अनुपम खेर ‘५४२’ नॉट आऊट!

09 Nov 2024 22:39:56
 
 
Anupam Kher

 
रंगभूमीवरुन अभिनयाचा प्रारंभ करत, सिनेसृष्टीत मोठा पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची ४० वर्षं पूर्ण केली. नुकताच त्यांचा ‘विजय ६९’ हा ५४२वा चित्रपटही ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाला आहे. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘सारांश’ या चित्रपटाने अनुपम खेर यांना वेगळी ओळख दिली. तेव्हा, सिनेसृष्टीतील आजवरचा प्रवास आणि ‘विजय ६९’ या चित्रपटाबद्दल ‘दै. ‘मुंबई तरुण भारत’ने अनुपम खेर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
 
विजय ६९’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, “हिंदी चित्रपटसृष्टीत गेले ४०वर्षे मी कार्यरत आहे आणि ‘विजय ६९’ हा माझा ५४२वा चित्रपट असून, यानिमित्ताने माझे संपूर्ण जीवन या चित्रपटाच्या कथेतून प्रेक्षकांसमोर आले आहे. मुळात आपण ज्या परिस्थितीतून लहानाचे मोठे होतो, ती परिस्थिती आपल्याला सर्वसामान्य करते. किंबहुना, तडजोड करण्यास भाग पाडते. ज्या व्यक्ती समोर आलेल्या परिस्थितीशी तडजोड करत नाहीत, ते ‘हिरो’ होतात फार पूर्वीच मला ही गोष्ट लक्षात आल्यामुळे जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.

मला आजही आठवते की, ज्यावेळी मी वयाच्या २८व्या वर्षी ६५ वर्षीय वयोवृद्धाची भूमिका साकारली होती, त्यावेळी मला अनेकजण म्हणाले होते की, “तुला वेड लागले आहे का? इतक्या कमी वयात वयोवृद्ध माणसाची भूमिका केली, तर आयुष्यभर तशाच भूमिका वाट्याला येतील.” तेव्हा मी विचार केला की, वेड मला नाही, असा विचार करणार्‍या या लोकांना लागले आहे. कारण, वय वर्ष २८असताना मला ‘सारांश’ सारखा चित्रपट करण्याची संधी मिळाली आणि आजही लोक मला त्या भूमिकेसाठी ओळखतात, त्याचा मला अभिमान आहे.”
 
ते पुढे म्हणाले की, “अभिनेत्याने ‘आपल्याला सर्वकाही येत’ हा आर्विभाव आणून काम केले, तर त्याचा अपेक्षित प्रतिसाद येत नाही. प्रत्येकवेळी मला काहीतरी नवीन शिकायचे आहे, हा विचार करत दिग्दर्शकाकडे कोरी पाटी घेऊन जाणेच योग्य,” असे म्हणत त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “मला पाण्याची फार भीती वाटते. त्यामुळे मला पोहता येत नाही. फार वर्षांपूर्वी दिग्दर्शक तन्वीर अहमद यांनी एक चित्रपट केला होता आणि त्या चित्रपटात मला त्या चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली. महत्त्वाचे म्हणजे, मला दिग्दर्शकांनी विचारले की, “तुला पोहता येते का?” मी ‘हो’ बोलून गेलो. कारण, नकार दिला असता, तर मला चित्रपटातून काढून टाकले असते. चित्रीकरण सुरू होण्यासाठी तसा फार अवधी बाकी होता. त्यामुळे मी पोहणे शिकून घेईन, असा विचार केला खरा.


पण, तसे काही झाले नाही आणि चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी माझी ती चोरी पकडली गेली. तो चित्रपट माझ्या हातातून गेला आणि माझी ती खलनायकाची भूमिका मग अभिनेते अमरीश पुरी यांनी साकारली. पण, ‘विजय ६९’ या चित्रपटात मी पोहण्याची तालीम घेतली आणि डमी न वापरता किंवा कोणत्याही तंत्रज्ञानाची मदत न घेता चित्रीकरणही पूर्ण केले. इतकेच नाही, तर एका प्रसंगाचे चित्रीकरण ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथे सुरू होते आणि काही कारणास्तव माझ्या खांद्याला गंभीर इजा झाली होती. पण, कामाप्रती माझी निष्ठा असल्यामुळे मी त्या दुखापतीतही चित्रीकरण पूर्ण केले होते, त्यामुळे जेव्हा तुम्ही तो प्रसंग चित्रपटात पाहाल, त्यावेळी माझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू खरे होते, असे दिसेल.”
 
अनुपम खेर यांचे आज वय वर्षे ६९ आहे. तेव्हा सत्तरीच्या उंबरठ्यावर असताना साजेशी भूमिका करताना काय नवी शिकता आले, याविषयी बोलताना ते म्हणाले की, “विजय ६९’ या चित्रपटामुळे अनेक नव्या कला शिकण्याची संधी मिळाली. या चित्रपटात मी सायकल चालवली आहे. यापूर्वी मी कधीच सायकल चालवली नव्हती. एक चांगला नट तोच असतो, जो वयाकडे न पाहता, तंत्रज्ञानाचा आधार न घेता, नव्याने कला स्वत: शिकून त्या सादर करतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मला माझ्यातील नट पुन्हा चाचपडता आला आणि स्वत:ला आव्हान देत ते पूर्ण करता आले.”
 
 
Powered By Sangraha 9.0