्या पायर्‍या, जिना करण्यात आला. शिवाजी चौकातून शोभा यात्रा काढण्यात आली. तिची सांगता किल्ले दुर्गाडीवर झाली. त्या कार्यक्रमास मी माझ्या वडिलांच्या बरोबर हजर होतो.

किल्ले दुर्गाडीवर आज पडझड झालेली दिसते. किल्ल्यावर एक मंदिर, एक भिंत, तिला असलेले भगदाड, तिच्या मागील बाजूस चितारलेली अबदागिरी. ‘कल्याण सुभे’ पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, या भिंतीवर मंदिराचे बाजूस मधोमध श्री गणपती आहे. थोडे खाली उतरल्यावर मंदिराच्या दक्षिण बाजूस एक विहीर होती. दर रविवारी सकाळी संघाचे सांघिक होऊन किल्ल्याची झाडलोट करून श्री दुर्गामातेची आरती करून आम्ही घरी येत असू. काही जण किल्ल्याच्या बाजूच्या विहिरीवर, खाडीवर पोहायला जात. नारळी पौर्णिमा, श्री रामनवमी जत्रेत भाविक मोठ्या संख्येने किल्ल्यावर येत. तेव्हा नारळ फोडून प्रसादाचे वाटप होई. श्री नवरात्रोत्सवाचे वेळी ‘किल्ले दुर्गाडी श्री नवरात्रोत्सव समिती,’ कल्याण शहर गायन समाज हॉलमध्ये बैठक घेत असे. पण, एका वर्षात अध्यक्ष पदावरून वाद झाला आणि बैठक घेण्याची प्रथा बंद झाली.

भजन, कीर्तन, प्रवचन, नाटक, शाहिरी कार्यक्रम, व्याख्यान व इतर कार्यक्रम मंदिराच्या मागील मैदानावर होत. कोजागरीला रात्री देवीची आरती होऊन दुधाचा प्रसाद दिला जाई. त्रिपुरी पौर्णिमेला संपूर्ण किल्ल्याच्या भिंतींवर सुद्धा पणत्या लावल्या जात. काही कारणाने ठाणे जिल्हाधिकारी यांच्या समोर मंदिर की मशीद, या विषयावर चौकशी झाली, तो कालावधी 1971, 1973 सालचा होता. या चौकशीत मुसलमान जमातीने ही वास्तू मशीद आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. हिंदूंनी मात्र ही वास्तू मशीद नसून मंदिरच आहे, या बाबतीत पुरावे सादर केले. कै. वामनराव साठे, कै. श्रीनिवास मोडक वकील, कै. भाऊसाहेब सबनीस, कै. म. ना. सहस्रबुद्धे यांनी कामकाज पाहिले. पण, किल्ल्यावरील भिंतीबाबतचे कोणतेही म्हणणे जिल्हाधिकार्‍यांनी ऐकून घेतले नाही.

1973 सालापर्यंत मुसलमान समाजाकडून किल्ले दुर्गाडीवर नमाज अदा केली जात नव्हती. मात्र, आदेश देताना तो असा दिला की, किल्ले दुर्गाडीवर दोन वास्तू असून, त्यातील एक मंदिर आहे, तेथे दैनंदिन पूजाअर्चा करण्याची हिंदू समाजाची परंपरा आहे. पूजाअर्चा करण्यास कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. दुसरी वास्तू इदगाह असून, तेथे वर्षातून दोन दिवस रमजान व बकरी ईदला नमाज अदा करण्यासाठी परवानगी आहे. कोणा नागरिकास जाहीर कार्यक्रम घ्यावयाचा असेल, तर ठाणे जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सन 1973 पासून मुसलमान नागरिक किल्ले दुर्गाडीवर नमाज अदा करू लागले. कै. कुमार तुंगारे अध्यक्ष असताना नवरात्रोत्सवामध्ये रमजान ईद आली असता, आदल्या दिवशीचे कार्यक्रम मैदानावर होऊन रात्री 12 नंतर नमाजासाठी तयारी सुरु केली. झाडाला त्यांचा चांदतारा झेंडा लावण्यात आला होता. नमाज चालू असतानाच पाच कावळे तिथे आले आणि त्यांनी चोचीने तो झेंडा काढला, ही बातमी त्यावेळी वर्तमानपत्रांंमध्येही प्रसिद्ध झाली होती.

किल्ला देखभालीसाठी कल्याण नगरपालिकेकडे आला. डागडुजी करून बुरुजांची कमान बुरूज दुरूस्ती व्यासपीठ तयार करण्यात आले. दि. 15 डिसेंबर 1974 रोजी नूतन मूर्ती शिलालेख प. पू. श्री गजानन महाराज पट्टेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे हस्ते स्थापना करण्यात आली. दिवसभर कार्यक्रम सुरू होता. संध्याकाळी बाबासाहेबांचे व्याख्यान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. व्यवस्थेची सर्व जबाबदारी सांस्कृतिक मंडळाने घेतली होती.

