जनजातींसाठी झटणार्‍या समाजसेवकांचा गौरव

01 Dec 2024 13:06:27
Tribal Youth

मुंबई : ‘माय होम इंडिया’ आयोजित ‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ ( Tribal Youth ) सोहळा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी बजाज इमेराल्ड, अंधेरी पूर्व येथे संपन्न झाला. यावेळी, जनजातीय समाजासाठी कार्य करणार्‍या दहा प्रख्यात समाजसेवकांना सुविख्यात मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कारार्थी स्वतः जनजातीय समुदायातील असून, आज ते आपल्याच समाजाच्या कल्याणाकरिता काम करत आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उदय देशपांडेंसह अंधेरी पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. मुरजी पटेल, ‘आदिवासी एकता मित्र मंडळ’चे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकादरम्यान सुनील देवधर म्हणाले की, “जनजाती गौरव दिवस’ पंधरवडानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यंदा युवा आणि महिलांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले, ज्यामुळे युवा पिढी आणि महिला वर्ग त्यांच्याकडे पाहून प्रोत्साहित होतील.”

जनजातींसाठी झटणार्‍या समाजसेवकांचा गौरव
पद्मश्री उदय देशपांडे यांनी आपल्या उद्बोधनातून विश्वस्तरावर पोहोचलेल्या मल्लखांब खेळाविषयी व त्याच्या प्रगतीविषयी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सरकारचा खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, त्यांना मिळणार्‍या सुखसुविधा कशाप्रकारे पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिकपटीने चांगल्या होत गेल्या याबाबत त्यांनी सांगितले. याचवेळी जनजातीय क्षेत्रात मल्लखांबाचे मोफत प्रशिक्षण देण्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.

‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ सन्मानित पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे :

सुदाम उंबरसडा, मधुकर माळकरी, योगेश भुयाळ, नमिता भुरकड, वसुधा वाणी, रिंगथेम महुंग, डेविड सिनेट, सुजाता संभारे, सुवर्णा संभारे, कैलाश टोपले.

Powered By Sangraha 9.0