सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या वाघाचे आगमन; १०० किलोमीटरचे अंतर कापून आला नवा वाघोबा

08 Nov 2024 15:55:53

Sahyadri TR Recorded new tiger



मुंबई (अक्षय मांडवकर) -
गतवर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेला वाघ वर्षभरानंतरही व्याघ्र प्रकल्पात नांदत असताना, आता प्रकल्पामध्ये नव्या वाघाचे आगमन झाले आहे (Sahyadri TR Recorded new tiger). राष्ट्रीय उद्यानामधून नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांना यश मिळाले आहे (Sahyadri TR Recorded new tiger). महत्त्वाचे म्हणजे या वाघाची ओळख पटली असून कोल्हापूरमधील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून हा वाघ चांदोलीत आला आहे. (Sahyadri TR Recorded new tiger)

२०१८ सालानंतर गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी प्रथमच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचे नामकरण ‘एसटीआर- टी१’ असे करण्यात आले. गेल्या वर्षभरात अगदी मुसळधार पावसातही व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांनी या वाघाच्या हालचालींवर देखरेख ठेवली. आता वर्षभरानंतरही हा वाघ व्याघ्र प्रकल्पामध्येच अस्तित्वात असल्याचे लक्षात आले आहे. अशा परिस्थितीत २८ आॅक्टोबर, २०२४ रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपने रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी एका नर वाघाचे छायाचित्र टिपले. हे छायाचित्र व्याघ्र प्रकल्पाच्या ‘टायगर सेल’ या संशोधन विभागाने तपासले. तपासणीअंती हे छायाचित्र ‘एसटीआर- टी१’ या वाघाचे नसून दुसर्या वाघाचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्गातीला वाघांवर अभ्यास करणारे संशोधक गिरीश पंजाबी यांच्याकडे हे छायाचित्र तपासण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांनी हे छायाचित्र राधानगरीमध्ये २०२२ साली छायाचित्रित झालेल्या नर वाघाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या नव्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर- टी २’, असे करण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये २३ एप्रिल, २०२२ रोजी ‘एसटीआर-२’ या वाघाचा वावर निदर्शनास आला होता. गेल्या दोन वर्षांपासून हा वाघ राधानगरीमध्येच वास्तव्यास होता. राधानगरीत या वाघाचे शेवटचे छायाचित्र यंदाच्या उन्हाळ्यात १३ एप्रिल, २०२४ रोजी टिपण्यात आले होते. त्यानंतर पावसाळयात साधारण १०० किलोमीटरचे अंतर कापून हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झाला आहे. हा नर वाघ अंदाजे चार ते पाच वर्षांच्या असून मादीच्या शोधात तो चांदोलीत आल्याची शक्यता आहे. परंतु, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या मादी वाघाचे अस्तित्व नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मादी वाघाचे स्थानांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही वर्षात सह्याद्रीच्या दक्षिणेस असलेल्या तिलारी ते राधानगरी भ्रमणमार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गामधून ‘एसटीआर-१’ आणि ‘एसटीआर- टी २’ हे दोन्ही नर वाघ नैसर्गिकरित्याच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे हा भ्रमणमार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Powered By Sangraha 9.0