मुंबई : ऑक्टोबर महिन्यात महागाई आणखी वाढू शकते. महागाई दर सप्टेंबरमध्ये नोंदवलेल्या ५.५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो, असे विधान भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बिझनेस स्टँडर्डशी संवाद साधताना केले. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय कार्यक्षम कार्यवाही करण्यास तयार आहे असे सांगताना बदलत्या जागतिक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था टिकून असल्याचेही गव्हर्नर दास यावेळी म्हणाले.
देशातील सर्वात मोठ्या बँकिंग, वित्त कार्यक्रमात बोलताना गव्हर्नर म्हणाले, सप्टेंबर २०२४ मध्ये महागाईचा दर ५.५ टक्के राहिला. या महिन्यात भाज्यांच्या किमती वार्षिक ३६ टक्क्यांनी वाढल्या होत्या तर अन्नधान्य महागाई दर ९.२४ टक्के इतका होता. महागाई आणि बाह्य आव्हाने असतानाही आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आरबीआय वचनबद्ध असल्याचे गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले.
विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे भारतात अलीकडे महागाई वाढली आहे. त्याचबरोबर, नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले. किरकोळ महागाईबाबत आरबीआयने चिंता व्यक्त केली. परिणामी, आता ऑक्टोबरमध्ये महागाई आणखी वाढू शकते, असा इशारा देताना वित्तीय बाजार अमेरिकन निवडणुकांचे निकाल आणि चीनकडून आर्थिक मदतीची घोषणा या दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनांकडे लक्ष देऊन आहे, असे दास म्हणाले.
जीएसटी ई-वे बिल, टोल वसुली, हवाई प्रवासी संख्या, स्टीलचा वापर व सिमेंट विक्री यासह अनेक प्रमुख बाबींमध्ये सुधारणा केल्याचा उल्लेख आरबीआयने केला आहे. महागाईचा इशारा देत महागाईचे मोठे धोके असून भौगोलिक-राजकीय तणाव, वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता आणि हवामान बदल यांसारख्या कारणांमुळे वाढू शकतात. चांगली चिन्हे वाईट चिन्हांपेक्षा जास्त आहेत, असे सांगत भारताच्या विकासावर गव्हर्नर दास यांनी भाष्य केले आहे.