आत्महत्या की हत्या?

11 Dec 2024 23:33:02
 
 
Atul Subhash suicide case
 
 
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण. अतुल यांच्यावर त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिने ‘498’, ‘323’, ‘504’, ‘506’ आणि हुंडाविरोधी कायद्यान्वये जौनपूर, उत्तर प्रदेश येथे गुन्हे दाखल केले होता. निकिता हिने घरगुती हिंसा, हुंडा मागणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध असे अनेक आरोप अतुल यांच्यावर लावले होते. या सगळ्यांनी त्रस्त होत आणि खचून जात अतुल यांनी आत्महत्या केली.
 
“ ‘498 अ’ हे कलम पत्नी आणि तिच्या नातेवाईकांसाठी प्रतिशोध घेण्याचे हत्यार बनले आहे,” असे मत न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायाधीश कोटेश्वर सिंह यांनी व्यक्त केले होते, तर न्यायाधीश बी. आर. गवई यांनीही ‘498 अ’बद्दल मत मांडले की, घरगुती हिंसा आणि ‘498 अ’ या कायद्याचा सर्वाधिक दुरुपयोग होत आहे. वेळोवेळी अनेक न्यायाधीशांनी या कायद्यासंदर्भात अशीच मते नोंदवली आहेत. ‘498 अ’ किंवा घरगुती हिंसा कायद्याचा संदर्भ देण्याचे कारण म्हणजे, अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण. अतुल यांच्यावर त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिने ‘498’, ‘323’, ‘504’, ‘506’ आणि हुंडाविरोधी कायद्यान्वये जौनपूर, उत्तर प्रदेश येथे गुन्हे दाखल केले होता. निकिता हिने घरगुती हिंसा, हुंडा मागणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध असे अनेक आरोप अतुल यांच्यावर लावले होते. या सगळ्यांनी त्रस्त होत आणि खचून जात अतुल यांनी आत्महत्या केली.
 
मात्र, तत्पूर्वी त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करणारा 80 मिनिटांचा व्हिडिओ आणि 24 पानांचे मनोगत लिहिले. व्हिडिओ आणि पत्रामध्ये अतुल यांना ज्या गुन्ह्यांसाठी त्यांना दोषी ठरवले जात होते, ते गुन्हे त्यांनी केले नाहीत, याबाबत खुलासा केला आहे. त्यात त्यांनी असेही लिहिले आहे की, अतुल आणि निकिताची समेट घडविण्यासाठी न्यायाधीश महिलेने पाच लाख रुपयांची मागणी केली. पुढे ते म्हणतात की, “माझ्या कष्टाचे पैसे अशा न्याय आणि पोलीस व्यवस्थेच्या यंत्रणेकडेच जर जाणार असतील, तर मी पैसे का कमावू?” भयंकर! अतुल आणि निकिता या दोघांमध्ये काय घडले, याचा पद्धतशीर तपास कायद्याचे रक्षक लावतील आणि न्यायव्यवस्थाही कारवाई करेलच. मात्र, अतुल तर जीवानिशी गेले. एक आईचा मुलगा आणि एक बालकाचा पिता अवेळीच गेला. त्याची भरपाई कोण आणि कशी करणार? सामाजिक कार्य करताना असे अनेक अतुल भेटत असतात. त्यांचा खटला न्यायालयात सुरू असतो. पण, ‘तारीख पे तारीख’ सुरू असते. खटल्यासाठी बाजू मजबूत बनवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार दोन्ही बाजूंचे वकील करतात. निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी प्रचंड खटाटोप केला जातो. या सगळ्या प्रकारात पती आणि पत्नी दोघेही भरडून निघतात. मग कधी तरी सगळे असहनीय होऊन अतुलसारखी व्यक्ती आत्महत्या करते. ही आत्महत्या की हत्या?
कायद्याबाहेर कुणीही नाही!
 
परभणीमध्ये दि. 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. अत्यंत वाईट घटना. मात्र, ती विटंबना ठरवून किंवा आकसाने करण्यात आली होती का? किंवा संविधानविरोधी व्यक्तीने ती केली होती का? तर नशेमध्ये आणि त्यातही वेड्या असलेल्या मनोरुग्ण व्यक्तीने हे दुष्कृत्य केले. त्या व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली. तरीही घटना घडल्यावर परभणीमधील काही लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी जाळपोळ, हिंसा सुरू केली. पोलिसांवरही हल्ला केला. जाळपोळ हिंसा करून शहराला वेठीस धरणारे हे लोक कोण आहेत? या लोकांना खरेच संविधानाबद्दल प्रेम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे का? तर उत्तर आहे शून्यच!
 
कारण, डॉ. बाबासाहेबांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे कधीही समर्थन केले नाही. इतकेच काय, आंदोलन, मोर्चे यांना ते ‘अराजकतेचे व्याकरण’ म्हणायचे. त्यामुळे संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणारा गुन्हेगार आहेच. मात्र, शहरात जाळपोळ हिंसा करणारे हेच बाबासाहेबांच्या विचारांचे शत्रू आहेत.
 
खरे तर, यापुढे असा कायदाच करायला हवा की, ज्यांना कुणाला कुठे पुतळे, प्रतिकृती वगैरे बसवायच्या असतील, त्यांची काळजी पुतळे, प्रतिकृती बसवू इच्छिणार्‍या स्थानिक मंडळे, व्यक्तींनी घ्यावी. पुतळ्याची किंवा प्रतिकृतीची विटंबना झाल्यास विटंबना करणार्‍याला तर भयंकर कडक शिक्षा व्हावी, सोबत सदर मंडळ आणि या व्यक्तींनाही थोडी शिक्षा व्हावी. तसेच, विटंबना प्रकरणावरून हिंसा करणार्‍यांनी किमान दहा वर्षे त्यांना पुतळ्याच्या वा प्रतिकृतीच्या संरक्षणाचे आणि सफाईचे काम करायलाच हवेे. इतर वेळी पुतळ्यांवर प्रतिकृतींवर धूळ बसलेली असते. पशुपक्ष्यांची विष्ठा असते. त्यावेळी हे पुतळ्यासाठी, प्रतिकृतीसाठी हिंसा करणारे लोक कुठे असतात? मागे जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा जाळली, असे व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर फिरत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात कुणी आंदोलन, मोर्चे केल्याचे तरी सहसा दिसले नाही. याचाच अर्थ हे काही लोक व्यक्ती जात आणि दर्जा हुद्दा पाहून हिंसा, जाळपोळ करतात का? कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही, अशी खात्री संविधानाने दिली आहे. मग हिंसा, जाळपोळ ‘रास्ता रोको’ आणि पोलिसांवरही हल्ला करणारे, समाजाला त्रास देणारे हे लोक का कायद्याबाहेरचे आहेत?
Powered By Sangraha 9.0