आपल्या प्रत्येक फोटोतून एक गोष्ट सांगणारे आणि ५० वर्षांचा दांडगा अनुभव गाठीशी असणारे फोटोग्राफर रमेश करमरकर यांच्याविषयी...
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोनमध्ये आता कॅमेराही झळकू लागला. पण, म्हणून काही सगळेच स्मार्टफोनधारक लगोलग छायाचित्रकार झाले असे नाही. कारण, चांगले फोटो काढण्यासाठी फक्त हातात कॅमेरा असून चालत नाही, तर त्यासाठी कलात्मकदृष्टीसुद्धा तितकीच आवश्यक. याच कलात्मकदृष्टीमुळे रमेश करमरकर यांनी फोटोग्राफी क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
साधारण १९७०च्या आसपास, शाळकरी वयात असतानाच रमेश यांना फोटोग्राफीची गोडी लागली. आता एका क्लिकवर फोटो काढणारे आणि दुसर्याच मिनिटाला त्या फोटोची प्रत आपल्या हातात देणारे कॅमेरे आहेत. पण, त्यावेळी तसे नव्हते. त्यावेळी फोटो काढण्यासाठी ‘रोल’ टाकून वापरले जाणारे विशिष्ट प्रकारचे कॅमेरे अस्तित्वात होते. रमेश यांच्या प्रकाश देवधर नावाच्या एका मित्राकडे तसा कॅमेरा होता. रमेश आणि त्यांचे इतर मित्र मिळून त्या कॅमेरासाठी तेव्हाच्या काळात ५० पैशांना मिळणारे ‘रोल’ विकत घ्यायचे आणि सगळे मित्र मिळून सायन किल्ल्यावर जाऊन फोटो काढायचे. रमेश यांचा मित्र प्रकाशचे बाबा फोटोग्राफर होते. त्यांना रमेश यांची फोटोग्राफी आवडायची. सगळ्या मित्रांनी काढलेल्या फोटोंमधून रमेश यांनी काढलेले फोटो कोणते आहेत, हे ते ओळखू शकायचे. प्रकाशच्या वडिलांनी रमेश यांच्या फोटोग्राफीवर खूश होऊन त्यांना ‘याशिका ६३५’ हा कॅमेरा भेट म्हणून दिला होता. रमेश यांच्या आयुष्यातील तो पहिला कॅमेरा होता. याच कॅमेराने रमेश यांच्या फोटोग्राफीवरचे प्रेम अधिक दृढ केले आणि ते अधिकाधिक फोटो काढू लागले. पुढे प्रकाश काळे नावाच्या त्यांच्या चुलत भावाने त्यांना ‘यशिका एफ-७’ हा कॅमेरा दिला. रमेश यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या फोटोग्राफीचा अभिमान होता. फक्त हौस म्हणून फोटो न काढता, फोटोग्राफीच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे प्रोत्साहन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडूनच मिळाले. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच ज्या स्पर्धेत फोटोग्राफर म्हणून सहभाग घेतला होता, ती स्पर्धा होती ‘कॅमेरा क्लब ऑफ इंडिया’ या संस्थेची. ही संस्था त्याकाळी खूप नावाजलेली होती. अनेक मोठे फोटोग्राफर या संस्थेची जोडले गेले होते. याच संस्थेच्या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेऊन रमेश करमरकर यांनी पहिल्या क्रमांकाचे बक्षीससुद्धा मिळवले. प्रारंभीच्या काळात शिक्षण झाल्यानंतर घरी आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी नोकरीसुद्धा केली. पण, नोकरीमध्ये त्यांचे मन फारसे रमले नाही. आपल्याला फोटो काढायला आवडतात आणि त्यातूनच पैसे कमवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, हे रमेश यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी फोटोग्राफर म्हणून लहान-मोठी कामे मिळवायला सुरूवात केली. फोटोग्राफर म्हणून त्यांना पहिले काम मिळाले ते त्यांच्या ‘प्रकाश’ नावाच्या मित्रामुळे. शाळेत ज्याच्याजवळ कॅमेरा होता तो मित्र प्रकाश देवधर, कॅमेरा देणारा चुलत भाऊ प्रकाश काळे, या दोघांनंतर रमेश करमरकर यांना या क्षेत्रात ‘प्रकाश’ दाखवणारा तिसरा व्यक्ती हासुद्धा ‘प्रकाश’च होता. या प्रकाश नावाच्या मित्राने ‘माझ्या लग्नाचे फोटो रमेशच काढणार’ असे सांगितले आणि त्यामुळेच रमेश यांना त्यांचे पहिले काम मिळाले. त्यानंतर रमेश यांनी बरीच वर्षे फोटोग्राफीची अनेक कामे केली. १९७० सालाच्या काळापासून फोटोग्राफी करत असल्यामुळे या क्षेत्रातील प्रत्येक दशकात होणारा बदल त्यांनी जवळून अनुभवला. गेली ५० वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक प्रकारचे कॅमेरेही त्यांनी हाताळले. या क्षेत्रात कॅमेरे आणि फोटोग्राफीमधला बदल जसा त्यांनी अनुभवलेला आहे, तसेच त्यांनी फोटोग्राफरचे महत्त्व बदलत असल्याचे सुद्धा अनुभवलेले आहे. पूर्वीच्या काळी फोटोग्राफरला खूप मान होता, किंमत होती. फोटोग्राफर फोटो काढत असताना लोक त्याच्याकडे आदराने, कुतूहलाने पाहायचे. पण, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे फोटोग्राफरला लोक पूर्वीसारखी किंमत देत नाहीत, ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप सलते. “आता प्रत्येकजण स्वत:ला फोटोग्राफर समजत असला, तरीही फोटोग्राफी म्हणजे फक्त कॅमेरा हातात घेऊन फिरणे किंवा कुठलीही गोष्ट कशीही कॅमेरा कैद करणे नाही, तर फोटोग्राफी म्हणजे समजून, उमजून त्या फोटोतून काय दाखवायचे किंवा सांगायचे आहे ठरवून, व्यवस्थित ‘अँगल’ने एखादी गोष्ट कॅमेर्यात टिपणे म्हणजे खरी फोटोग्राफी,” असे रमेश करमरकर यांचे मत. फोटोग्राफी ही कला आहे. कारण, आपल्या प्रत्येक फोटोतून आपण एक गोष्ट सांगत असतो असे त्यांचे मानणे आहे. त्यांनी आजवर अगणित फोटो काढले आहेत. त्यांचे अनेक फोटो लोकांना आवडलेसुद्धा आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या फोटोंचे पहिले प्रदर्शनसुद्धा भरले होते. ५० वर्षांचा इतका दांडगा अनुभव असताना सुद्धा अजून आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि नवीन प्रयोग करून फोटो काढायचे आहेत, ही भावना रमेश यांच्या मनात कायम असते. ते स्वत: एक उत्तम फोटोग्राफर आहेतच. पण, त्यांना चांगले फोटोग्राफर घडवायचेही आहेत. “ज्यांना या क्षेत्रात यायचे आहे, त्यांना मी मोफत फोटोग्राफी शिकवायला तयार आहे,” असे ते अनेक ठिकाणी सांगतात. अशा या महान फोटोग्राफरला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप खूप शुभेच्छा!
दिपाली कानसे