शोधाचा बोध घडवणारे साहित्य

09 Nov 2024 10:35:45

literature
 
१० नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाने आपल्या जीवनाचे प्रत्येक अंग व्यापले आहे. सुरुवातीच्या काळात विज्ञान हे फक्त या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ आणि विज्ञानाचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्या पुरतेच मर्यादित होते, सामान्यांपर्यंत ते पोहोचत नव्हते. विज्ञानाला सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले ते ‘विज्ञान साहित्याने.’ मराठी साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा विज्ञान साहित्याचे खूप मोठे योगदान आहे. जागतिक विज्ञान दिवसाच्या निमित्ताने मराठी विज्ञान साहित्याच्या सध्याच्या स्थितीविषयी लेखक, वाचक, प्रकाशक आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या मिळवलेल्या या प्रतिक्रिया.
 
मराठी साहित्यातून विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय याचे समाधान
 
आताचे युग हे विज्ञान युग आहे. मानवी जीवनाची सर्व अंग विज्ञानाने व्यापून टाकलेली आहेत. विज्ञानाच्या आविष्कारामुळे, मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध होण्याच्या मार्गावर आहे आणि असे असताना, आपल्याला विज्ञानाची अधिकाधिक माहिती होणे, ओळख होणे आवश्यक आहे. त्याचे जे काही भले-बुरे आयाम होऊ शकतात, त्याचे व्यवस्थित आकलन व्हायला हवे. त्यासाठी विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हायला हवा आणि त्यादृष्टीकोणातून ‘जागतिक विज्ञान दिवस’ आपण साजरा करतो. ‘मराठी विज्ञान साहित्य’ हे गेल्या काही वर्षात बरेच बहरलेले आहे. सगळ्या प्रकारच्या आविष्कारांचे वैज्ञानिक तत्त्व सांगण्याचा प्रयत्न मराठी विज्ञान साहित्यातून होत आहे. यावर्षीचे दिवाळी अंक जर आपण पाहिले तर त्यामधून विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी अनेक लेख आलेले आहेत. शिवाय वैज्ञानिक ‘नोबल पुरस्कार’ जे दिले जातात ते का दिले जातात, त्यांचे महत्त्व काय आहे? याविषयी सांगणारे लेखक-प्रकाशक सुद्धा तयार होत आहेत. मराठी साहित्यातून विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे याचे मला समाधान आहे.
 
- डॉ. बाळ फोंडके (विज्ञानवादी लेखक)
 
 
मराठी विज्ञान साहित्याची मागणी वाढत आहे
 
‘मराठी विज्ञान साहित्य’ आता खूप जोमाने विकले जाते आहे. नवीन नवीन जे विषय मराठी विज्ञान साहित्यात येत आहेत त्यामुळे खूप मोठा वाचकवर्ग विशेषत: तरुण वाचक या साहित्याशी जोडला जात आहे. गेल्या दहा वर्षांचा काळ पाहिला तर उत्क्रांती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञानाची इतर जी काही अंग आहेत, त्यांच्याविषयीची पुस्तके खूप चांगली विकली जात आहेत. ‘होमीभाभा विज्ञान शिक्षण केंद्र’ आणि ‘मराठी विज्ञान परिषद’ यांसारख्या संस्थांसोबत मिळून आम्ही काही पुस्तक तयार केलेली आहेत, त्यांना चांगली मागणी आहे. पूर्वीच्या काळी ललित साहित्यच फक्त तयार केले जात होते. पण, गेल्या १०-१५ वर्षांच्या कालावधीत विज्ञान साहित्य लिहिणार्‍या लेखकांची संख्या वाढली आहे, त्यांची मागणी वाढली आहे. अजूनही बरेच विषय आहेत जे विज्ञान साहित्यात येऊ शकतात, यायला हवेत त्यामुळे हे साहित्य वाचणारा वाचकवर्गही अधिक वाढत जाईल.
 
