बांधकामक्षेत्राची २०३०कडे भरारी

14 Dec 2024 09:55:53

construction
 
जागतिक बांधकाम क्षेत्र २०३० सालापर्यंत ४.५ ट्रिलियनने वाढून १५.२ ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. उद्योग कौशल्य आणि प्रगत डेटाच्या विश्लेषणाद्वारे बांधकाम क्षेत्रात भविष्यातील धोरणात्मक दिशा आखणे शक्य होणार आहे. भविष्यकालीन दृष्टिकोन निश्चित केल्यामुळे आज अनेक प्रगतशील आणि विकसनशील देश आपली अर्थव्यवस्था मजबूत करत असताना, बांधकाम अर्थसंकल्प आणि मुख्य पायाभूत प्रकल्पांवरील खर्चाचा विस्तार करत आहेत. यामुळे वर्षानुवर्षे केवळ चर्चेत असणारे अनेक नियोजित आणि आव्हानात्मक प्रकल्प आज मार्गी लागताना दिसतात. तथापि, बांधकाम उद्योग अजूनही जागतिक स्तरावर चढ-उताराने होणार्‍या प्रभावामुळे त्रस्त आहेत. यात ‘कोरोना’ साथीच्या आणि युक्रेनमधील संघर्षाचा समावेश आहे. या दोन्ही कारणांमुळे नागरिक, पुरवठा साखळी आणि अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. यामुळे आज अक्षरशः प्रत्येकच बांधकाम प्रकल्प मग ते निवासी, व्यावसायिक, औद्योगिक किंवा पायाभूत सुविधा बांधकाम प्रकल्प असो हे ३० वर्षांहून अधिक काळातील महागाईचा उच्चांक आणि कर्मचारी वर्गाच्या महत्त्वपूर्ण संकटामुळे प्रभावित झाले आहेत.
 
आज जागतिक स्तरावर बांधकाम कंपन्या कठीण जोखमीसह कार्यरत आहेत. प्रकल्प उभारणीत सामग्रीच्या खर्चाचा अंदाज लावण्यासाठी पूर्वी वापरल्या जाणार्‍या गृहीतकांमध्ये किमतींची अनिश्चितता लक्षणीयरित्या व्यत्यय आणत आहे. परिणामी, नवीन प्रकल्पांसाठी अंदाजपत्रक आणि आकस्मिक परिस्थितींचा अंदाज घेणे दोन्ही अत्यंत कठीण होते. जास्त किंमत, साहित्य विलंब आणि कुशल कामगारांची कमतरता यामुळे निर्माण करारातील प्रकल्प कालावधी चुकण्याची चिंताही वाढते. यामुळे प्रकल्पांसाठी सामान्य कंत्राटदार आणि वितरण यंत्रणा निवडण्याच्या मालकांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होताना दिसतो. मात्र, अशी अनेक आव्हाने असूनही उच्च महागाई, खर्च आणि पुरवठा अनिश्चिततेचा सामना करताना बांधकाम उद्योग आणि त्याचे भागधारक लवचिक असल्याचे सिद्ध झाले आहे. बांधकाम उद्योगाला जोखमीतून बाहेर काढण्यासाठी आणि लवचिकता धोरणे तयार करण्यात उत्तम डेटा, माहिती आणि टूलसेट उपलब्ध आहेत.
 
बांधकाम प्रकल्पांना, विशेषत: मोठ्या प्रकल्पांना, विविध टप्प्यांवर उपकंत्राटदारांचाही आधार घ्यावा लागतो. बर्‍याच वेळा, एकंदरीत प्रकल्पाची प्रगती ही या उपकंत्राटदारावर अवलंबून असते. हे आवश्यक साहित्य आणि कुशल कर्मचारी नियुक्त केलेल्या स्लॉट दरम्यान काम पार पाडतात, ज्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होते. यासह बर्‍याच कंपन्यांमध्ये ‘एंटरप्राईझ रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम’ अस्तित्वात आहे. ही प्रणाली असतानाही काही कंपन्या ‘प्रोजेक्ट रिस्क मॅनेजमेंट (झठच) सिस्टीम’चा वापर स्वीकारतात. यामुळे वेळेत जोखीम ओळखून त्यावर मात करत प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतो. ‘पीआरएम’ प्रणाली उपकंत्राटदारांचे कार्य प्रदर्शन समस्या ओळखते. या प्रणालींमुळे मालक आणि कंत्राटदारांना रिअल टाईममध्ये आव्हानांना तोंड देणे शक्य होते. यामुळे प्रकल्प विलंबामुळे खर्चास कारणीभूत ठरणार्‍या घटकांची जोखीम कमी होते.
 
महागाई आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी नजीकच्या काळातील दृष्टिकोन धूसर झाला आहे. तथापि, ‘ऑक्सफर्ड इकोनॉमिक्स’ने नव्याने प्रकाशित केलेल्या ‘फ्यूचर ऑफ कन्स्ट्रक्शन’ जागतिक बांधकाम उद्योगच्या जागतिक अंदाजामध्ये, कोरोनानंतर बांधकाम क्षेत्र उत्पादन आणि सेवा क्षेत्रांच्या भरभराटीसाठी सज्ज झाले आहे. हवामान बदल, त्याचे धोके आणि संधी हे बांधकाम उद्योगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, जागतिक स्तरावरून होत असलेल्या ‘ग्रीन फायनान्सिंग’मुळे शाश्वत विकासाची जोड मिळत अधिक ‘हरित प्रकल्प’ शक्य होत आहेत.
 
दोषपूर्ण डिझाईन, खराब कारागिरी, नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव कंपनीच्या कामावर लक्षणीय परिणाम करू शकतो. म्हणूनच खर्च आणि प्रक्रियेच्या वेळा कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत काम चालू ठेवता येईल. भविष्यात तत्सम आव्हानांचा धोका कमी करण्यासाठी नुकसानाची कारणे ओळखणे आणि समस्येचे निराकरण करणे देखील महत्त्वाचे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0