नाशिक : ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशा घोषणांनी नाशिकचा ( Nashikkar ) आसमंत दणाणून सोडत हिंदू एकवटल्याचे दिसून आले. निमित्त होते बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील अत्याचाराविरुद्ध काढण्यात आलेल्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रा अर्थात मोर्चाचे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी सकाळी शहरातील सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि मानवाधिकार आयोगाला आपले कर्तव्य समजावून सांगण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
बांगलादेशचे हंगामी अध्यक्ष मोहम्मद युनूस यांच्याकडून तेथे रहिवास करणार्या हिंदूंच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात न आल्याने त्याविरोधात शहरातील हिंदूंकडून हा मोर्चा काढण्यात आला. नाशिक मध्यच्या आ. देवयानी फरांदे आणि पश्चिमच्या आ. सीमा हिरे मोर्चाच्या अग्रभागी होत्या. यावेळी बांगलादेशमधील हिंदूंच्या हत्या थांबवा, अन्यथा परिणाम गंभीर असतील. मानवाधिकार कुठे आहे? बांगलादेशातील हिंदू विचारत आहेत. हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही निर्धारपूर्वक उभे आहोत. जात-पात सोडू हिंदू म्हणून एक होऊया अशा घोषवाक्यांचे फलक प्रत्येक हिंदूंच्या हातात झळकत होते. ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना’ बांगलादेश येथे हिंदूंचा सुरु असलेल्या नरसंहारावर गप्प का? असा सवालही मोर्चावेळी उपस्थित करण्यात आला.
तसेच शांततेचे ‘नोबेल पारितोषिक’ विजेते बांगलादेशचे हंगामी अध्यक्ष मोहम्मद युनूस यांनीही आपले काम चोख बजावावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बी. डी. भालेकर हायस्कूलपासून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये तरुण, तरुणी, महिला, पुरुषांबरोबरच ज्येष्ठांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच साधु महंतांबरोबरच लोकप्रतिनिधीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. पुढे हा मोर्चा शिवसेना भवन, शालीमार, दिपसन्स कॉर्नर, नेहरु गार्डन, सांगली बँक सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नलवरुन पुढे जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सांगता करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू बांधव आणि भगिनींनी काळी फीत बांधून बांगलादेश सरकारचा निषेध केला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
अतिशय शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रा अर्थात मोर्चाला गालबोट लागून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. तसेच वाहतूक शाखेकडून मोर्चाला अडथळा ठरेल असे मार्ग काही काळ रहदारीमुक्त करण्यात आले होते. मोर्चात सहभागी झालेल्या हिंदूंकडूनही सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदू एकत्र
बांगलादेश येथे हिंदूंवर सुरु असलेला अन्याय आणि अत्याचार तातडीने थांबविण्यात आला पाहिजे. यासाठी नाशिक शहरामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सगळे संत महंत आणि नाशिककर स्वतःहून जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले. हिंदूंच्या रक्षणासाठी आज सर्व हिंदू एकत्रित आले आहेत. तसेच बांगलादेश हा धर्माच्या आधारावर वेगळा झालेला भारताचाच एक भाग आहे. परंतु, आज बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित नाही. शांततेचे नोबेल मिळालेल्या काळजीवाहू अध्यक्ष मोहम्मद युनूस यांनी तातडीने हा नरसंहार थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्या. अटक करण्यात आलेल्या संतांची सुटका करून हिंदूंच्या मंदिरांवरील हल्ले आणि महिलांवरील अत्याचार तातडीने थांबविण्यात आले पाहिजे.
देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य
बांगलादेशच्या वस्तूंवर बहिष्कार टाका
बांगलादेशमधून भारतात येणार्या सर्वच वस्तूंवर नाशिककरांनी बहिष्कार टाकला पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही, हा आजपासून आपण प्रण करुन आपण हिंदू बांधव एक राहू. ‘एक हैं तो सेफ हैं’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देत आम्ही बांगलादेशातील हिंदूंच्या सोबत आहोत. तसेच नाशिककरांनी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत हिंदूंची ताकद दाखवून दिली आहे.
सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम
हिंदूंवर अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी
बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरील अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि ‘इस्कॉन’चे आचार्य चिन्मयदास यांच्यावर केलेल्या अत्याचाराविरोधात तसेच हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबविण्यात यावे, याकरिता नाशिकचे सर्व मठ, मंदिरांचे व्यवस्थापक, धर्म पंडित यांसह हिंदू नाशिकच्या पावन भूमीत एकत्र आले आहेत. तसेच हिंदूंवर अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच पावले उचलतील यात काहीच शंका घेण्याचे कारण नाही. बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरील अत्याचार थांबविण्यासाठी ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील.
आचार्य भक्तीचरणदास, महंत, पंचमुखी हनुमान मंदिर