गेली सहा वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन’ संस्था कलेचा आस्वाद घेत वाडा व विक्रमगडमधील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांबरोबर पणत्या रंगविणे, शुभेच्छा कार्ड व एन्व्हलप सुशोभित करणे, कंदील तयार करणे अशा कलाप्रकारांची दिवाळी कार्यशाळा घेत दिवाळी साजरी करत आहे. या कलाप्रकारातूनही आनंद मिळतो आणि नवनवीन कल्पना आकाराला येतात. शिकण्याची आणि अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण होते. यावर्षी आम्ही विक्रमगडमधील मोह बुद्रुक या शाळेत दिवाळीची कार्यशाळा घेतली. मोह बुद्रुक शाळेतील या मोहवून टाकणार्या अनुभवाचे शब्दचित्रण...
पणत्या खूपच सुंदर रंगवल्या आहेत आणि खूप वर्षांनी असं छानसं दिवाळीचं शुभेच्छा कार्ड हातात पडलं. खूप भारी वाटलं,” असे सँडीने आवर्जून फोन करून सांगितले. काहीजणांनी मेसेज करून अभिप्रायही दिला. वाडा आणि विक्रमगडमधील जि. प. शाळेच्या मुलांनी रंगविलेल्या पणत्या आणि शुभेच्छा कार्ड आमच्या ‘लेट्स इमॅजिन’ने यावर्षी काही देणगीदारांना भेट म्हणून दिले होते. दिवाळीत सगळ्यांनी त्याबद्दल आभार व्यक्त करत त्या मुलाचे कौतुकही केले. अभिप्राय वाचून आनंद तर झालाच, पण त्या दिवसाची गंमतजंमत डोळ्यांसमोर आली आणि हसू आले.
गेली सहा वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन’ संस्था कलेचा आस्वाद घेत वाडा व विक्रमगडमधील जि. प. शाळेच्या मुलांबरोबर पणत्या रंगविणे, शुभेच्छा कार्ड व एन्व्हलप सुशोभित करणे, कंदील तयार करणे अशा कलाप्रकारांची दिवाळी कार्यशाळा घेत दिवाळी साजरी करत आहे. या कलाप्रकारांतूनही आनंद मिळतो आणि नकळत खूप नवनवीन कल्पना आकाराला येतात. शिकण्याची आणि अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण होते. यावर्षी आम्ही पहिल्यांदाच विक्रमगडमधील मोह बुद्रुक या शाळेला भेट देणार होतो. या शाळेत आम्ही याआधी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे फारशी माहिती नव्हती. दिवाळीची कार्यशाळा घ्यायची तर कुठे घेऊया, असे विचारताच रडे पाडाच्या मोरेश्वर ठाकरे सरांनी मोह बुद्रुक शाळा सूचवली. त्यांच्या शाळेपासून जवळच ही शाळा असल्यामुळे त्यांनाही या शाळेत आपल्या शाळेतील मुलांना घेऊन येता येणार होते. शाळेतील मुख्याध्यापिका विशाखा चौधरी बाईंशी फोनवर बोलणे झाले. विक्रमगडमधील या शाळेत पहिल्यांदा जात असल्यामुळे रस्ताही नवीन होता. गावागावांतून जाणारा रस्ता दोन्ही बाजूंना भाताची शेती अन् मध्येच दाट झाडी. गुगल मॅपवर शाळेचे लोकेशन लावले होते. तरीपण गावकर्यांना विचारत विचारात जात होतो. मोह बुद्रुक शाळा कधी आली, ते कळलेच नाही. कारण चहुबाजूंनी घरे आणि मध्येच शाळेची बैठी इमारत. आमच्यापुढेच टू व्हीलरवर एक बाई जात होत्या. बहुतेक त्या शाळेतील शिक्षिका असाव्यात, असा अंदाज केला आणि तो खराही ठरला. मोह बुद्रुक शाळेची इमारत दिसली आणि गाडी थांबवली. विशाखाताई हसत हसत पुढे आल्या आणि आमचे स्वागत केले. बाईंच्या कार्यालयामध्ये आम्ही बसलो. बाहेर ऊन असले तरी, खोलीत बर्यापैकी गारवा होता. या शाळेत आम्ही पहिल्यांदा आलो, म्हणून जरा आजूबाजूला फेरफटका मारायला बाहेर पडलो. ओळखपाळख नसतानाही शाळेच्या बाजूच्या घरातील जोडप्याने चौकशी केली. पुढे रस्ता नदीवर जातो; पण डोंगर उतरावा लागेल, असेही सांगितले. मग आम्ही मागे फिरलो. तोपर्यंत शाळा भरली होती. रडे पाड्यातील मोरेश्वर ठाकरे सर आपल्या शाळेतील मुलांना घेऊन आले होते. सोबत काही पालकही आले होते. प्रार्थना झाली. ओमकारने मुलांशी संवाद साधला आणि पुढची सूत्रे चित्रकार श्रीबा आणि प्राचीच्या हातात दिली. भूषण फोटो काढण्यात मग्न होता. मी मात्र आजूबाजूला निरीक्षण करत होते. मो. बुद्रुक बैठी छोटीशी शाळा. चारी बाजूंनी रस्ते. शाळेला कुंपण नाही. आजूबाजूला