शंभर शकुनी गेल्यानंतर एक शरद पवार जन्मले : गोपीचंद पडळकर

10 Dec 2024 17:35:13
 
gopichand padalkar
 
सोलापूर : (Gopichand Padalkar) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मारकडवाडी गावात १० डिसेंबर रोजी महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
 
१०० शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले 
 
"या महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असं वातावरण तयार करण्याचे महापाप शरद पवारांनी केलंय म्हणून आम्ही मारकडवाडीमध्ये आज आलोय. शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आले. यांचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही, १०० गावं आहेत या विधानसभा मतदारसंघात पण हेच गाव का निवडले , कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला", असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
 
देवाभाऊंचे 'खरे' बाहेर पडेपर्यंत शरद पवारांचे 'खोटे' गावभर फिरून येते
 
गोपीचंद पडळकर म्हणाले, नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे 'खोटे' गावभर फिरून येते. तसेच देवाभाऊंचे 'खरे' बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे 'खोटे' गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कशा होतात त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे आणि ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे.
 
जो राहुलबाबा इथे येणार आहे, त्याच्या मामाच्या गावात पण ईव्हीएमवर मतदान होतंय
 
गोपीचंद पडळकर यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की, "समोर आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहेत. हे सरंजामशाही मोहिते पाटील स्वतःला राजे मानतात. मी बारामतीत उभा होतो तेव्हा माझे डिपॉजीट जप्त झाले. मग जरा ईव्हीएम घोळ असता तर मी पराभूत झालो असतो का? जो राहुलबाबा इथे येणार आहे, त्याच्या मामाच्या गावात पण ईव्हीएमवर मतदान होतंय. मामाच्या गावाला जाऊन बघा एकदा…", असं म्हणत पडळकरांनी राहुल गांधीला टोला लगावला आहे.

 
 
Powered By Sangraha 9.0