निवडणुकीच्या धामधूमीत आता ‘वर्गमंत्री’ निवडणुकीचा कल्ला

06 Nov 2024 15:58:30
 
vargamantri
 
 
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता शाळेतील वर्गमंत्री निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबरपासून ही वेबसेरीज आपल्या भेटीला येणार आहे.
 
अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे नरेंद्र फिरोदिया यांनी वर्गमंत्री या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. संजय श्रीधर कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजचं लेखन संजय, अजिंक्य म्हाडगूत, संकेत हेगाणा, प्रवीण कांबळे यांचं आहे. कृष्णा जन्नू यांनी संकलन, अजय घाडगे यांनी छायांकन, निरंजन पाडगावकर यांनी संगीत, श्रेयस एरंडे यांनी पार्श्वसंगीत, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.
 
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नागरिकशास्त्राचे धडे मिळावेत, लोकशाही प्रक्रिया समजावी या साठी शाळांमध्ये निवडणूक घेतली जाते. अशीच वर्गमंत्री पदासाठीची निवडणूक घेण्याचे शाळेत ठरवले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांची उमेदवारी, अर्ज भरणे, प्रचार, मतदान अशा सर्व प्रक्रिया पार पाडताना उडणारी धमाल वर्गमंत्री या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरमधूनच ही सीरिज मनोरंजक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मराठी वेब विश्वात खास रे टीव्हीची वेगळी ओळख आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरचा अस्सल मराठी कंटेट खास रे टीव्हीनं आजवर सादर केला आहे. त्यामुळे आता वेब सीरिजच्या क्षेत्रातही वर्गमंत्रीसारखी खास निर्मिती लक्षवेधी ठरेल यात शंका नाही .
 
 
Powered By Sangraha 9.0