सन 1976 मध्ये अब्दुल हमीद अब्दुल गफुर फकीह आणि इतर यांनी ठाणे जिल्हा न्यायालयात एक दावा दाखल केला की, किल्ले दुर्गाडीबाबतीत शासनाने जो आदेश दिला, तो आम्हाला मान्य नाही. अपील सादर केले. त्याचा क्रमांक 75/1976 असा आहे. याची नोटीस वर्तमानपत्रात आल्यावर या दाव्याला विरोध करण्यासाठी कै. भगवानराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक श्री ज्ञानेश्वर मंदिरात झाली. या दाव्याला विरोध करण्यासाठी ‘हिंदू हितरक्षक समिती’ची स्थापना करण्यात आली. प्रतिनिधी म्हणून आनंत घाणेकर, मारोती रोकडे, गोपीनाथ घुमरे, रविंद्र पाटील, बालकृष्ण गोळे, मुकुंद वझे, विवेकानंद गोडबोले, धर्मजी घोलप, डॉ, मोरेश्वर प्रधान, अनंत कुलकर्णी यांच्या नेमणुका करण्यात आल्या व ते प्रतिवादी झाले. जाबजबाब सुरू झाले.

किल्ल्याची पडझड सुरुच होती. कोणी लक्ष देईना. तेव्हा ‘नगरवार्ता’ने आवाज उठवला. सन 1994 मध्ये दुर्दैवाने बुरुज ढासळला. किल्ले दुर्गाडीवर कारसेवा करण्यासाठी ‘शिव समर्थ क्रीडा मंडळ’, ‘महाराष्ट्र रिक्षा सेना’, ‘विजय तरूण मंडळ’, ‘जय भवानी क्रीडा मंडळ’, ‘रोहिदास ज्ञाती समाज’ ही मंडळी एकत्र येऊन त्यांनी श्रीगणेश चतुर्थीपासून किल्ला दुरूस्तीसाठी कारसेवा करण्याचे निश्चित करून जाहीर केले. दि. 17 ऑगस्ट 1994 रोजी प्रतिवादी डॉ. मोरेश्वर प्रधान यांनी कोर्टातून बांधकाम दुरूस्तीसाठी परवानगी आणून महानगरपालिकेने दुरूस्ती केली. किल्ले दुर्गाडी व किल्ले श्री मलंगगडकरिता धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ‘हिंदू मंच, ठाणे जिल्हा’ची स्थापना केली. सन 1984 पासून नमाज चालू असताना श्री देवीची पूजाअर्चा करण्यास बंदी घातल्याने घंटानाद आंदोलन उभे राहिले.

कल्याण जिल्हा न्यायालय सुरू झाल्यावर हा दावा वर्ग झाला, तो कधी झाला? त्याचा क्रमांक काय? काहीच समजेना. घंटानाद दावाच्या तारखेला यावे लागे. त्यावेळी अनेक वकिलांशी बोलणे झाले, तेव्हा भिकाजी साळवी यांच्याबरोबर काम करणारे वकील एन. टी. बेंद्रे यांनी शोधमोहीम यशस्वी करून वकील भिकाजी साळवी यांनी 16 जणांच्या वतीने प्रतिवादी होण्यासाठी अर्ज केला. त्याचप्रमाणे, वकील सुरेश पटवर्धन यांनी सहा जणांच्या वतीने अर्ज केला. या दोन्ही अर्थांनी न्यायालयाने मान्यता दिली. ही मान्यता मिळेपर्यंत मूळ दाव्यातील एकुलते एक हयात असलेले प्रतिवादी रविंद्र पाटील यांचे वकीलपत्र भिकाजी साळवी यांनी घेऊन हा दावा लढला. वादींनी हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालविता, ‘वक्फ बोर्डा’कडे वर्ग करण्यासाठी मागणी केली असता, ती मागणी न्यायालयाने फेटाळली होती.

नूतन मूर्ती स्थापना होऊन 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने किल्ले दुर्गाडीवरील श्री दुर्गामाता मंदिरात रविवार दि, 22 डिसेंबर 2024 श्री सत्यनारायण पूजा होणार आहे. या संपूर्ण न्यायालयीन लढाईत कै. श्रीनिवास तथा भाऊसाहेब मोडक वकील, कै. उदय मोडक वकील, कै. पिंपळे वकील, कै. म. ना. सहस्रबुद्धे, भिकाजी साळवी वकील, जयेश साळवी वकील, सुरेश पटवर्धन वकील, एन. टी. बोंद्रे वकील व सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

आता 1973 सालच्या आदेशानुसार सामान्य नागरिकांस संपूर्ण किल्ला फिरण्याची अनुमती व जाहीर धार्मिक कार्यक्रम करण्यास मुभा असावी, हीच अपेक्षा.


दिनेश देशमुख 
8108244168