मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ABVP National Level Election) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय महामंत्री पदासाठीची निवडणूक प्रक्रिया गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली. या संदर्भातील निकाल मुंबईतील अभाविपच्या केंद्रीय कार्यालयातून जाहीर करण्यात आले. प्रो. (डॉ.) राजशरण शाही (उत्तर प्रदेश) यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली तर डॉ. विरेंद्र सिंह सोलंकी (मध्य प्रदेश) यांची अभाविपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली. अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री यांच्या निवडीचे निकाल जाहीर करताना निवडणूक अधिकारी आणि अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे विशेष आमंत्रित सदस्य प्रा. (डॉ.) प्रशांत साठे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे २२ ते २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय अधिवेशनात दोन्ही पदाधिकारी त्यांची जबाबदारी स्वीकारतील.