- आशिश पाटकर (व्यवस्थापकीय संचालक, मनोविकास प्रकाशन)
 
 
सोप्या भाषेत पण, सखोलता न घालवणारे लिखाण जास्त तयार झाले पाहिजे
 
विज्ञान साहित्यातून विज्ञान हा विषय पोहोचवण्याचे प्रयत्न होतच आहेत. पण, अजून जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. सोप्या भाषेत पण, सखोलता न घालवणारे लिखाण जास्त तयार झाले पाहिजे. विज्ञान साहित्याला मिळणार्‍या वाचकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच चांगल्या असतात. एखाद्या नवीन, वेगळ्या विषयावर काही मराठी विज्ञान साहित्यात आले की, हे आम्हाला मराठीमध्ये हवे होते, इंग्रजीतून हे कळत नव्हते, हे आम्हाला आवडले आहे असे वाचक आवर्जून सांगतात. त्यासाठी युवकांसाठी आणि एकंदरीत वाचकांसाठी वेगवेगळ्या आणि महत्वाच्या विषयांवर लिहिले गेले पाहिजे. विज्ञानाविषयी तर मराठीत लिहिले जातच आहे, तंत्रज्ञानाशिवाय सुद्धा लिहिले गेले पाहिजे. तंत्रज्ञानातील नवनवे बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि या सगळ्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याविषयी साहित्यातून लोकांना माहिती दिली पाहिजे.
 
-अतुल कहाते (विज्ञानवादी लेखक)
 
विज्ञान साहित्य मुलांमध्ये त्या विषयाची गोडी निर्माण करायला कारणीभूत ठरते
 
डॉ. जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे, डॉ.बाळ फोंडके, मोहन आपटे या विज्ञानकथा लेखकांनी मराठीत बरेच काम करुन ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या कथांचे वाचन करताना एक जाणवते ते म्हणजे विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना ते अगदी सहज आपल्या रोजच्या जीवनाशी जोडतात. त्यामुळे ती संकल्पना पटकन समजते. भविष्यात विज्ञानामुळे होऊ शकणार्‍या काही बदलांचा वेध याप्रकारच्या साहित्यातून घेता येतो. त्यामुळे मराठीत असे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. विज्ञानकथा, विज्ञान नाटक मुलांमध्ये त्या विषयाची गोडी लावण्यास कारणीभूत ठरत असतात. आजच्या घडीला सेमी इंग्रजी आणि इंग्रजी शाळा वाढल्या असल्यामुळे विज्ञानातील संकल्पना मराठीऐवजी इंग्रजीत मुलांच्या कानांवर पडत आहेत. विज्ञानकथांच्या माध्यमांतून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही प्रकारे संकल्पनांची ओळख मुलांना करुन देता येईल का याचा विचार व्हायला हवा. मराठीमध्ये, आकाशाचा रंग निळा का? पुरी तळताना ती वर का येते? अशा काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देणारी पुस्तके बरीच आहेत. पण, त्यापलीकडे रंजक, गूढ आणि रहस्यांनी भरलेले साहित्य जर अधिक प्रमाणात निर्माण झाले, तर सामान्य वाचकही त्याचा आनंद घेऊ शकेल.
 
- तन्वी गुंड्ये (वाचक)
 
 
मराठी विज्ञान परिषदेने हजारो लेखक आणि वक्ते तयार केले
 
मराठी विज्ञान परिषद १९६६ स्थापन झाली. त्यावेळी मराठीतून विज्ञानाविषयी बोलणारे आणि लिहिणारे लोक नव्हते. गेली अनेक वर्षे या परिषदेने अनेक प्रयत्न करून आज हजारो लेखक आणि वक्ते तयार केले आहेत. हे लेखक दोन प्रकारचे लेखन करतात. एक म्हणजे वैज्ञानिक घडामोडींची माहिती देणारे लेखन आणि दुसरे म्हणजे विज्ञानकथा. ‘मराठी विज्ञान परिषदे’ने आजवर अनेक स्पर्धा घेतल्या. या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन बक्षिसे मिळवणार्‍या लेखकांमध्ये जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे यांसारखे अनेक आघाडीचे लेखक आहेत. हे लेखक कथा लिहू लागले आणि आता त्यांचा खूप मोठा वाचकवर्ग आहे. नांदेड, छत्रपती संभाजी नगर, अमरावती आणि एस.एन.डी.टी या विद्यापीठांमध्ये विज्ञान कथांचा शंभर गुणांचा पेपर असतो आणि त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी या लेखकांची पुस्तके वाचतात. हा विज्ञान लेखनाचा प्रवाह निरंतर चालू राहावा म्हणून मराठी विज्ञान परिषद २०१२ सालापासून विविध विद्यापीठांमध्ये कार्यशाळा आयोजित करत आहे.
 
- अ.पां.देशपांडे,(कार्यवाह,मराठी विज्ञान परिषद)
 
 
दिपाली कानसे
Powered By Sangraha 9.0