नवी दिल्ली : काँग्रेस ( Congress ) आणि अराजकतावादी सोरोस यांच्या संबंधांची चौकशी होणे आवश्यक असून देशाला अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा घणाघात केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत केला आहे.
संसदेत मंगळवारीदेखील सोरोस – काँग्रेस यांच्या संबंधांवरून गदारोळ झाला. राज्यसभेत सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी सोरोस – सोनिया गांधी यांच्या संबंधांवरून काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, ओसीसीआरपी ही संघटना जगातील देश अस्थिर करण्यात गुंतलेली आहे. या संघटनेने उपस्थित केलेले मुद्दे येथे मांडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते हे त्याचे हत्यार बनत असल्याचे दाखवून दिले आहे, असा टोला नड्डा यांनी लगावला.
सोनिया गांधी या फोरम फॉर डेमोक्रॅटिक लीडर्स ऑफ एशिया पॅसिफिकच्या सह-अध्यक्ष आणि या सभागृहाच्या सदस्या असल्याचे नड्डा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जम्मू-काश्मीरला स्वातंत्र्य मिळावे, अशी भाषा करणाऱ्या या संघटनेशी काँग्रेसच्या नेत्याचे संबंध राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. काँग्रेस आणि जॉर्ज सोरोस यांचा संबंध काय आहे, याचा खुलासा होणे आवश्यक असल्याचेही नड्डा यांनी यावेळी नमूद केले आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर एक्सवरून टिका केली. ते म्हणाले, राहुल गांधींना केवळ तमाशा करण्यात आणि पंतप्रधानांना शिव्या देण्यात मजा येते. मात्र, सभागृहात येऊन ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी राहुल गांधी यांना मान्य नाही. केवळ तमाशा करणे आणि त्यानंतर परदेशात सुटीचा आनंद घेणे एवढेच राहुल गांधी यांना जमत असल्याचा टोला केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी लगावला आहे.