सातारा : ( Eknath Shinde ) “महायुतीला बहुमत मिळालेले असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकायला काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. “कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही,” असे ते म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील उमेदवार महेश शिंदे आणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “काँग्रेसबरोबर केलेला घरोबा बाळसाहेबांनाही मान्य नव्हता. म्हणून आम्ही उठाव केला आणि धनुष्यबाण वाचवला आणि शिवसेना वाढवली. आज राज्यभरातून कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहेत. लोकसभेत उबाठाच्या समोर १३ जागा लढलो. त्यांतील सात जागा आपण जिंकलो. त्यामुळे शिवसेना कोणाची हे जनतेने सिद्ध केले. आम्ही विचारांची प्रतारणा करणार नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
“पाटणमध्ये तिरंगी लढत नाही तर, एकच रंग दिसतोय तो म्हणजे भगवा रंग. कोणीही येवो पाटणचा गड शंभूराज देसाईच सर करणार,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. “आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा शंभूराज देसाई माझ्या दोन पाऊले पुढे होते. त्यामुळेच त्यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद दिले,” असे त्यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण योजने’चा पुढील हप्ता डिसेंबरमध्येच
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली. “निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरमध्येच पुढील हप्ता मिळणार आहे,” असे त्यांनी सांगितले. ते महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ सातार्यातील कोरेगाव येथे जाहीर सभेत बोलत होते. “दि. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागला की डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात टाकणार. लाडक्या बहिणींना लखपती झालेले बघायचे आहे,” असे ते म्हणाले. “पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते, तर आमचे सरकार हप्ते भरणारे आहोत,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.