नाशिक : ( MVA ) पक्षनेतृत्वाने उमेदवारी मागे घेण्याचे दिलेले आदेश बंडखोरांकडून धुडकावण्यात आले असून, अनेकांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना एकप्रकारचा झटका मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाला विकासापासून काँग्रेसने दूर ठेवले. तसेच काँग्रेस पक्षाने निष्ठावंत पदाधिकार्यांना उमेदवारीपासूनही दूर ठेवले आहे. त्यामुळे तिळपापड झालेल्या पदाधिकार्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यात उबाठा गटाच्या आणि काँग्रेसकडून उमेदवारी मागणार्या निर्मला गावित यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडी दुभंगली गेली आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसला भगदाड पाडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाची काहीशी पिछेहाट झाल्याचे बघायला मिळाले. त्यात मागील वेळी वंचितकडून लढलेले लकी जाधव यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे दुखालेल्या स्थानिक पदाधिकार्यांनी राजीनामा अस्र बाहेर काढले. तरीही लकी जाधव यांच्यावरच पक्षाने विश्वास दाखविल्याने महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना फायदा होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
माजी आ. निर्मला गावित यांनी दोन वेळा इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी गावित यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजविण्यासही मागेपुढे पाहिले नाही. तरीही पदरी निराशाच पडल्याने गावित यांच्याकडून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वेळा आमदार राहिलेल्या गावित यांचा अजूनही मतदारसंघात संपर्क असल्याचे सांगण्यात येते. गावित यांच्या अपक्ष उमेदवारीने महाविकास आघाडीची पिछेहाट होण्यास सुरूवात झाली आहे. गावित यांना मिळणारी सर्वच्या सर्व मते मविआची असणार आहे. त्यामुळे गावित स्वतःबरोबरच लकी जाधव यांनाही आमदार होण्यापासून वंचित ठेवणार की काय, अशी स्थिती इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात निर्माण झाली आहे.
विजयी गुलाल खोसकरांच्याच माथी...
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात महायुतीत एकजूट असल्याने आणि खोसकर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत समाविष्ट असल्याने त्यांच्याकडून प्रचारात आघाडी घेण्यात आली आहे. तसेच, तळागाळातील मतदारांसोबत असलेल्या संपर्कामुळे खोसकर आरामात जिंकणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दि. २३ नोव्हेंबर रोजी खोसकरच विजयाचा गुलाल आपल्या माथी लावणार असल्याचे सर्वसामान्य मतदाराकडून सांगितले जात आहे.