वन विभागाचा ‘आयर्नमॅन’

11 Dec 2024 23:09:29
 
Mayur Bothe
 
ध्येयावर निष्ठा ठेवून काम करणारी माणसे ध्येयपूर्तीचा प्रवास करतात. वन विभागातील नोकरी सांभाळून ‘आयर्नमॅन’ हा आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय किताब मिळवणारे साहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे यांच्याविषयी...
 
मयुर बोठे यांचा जन्म दि. 4 डिसेंबर 1989 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात झाला. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण हे पुण्यात, नववी-दहावीचे शिक्षण अहिल्यानगरमध्ये, अकरावी-बारावीचे विज्ञान शाखेतील शिक्षण लोणीमध्ये, कृषिशास्त्रातील पदवीचे शिक्षण कोल्हापूरमध्ये आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण राहुरीमध्ये झाले. पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणादरम्यानच बोठे यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) परीक्षेची तयार सुरू केली होती. 2023 साली शिक्षणाच्या दुसर्‍या वर्षात असतानाच ते ‘एमपीएससी’ उत्तीर्ण झाले. चार भिंतींमध्ये बंद असलेली नोकरी नको, हा निश्चय करून संरक्षण आणि साहसी नोकरी हवी म्हणून वन विभागात काम करायचे ठरवले. 2013-15 या कालावधीत कोईम्बतूर येथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आणि 2015 साली ते वन विभागात रुजू झाले. त्यांची पहिलीच नियुक्ती आव्हानात्मक होती. कारण, नव्यानेच स्थापन झालेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारीपदी काम करण्याचे आव्हान त्यांना वरिष्ठांनी दिले होते.
 
प्रत्येकी एक वनपाल आणि वनरक्षक घेऊन बोठे यांनी अभयारण्याच्या बांधणीला सुरुवात केली. अभयारण्याला लागून असणार्‍या गावांमधील गावकर्‍यांची मूठ बांधून निसर्ग पर्यटनाच्या कामाला सुरुवात झाली. गावकरी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करून ‘फ्लेमिंगो बोट सफारी’सारखा उपक्रम सुरू केला. वरिष्ठांनी दिलेले 20 लाख रुपये महसुलाच्या ध्येयापुढे जाऊन अभयारण्याच्या निसर्ग पर्यटनामधून 25 लाख रुपयांचा महसूल मिळवला. त्यानंतर 2019 साली त्यांची बदली शहापूर तालुक्यातील वाशाला वनपरिक्षेत्रामध्ये झाली. त्यावेळी तिथे वर्षाकाठी 100 हून अधिक वणवे लागत असत. बोठे यांनी कर्मचार्‍यांच्या मदतीने नियोजनात्मक पद्धतीने वणव्यांची संख्या 24 वर आणली. 2020 साली त्यांना ‘साहाय्यक वनसंरक्षक’ या पदावर पदोन्नती मिळाली आणि पुणे प्रादेशिक वन विभागात ते रुजू झाले.
 
