
पुणे : सरहद आयोजित आगामी पहिले अभिजात आणि ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून कात्रज येथील सरहद स्कूल (सीबीएसई) या शाळेमध्ये कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ बाल साहित्यिक पुरस्काराने गौरव, पुणे जि. प. तसेच अनेक सामाजिक संस्था कडून आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री अरविंद पाटोळे हे प्रमुख पाहुणे होते. या पुरस्कारांबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, भारत इतिहास संशोधन मंडळ याचे आजीव सदस्य, तसेच विविध नाट्य स्पर्धांचे संस्थापक व परीक्षक म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे, प्रौढ शिक्षण व खडूफळा योजनांच्या पुस्तक परीक्षण समितीत सहभागी होते. कथेतून बालचमूंच्या मनावर भूतदयांवर प्रेम करा हा संदेश रुजवला. त्यांच्या कथाकथन शैलीतून केलेल्या वातावरण निर्मितीचा इयत्ता तिसरीच्या उपस्थित विद्यार्थी वर्गाने मनमुराद आनंद लुटला. "आजच्या कथेतून विविध गोष्टी शिकायला मिळाल्या आणि प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमामुळे आमच्या विचारशक्तीला चालना मिळाली, आणि कथाकारांच्या अभिनयाने मनापासून आनंद दिला. असा कार्यक्रम आम्हाला वारंवार अनुभवायला मिळावा, कारण ते आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात आणि कथेतून शिकवण देतात." असे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. मनोरंजनासोबत शैक्षणिक दृष्टिकोनातूनही साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला. कथाकथनामधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळाली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कविता वानखेडे, पर्यवेक्षिका दिपाली कोंडे, विद्या भोसले, पौर्णिमा कदम, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुजाता सगरी यांनी, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मेघा क्षीरसागर यांनी केले.