सावधान... मुंबईकरांनो तुमचा जीव धोक्यात

11 Dec 2024 14:05:36

kurla


मुंबई, दि.११:  
कुर्ला येथे बेस्ट बस दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील रहदारीच्या ठिकाणांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूना रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी अनधिकृत वाहने, पदपथावर लावण्यात येणारी अनधिकृत दुकाने आणि अनधिकृतरित्या उभारण्यात येणारे व्यवसाय यांचा विळखा मुंबईतील रस्त्यांच्या भोवती घट्ट होताना दिसतो आहे. विशेषतः रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात अशी अनधिकृत कारवायांमुळे स्थानकांकडे जाणारे रस्ते निमुळते झाले आहे. अशातच बेस्ट चालकांना या स्थानकांच्या परिसरातून बस चालवताना कसरत करावी लागते तर पादचाऱ्यांना फुटपाथच नसल्याने जीव मुठीत धरून रस्त्यांवरून चालावे लागत असल्याचे चित्र मुंबईत वर्दळीच्या ठिकाणी दिसून येते. हीच सद्यस्थिती दाखवणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.

कुर्ला रेल्वे स्थानक

रात्री साडेनऊच्या सुमारास एक भरधाव बेस्ट बस आली आणि काही मिनिटांत रस्त्यावर रक्ताचा आणि मृतदेहांचा खच पडला. किंकाळ्या, आक्रोश, मदतीसाठी स्थानिकांची धावपळ असं चित्र कुर्ला रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री रस्ता, कुर्ला पश्चिमला सोमवार रात्री १०च्या सुमारास होते. याघटनेचे प्रत्यक्षदर्शी सांगतात, ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.त्यावेळी इथे रोजच ट्राफिक असते. मात्र ही बस भरधाव आली आणि माणसांना, गाडयांना उडवत पुढे गेली. याभागात कायमच ट्राफिक असते. रात्रीच नाही तर दिवसभर रहदारी असते. इथे शाळा आहे मात्र इथे ही अतिक्रमण हटवायला ना बीएमसी येते ना आरटीओ, आमच्या परिसरातील मुळेच गर्दीच्या वेळी ट्राफिक हटवतात. या दुर्गठाणेनंतर आमची एकच मागणी आहे की, इथे एखादा आरटीओ हवालदार दिवसभर असावा. दिवसभर नाहीतर किमान मुलांच्या शाळा सुटतात तेव्हातरी इथे ट्राफिक पोलीस असावेत.
आमचं बालपण इथे गेले आहे. इथे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. मात्र कोणीही ट्राफिक पोलीस इथे फारकत नाही. अंजुमन इस्लाम शाळा आहे त्याच्या पुढे एक नर्सरी आहे. शाळा सुटल्यावर त्या लहान मुलांची गर्दी होते. इथे एक ट्राफिक हवालदार कायमस्वरूपी असायलाच हवा अशी आमची मागणी आहे. इथे कोणाच्याही गाड्या येतात आणि पार्किंग केल्या जातात. आम्ही स्थानिक बोललो तर बाहेरची लोक येऊन गुंडागर्दी करतात. त्यामुळे पोलिसांनीच यावर लक्ष द्यावे. पूर्वी लार्सन टुब्रो, टाटा यांच्या बस धावायचा कधी एक अपघात झाला नाही. मात्र आता या अवाढव्य बस त्यावर कंत्राटी कर्मचारी यामुळे या अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

- हारून पठाण, स्थानिक
-----------------
घाटकोपर रेल्वे स्थानक

घाटकोपर रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरतील आणखी एक वर्दळ असणार स्थानक आहे. अशातच मेट्रो एकला या स्थानकांची जोड असल्याने मोठ्या संख्येने याठिकाणाहून दैनंदिन प्रवासी ये-जा करतात. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी तर रिक्षा स्टॉप, बस स्टॉप या दोन्ही ठिकाणी प्रवाशांचा रांगा लागतात. अशातच रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे याभागात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिक व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवासी सांगतात.
मी साकीनाकामध्ये राहतो. नेहमीच आमचा प्रवास याच मार्गावरून होतो. दररोज दहा-पंधरा लाख प्रवासी इथून प्रवास करत असतील. अशावेळी इथे मार्केट लागत, रिक्षा कशाही उभ्या असतात, त्यामुळे ट्राफिक होते. टॅक्सीवाले, रिक्षावाले प्रचंड मनमानी करतात, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.

