गारठा पुन्हा वाढला नाशिक @ ९.४

11 Dec 2024 15:17:18
Nashik

नाशिक : दोन दिवसांच्या बेमोसमी पावसामुळे शहरातून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये ( Nashik ) गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वातावरणात चांगलाच गारवा वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिकचा पारा सारखा खाली सरकत असल्याचे दिसून येत आहे. रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी १२.५ अंश असलेले तापमान सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी ३ अंशांनी घसरुन ९.५ अंशांवर आले. तर मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी पारा आणखी खालावत ९.४ अंशावर पोहोचला.

सलग तीन दिवस घसरलेल्या पार्‍यामुळे नाशिककरांना रात्रीसोबत दिवसाही चांगलीच हुडहुडी भरल्याचे दिसून येत आहे. बुधवार, दि. १८ डिसेंबर रोजीपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. समुद्र सपाटीपासून वरून खाली टप्प्याटप्प्याने सरकलेले वेगवान पश्चिमी अतिथंड कोरड्या वार्‍यांचा झोत आणि उत्तर भारताकडून दक्षिणेकडे ३७ अंश तर उत्तरेकडून १९ अंश उत्तर अक्षवृत्तपर्यंत रुंदावल्यामुळे थंडी वाढल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे पहाटे ५ वाजेच्या दरम्यान किमान तापमानाचा पारा घसरल्याचेही सांगण्यात येत आहे.

निफाडला निच्चांकी तापमान

प्रत्येक वर्षी थंडीला सुरुवात झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात होत असते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या द्राक्षबागांमुळे येथे कडाक्याची थंडी पडत असल्याचे सांगण्यात येते. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी निफाडमध्ये कमाल तापमान २५.९ अंश, तर किमान तापमान ८.९ अंश असल्याची नोंद झाली.

द्राक्ष पिकाला धोका

कांदा आणि गहू पिकाला फायदेशीर असणारी थंडी द्राक्ष पिकाला मारक ठरत आहे. जिल्ह्यातील नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे द्राक्ष पिक धोक्यात आले आहे. वाढत्या थंडीचा प्रतिकूल परिणाम द्राक्षांवर जाणवायला लागला आहे. मण्यांना तडे जाणे तसेच, फुगवण थांबल्याचे प्रकार घडत आहे. त्याचप्रमाणे पाने पिवळी पडणे, वेलींची वाढ थांबण्याबरोबरच ‘भूरी’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे औषधांचा खर्च वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

फेंगल वादळाचा परिणाम

बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल वादळ निर्माण झाल्याने राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला होता. त्यामुळे ढगाळ हवामानामुळे उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणार्‍या थंड वार्‍यांचा परिणाम कमी झाला. परिणामी राज्यात काही काळ दमट आणि उष्ण हवामान निर्माण झाले होते. आता ढगाळ वातावरण आणि पाऊस गेल्याने जिल्ह्यात थंडी परत आली असून, त्यामुळे पुन्हा एकदा हुडहुडी भरु लागली आहे.

कमाल तापमान वरखाली

रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी २९.५ तर सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी २६.५ कमाल तापमान नोंदवले गेले. त्याचप्रमाणे मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी २७ अंशांची नोंद झाली. त्यातच अति उंचीवरील वार्‍यांच्या झोताबरोबरच जमीन पातळीवरही समुद्र सपाटीपासून दिड किमी उंचीपर्यंत वायव्य दिशेकडून येणारे वारे थंड आणि कोरडे वाहत आहेत. याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याने नाशिक जिल्ह्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे.

Powered By Sangraha 9.0