चिकटून घरे. पळत पळत येताना एकदा विद्यार्थी चुकून वर्गात जाण्याऐवजी कुणाच्या तरी घरातच जावा, एवढी शाळेच्या जवळ घरे. गंमतच वाटत होती मला हे बघून. पण खरी मजा तर नंतर आली. श्रीबाने मुलांना पणती कशी रंगवायची ते सांगितले. शुभेच्छा कार्ड तयार करायचे, आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गातील पानाफुलांपासून बनवायचे हे सांगितले. मग काय? मुले कामाला लागली. आजूबाजूला एवढी रंगीबेरंगी फुले होती, त्यांचा मुलांनी मनसोक्त वापर करून घेतला. सगळे ग्रुपने काम करायला बसले. आजूबाजूच्या घरातील माणसे प्रेक्षकांच्या भूमिकेत होती. सगळी अगदी वाकून वाकून पाहात होती. तेवढ्यात एक मोठा बकर्यांचा कळप आला आणि मुलांनी पटापट बाजूला होऊन पणत्या, ब्रश, रंग सगळा पसारा उचलत बकर्यांना वाट करून दिली. अरे बापरे! त्या क्षणी पटकन काय घडले, ते आमचे आम्हालाही कळले नाही. बकर्या ब्याऽ ब्याऽऽ करत इकडेतिकडे बघून निघूनही गेल्या. मुले परत स्थानापन्न झाली. आम्हाला तर खूप मजा आली. मग पाण्याची वेळ झाल्यामुळे बायका डोक्यावर, हातात, कंबरेवर पाण्याचे घडे घेऊन पाणी भरण्यासाठी आल्या. मुलांनी त्यांनाही वाट करून दिली. मुले नीट पणत्या रंगवतात की नाही, हे पाहण्यासाठी कोंबड्या तर आजूबाजूला फिरतच होत्या. मग एक मोठा पाण्याचा पाईप मागवून नळापर्यंत लावला. या सगळ्यांची रोजची मुलांना सवय असल्यामुळे ते त्या त्या वेळेला बरोबर बाजूला होऊन जागा करून देत होते. हे सगळे मघापासूनचे दृश्य पाहून संभ्रमात पडलो की गावात शाळा आहे की शाळेत गाव आहे! ही अशी शाळा आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो. मुलांच्या पणत्या रंगवून झाल्या होत्या. “त्या सुकविण्यासाठी बाजूला एका कागदावर ठेवा,” असे मुलांना मी सांगितले.
“ओ मॅडम, ती शाळा नाही. ती शेजारच्यांच्या घराची पडवी आहे!” बापरे! मला वाटले की तो वर्गच आहे. इतकी घरे शाळेला लागून होती. मुले पणत्या रंगविण्यात आणि कार्ड बनविण्यात दंग होती. त्या वेळात आम्ही विशाखाताईंशी संवाद साधला. गेली ११ वर्षे या शाळेत शिक्षिका आणि आणि आता मुख्याध्यापिका असलेल्या विशाखाताईंनी सांगितले की मोह बुद्रुक या शाळेच्या चारी बाजूंना रस्ते आहेत. त्यामुळे शाळेला कुंपण घालता येत नाही. वाहनांची सतत ये-जा चालू असतेच. पण मजेची गोष्ट म्हणजे कधी कधी बकर्यापण वर्गात येतात. बैलही शाळेत येतो. या सर्वांची आम्हाला सवय झाली आहे. मन विचलित करणार्या गोष्टी आजूबाजूला असल्या तरी, मुले अभ्यासात हुशार आहेत. त्याचप्रमाणे, खेळातही हुशार आहेत. शाळेने भरपूर बक्षिसे मिळवली आहेत. नवनवीन गावांतील सगळी मुले याच शाळेत येतात. एखाद-दुसरे मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते. मनात विचार आला, आपल्याइकडे सर्व सुखसोयींनी सज्ज असलेले चकचकीत वर्ग आहेत. मुलांना शिकण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य पालक तत्परतेने मुलांना पुरवत आहेत. ट्युशन आहे, क्लासेस आहेत. अभ्यासासाठी लागणारे पुरेसे वातावरण आहे. विक्रमगडमधील या शाळेची परिस्थिती यापेक्षा विपरित. पण तरीही कला, कल्पकता ठासून ठासून भरलेली. पणत्या रंगवून झाल्या होत्या. आजूबाजूच्या निसर्गाचा पुरेपूर फायदा घेऊन मुलांनी शुभेच्छा कार्डही खूप सुंदर बनवली होती. बाईंचा आणि मुलांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. मोह बुद्रुकने आम्हा सर्वांना मोहवून टाकले होते. मुंबईतील दिवाळीचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी, कानठळ्या बसविणारे फटाके, धुराचा लोट या सगळ्यांनी सभोवतालचे वातावरण व्यापून गेले होते. पण रोज पणती लावताना आठवण आली ती मोहवून टाकणार्या मोहच्या मोहमयी दिवाळीची!
पूर्णिमा नार्वेकर
(अधिक माहितीसाठी संपर्क : लेट्स इमॅजिन टूगेदर फाऊंडेशन - ९८२०००३८३४)