-चैतन्य बागुल, प्रवासी, साकीनाका

इथे प्रशासन कारवाई करते. फुटपाथ मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र इथे दुचाकी, चारचाकी वाहनांचा ओघ जास्त आहे. दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. त्यामुळे ये जा करणाऱ्यांना त्रास होतो. याचे नियोजन केले पाहिजे.

- तुषार पाटणे, फुलविक्रेता, घाटकोपर पश्चिम

शिवडी रेल्वे स्थानक

हार्बर मार्गिकेवरील शिवडी एक महत्वाचे स्थानक आहे. शिवडी रेल्वे स्थानकाबाहेर लागूनच बेस्ट बसचा डेपो आहे. याठिकाणाहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्यांची गर्दी असते. याच स्थानकाबाहेर काही अंतरावरच शिवडी-वरळी जोडरस्त्याचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे बॅरिकेट लावण्यात आले आहे. विशेषतः संध्याकाळी याठिकाणी फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर भाजीवाले आणि स्ट्रीट फूडचे स्टॉल लागतात. त्यामुळे स्थानकाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यांवरून जीव मुठीत धरून चालत जावे लागते. नाव न छापण्याच्या अटीवर एका बेस्ट बस चालकाने सांगितले की,"प्रामुख्याने या पुलाच्या कामामुळे इथे बस वळविणे अवघड झाले आहे. अशातच संध्याकाळच्या वेळी लोकांना चालायला फुटपाथ नसल्याने स्थानच्या दिशेने जाणारे लोक रस्त्यावरूनच चालत असतात. त्यामुळे आम्हालाही अत्यंत सावकाश बस चालवावी लागते. खरंतर इथे पालिकेने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे."
आम्ही मागील ३० वर्षांपासून याचभागात रहीवासी आहोत. सकाळी आणि दुपारी नाही मात्र संध्याकाळी इथे एकाबाजूला भाजीवाले, पाणीपुरीवाले, चहा, भेळ असे सगळे फेरीवाले फुटपाथवर असतात. मागील चार पाच वर्षात या फेरीवाल्यांची संख्या वाढतेच आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. एका बाजूला पुलाचे काम सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला हे फेरीवाले असतात. त्यामुळे रस्त्यावरून चालताना बस, टॅक्सी अगदी खेटून जातात. याठिकाणी मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहते आहे का?
- सुजाता कदम, स्थानिक रहिवासी, शिवडी

दादर रेल्वे स्थानक

दादर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सार्वधिक व्यस्त स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या स्थानकाच्या दोन्ही बाजूला बेस्ट बस आणि टॅक्सीसाठी गर्दी असते. दादर पूर्वला पुरेशी जागा असल्याने याठिकाणी स्थानकाच्या बाहेरच वडाळा उद्योग भवन, नायगाव, टाटा रुग्णालय आणि केईएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या बस लागतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या रांगा पुढे जातात. मात्र टॅक्सीचालकांचा विळखा या परिसरात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे दादर पश्चिमकडे फुल मार्केट परिसरात वरळी, प्रभादेवी त्यादिशेने जाणाऱ्या बेस्ट बसेस लागतात. फुल मार्केट हा परिसर वर्दळीचा असल्याने प्रवाशांनी याभागात भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता उपस्थित केली आहे.
मी गेली दोन वर्षे येथून बेस्ट बसने प्रवास करतोय. दादर ते वरळीगाव असा प्रवास मी करतो. दादरच्या याभागात प्रचंड गर्दी असते. अपघाताच्या शक्यता खूप जास्त आहे. तरीही बेस्टचे चालक याभागातून सुरक्षित बस चालवतात त्यासाठी त्यांना सलामच केला पाहिजे. सणासुदीला तर खु गर्दी असते. प्रशासनाने हा स्टॉप थोडा पुढे घ्यावा किंवा या मार्केटविषयी काहीतरी निर्णय घ्यावा.

-दीपक कराडे, वरळी

मी दीड वर्ष झाले याठिकाणहून प्रवास करते आहे. सध्या मार्गशीर्ष महिना सुरु आहे. बुधवारी याभागात प्रचंड गर्दी असते. अशातच अनेकदा अतिक्रमण हटविणारी पालिकेची गाडी येथे त्यावेळी येथे खूप पळापळ होते. अनेकदा चेंगराचेंगरीही होते. भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नक्कीच इथे नाकारता येणार नाही. प्रशासनाने हे गांभीर्याने घ्यावे इतकीच आमची विनंती आहे.
- गौरी भगत, दैनंदिन प्रवासी
Powered By Sangraha 9.0