पुण्यात ‘साहाय्यक वनसंरक्षक (सांख्यिकी)’ या पदावर काम करताना बोठे यांच्याजवळ बारामती, मुळशी आणि मावळ या तीन तालुक्यांचा कार्यभार होता. बारामती आणि मुळशी तालुक्यात त्यांनी निसर्ग पर्यटनाच्या अनेक प्रकल्पांचे काम हाती घेतले. वन विभागाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये बोठे हे अव्वल होते. त्यातून ‘आयर्नमॅन’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे बीज रोवले गेले. बोठे यांचे सहकारी असलेले ‘साहाय्यक वनसंरक्षक’ दिपक पवार यांनी हे बीज रोवले. याचदरम्यान दि. 1 जून 2023 रोजी पुण्याचे तत्कालीन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी बोठे यांना त्यांच्यासोबत महिन्याभरानंतर 20 किमी धावण्याचे आव्हान दिले. बोठे यांनी हे आव्हान इतके मनावर घेतले की, अगदी 13 दिवसांनी त्यांनी 21 किमी अंतर सलग धावून पूर्ण केले. यातून ‘आयर्नमॅन’ स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा आत्मविश्वास मिळाला. लागलीच गायकवाडांच्या मार्गदर्शनाखाली सखोल प्रशिक्षणाला सुरुवात झाली. बारामती पॉवर मॅरेथॉन धावण्याचा निर्णय झाला. गायकवाडांनी 32 किमी पळण्याचे आव्हान बोठे यांना दिले. मात्र, 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन बोठे पळाले. 32 किमीची गोवा मॅरेथॉन धावले. दुखापत झाली. त्यामुळे मुंबई मॅरेथॉन हुकली. दुखापत झाल्यावर निराशा आली. आता 2024 साली ऑगस्ट महिन्यात एस्टोनियामध्ये होणार्‍या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत सहभागी होण्याचे ध्येय ठेवून त्यांनी निराशेवर मात केली.
 
बोठे यांच्या कठोर प्रशिक्षणाला सुरुवात झाली. ‘आयर्नमॅन’ ट्रायथलॉन म्हणजे 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकल चालवणे आणि 42.2 किमी धावणे असे महाकठीण आव्हान. बोठे यांचे प्रशिक्षण हे पूर्ण ट्रायथलॉनमध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांसोबत सुरू होते. त्यातून पूर्ण ट्रायथलॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला. पोहण्याचे कसब बोठे यांनी अवघ्या एक-दीड महिन्यांमध्येच मिळवले. एस्टोनियाच्या व्हिसाकरिता अर्ज केला. मात्र, तांत्रिक कारणामुळे अर्ज रद्द झाला. त्यामुळे एस्टोनिया ‘आयर्नमॅन’ स्पर्धेचे स्वप्न हुकले. आता पुढे काय, असा प्रश्न निर्माण झालेला असताना बोठे यांना ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर 2024 मध्ये होणार्‍या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेचे वेध लागले.
 
पुन्हा जोमाने तयारी सुरू झाली. अडीअडचणींनंतर व्हिसा मिळाला. ऑस्ट्रेलियातील प्रवासदेखील अडीअडणींचा ठरला. आता स्पर्धेमध्ये तरी कोणतेही विघ्न येऊ नये, अशी आशा बोठे यांनी बाळगली असतानाच बदललेल्या हवामानाने या आशेवर पाणी सोडले. सलग 17 तासांत पोहणे, सायकलिंग करणे आणि धावण्याचे ध्येय पूर्ण करण्याचे दिव्य त्यांच्यासमोर होते. पोहण्याच्या दरम्यान समुद्राच्या लाटांचे रौद्र रुप बोठे यांनी पाहिले. सायकलिंग करताना करताना उलटे वारे आणि पावसाने त्यांना घेरले. धावताना थंडीने गाठले. मात्र, अनेकांच्या आशा आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवून 13 तास, 22 मिनिटांमध्ये बोठे यांनी हे आव्हान पूर्ण केले आणि ‘आयर्नमॅन’चा किताब मिळवला. या पूर्ण प्रवासात वरिष्ठ वनाधिकारी (एन. आर. प्रवीण, भा.व.से., राहुल पाटील, भा.व.से., तुषार चव्हाण भा.व.से., सुरेश साळुंखे, म.व.से.), प्रशिक्षक यांच्यासोबत बोठे यांना त्यांची पत्नी काजल कासार-बोठे हिची भक्कम साथ मिळाली. घरात वर्षभराचे तान्हे बाळ असताना काजल यांनी तक्रारीचा सूर आळवला नाही. बोठे हे ‘आयर्नमॅन’चा किताब मिळवणारे वन विभागातील पहिले ‘साहाय्यक वनसंरक्षक’ ठरले आहेत. त्यांनी पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0