नाशिक : माघारीनंतर विधानसभा निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले असून, प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरूवात झाली आहे. महायुतीने प्रचारात आघाडी घेतली असून, त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तपोवनातील मोदी मैदानावर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी जिल्ह्यातील कानाकोपर्यातून मतदार येणार असल्याने या सभेसाठी भाजप पदाधिकार्यांकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा घेण्यात आली होती. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर झालेल्या या सभेत गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढत मंडपाच्या बाहेर लोक उभे असल्याचे दृश्य बघायला मिळाले होते. आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या शुक्रवारी, दि. ८ नोव्हेंबर रोजी सभा होणार आहे. तपोवन येथे होणार्या या सभेसाठी लाखोंची उपस्थिती राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने कोणतीही कमतरता राहणार नाही यासाठी परिश्रम घेतले जात आहेत.
पंतप्रधानांची सभा ठरणार दिशादर्शक...
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांनी मताचे दान महायुतीच्या झोळीत टाकावे असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदारांमध्ये पसरविण्यात आलेला संभ्रम दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दिशा देणारी असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे महायुतीला फायदा होणार आहे. त्यामुळे ही सभा महायुतीसाठीच्या उमेदवारांना विजयाच्या जवळ नेणारी ठरणार असून, त्यादृष्टीने पोषक वातावरण निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे.