बीडच्या विकासाचे मॉडेल

06 Nov 2024 11:00:43
 
beed
 
 
‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI) ‘पद्मविभूषण’ नानाजी देशमुख यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली दि. ८ मार्च १९६८ रोजी स्थापन करण्यात आली. ‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI) अंतर्गत ‘जनशिक्षण संस्थान’ या उपक्रमाद्वारे बीड येथे समाजाभिमुख काम सुरू आहे. भारतीय समाजाचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास आणि पुनर्बांधणी करण्यासाठी विकासाचे मॉडेल विकसित केले गेले आहेत. बीड येथील या उपक्रमाचा आणि ‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI)च्या कामाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
 
दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI)चे काम दिल्ली, गोंडा, बलरामपूर (उत्तर प्रदेश), चित्रकूट (उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश), बीड, नागपूर (महाराष्ट्र) अशा विविध राज्यांतील शहरांमध्ये चालते. ‘आम्ही आमच्यासाठी नाही, तर समाजातील जे उपेक्षित पीडित आहेत, अशा शेवटच्या घटकासाठी काम करणे,’ हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या उद्देशाने ‘दीनदयाळ संशोधन संस्थे’ने खालील प्रमुख कार्यक्रम हाती घेतले आहेत.समाजाच्या युगानुकुल पुनर्रचनेसाठी शाश्वत शेती, जलसंधारण आणि पर्यायी औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात लोकांना नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन करण्यासाठी ग्रामीण विकास आणि प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे.वैद्यकीय संशोधन, वैद्यकीय सेवा, आयुष्यभर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या क्षेत्रांतील उपक्रम आणि ग्रामीण भागात शैक्षणिक व तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे उभारणे.
 
बीडमध्ये हे केंद्र कसे उभे राहिले, तर त्याची सुरुवात एका संस्कारक्षम पाळणाघर आणि बालवाडीने झाली. १९९५ मध्ये ‘दीनदयाळ शोध संस्था’ बीड येथे एक संस्कारक्षम पाळणाघर व बालवाडी सुरू झाली. नानाजींपासून प्रेरणा घेऊन आलेले एक समाजशिल्पी दाम्पत्य गणेश पाठक व मृदुल पाठक यांनी ‘दीनदयाळ शोध संस्थे’च्या हितचिंतकाच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आणि आता त्याअंतर्गत नानाजी देशमुख विद्यामंदिर असे एक मातृभाषेतून शिक्षण देणारे विद्यालयपण येथे चालू आहे. या शाळेमध्ये मुलांना हसत-खेळत शिक्षण व अभ्यासाबरोबर राष्ट्रप्रेमाचेही धडेही दिले जातात. तसेच, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दहा दिवसांचे व्यक्तिमत्व विकास शिबीर घेतले जाते. बीडमध्ये असलेला तिसरा प्रकल्प म्हणजे ‘मथुरा महिला उद्योग प्रतिष्ठान.’ यामध्ये गरजू महिलांना रोजगार देऊन काही घरगुती अन्नपदार्थ, जसे की लोणचे, पापड, खारोड्या, कुरवड्या तयार करून त्यांची विक्री करण्याचीही व्यवस्था आहे, जेणेकरून महिलांना रोजगार मिळेल व त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.
 
जनशिक्षण संस्थान, बीड : स्वावलंबनाचा उत्तम मार्ग
 
भारतरत्न नानाजी देशमुखद्वारा स्थापित ‘दीनदयाळ शोध संस्थान’ला २००४ साली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयद्वारा ‘जनशिक्षण संस्थान’ ही योजना बीड जिल्ह्यासाठी मिळाली.
 
उद्देश - जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील निरक्षर, नवसाक्षर, कमी शिकलेले तसेच पदवीपर्यंतचे प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना वेगवेगळ्या व्यवसायांचे कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करणे.
 
याला अनुसरूनच, जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण वाडी, वस्ती, तांडे इत्यादी भागांचे सर्वेक्षण करून त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून संबंधित विषयाचे ‘प्रशिक्षण तुमच्या दारी’ या ब्रीदवाक्यास अनुसरून सर्व साहित्यसामग्री व यंत्रणा तेथे उभी करून प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये महिलांसाठी टेलरिंग, पार्लर, कापडी बॅग व जूट बॅग तयार करणे आर्टिफिशियल ज्वेलरी, हॅन्ड एम्ब्रोईडरी, मॅक्रोम निटिंग, फळ प्रक्रिया तसेच पुरुषांसाठी इलेक्ट्रिकल टेक्निशियन, टू व्हीलर रिपेरिंग, प्लंबिंग अशा प्रकारचे साधारणतः तीन ते पाच महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. २०१८ साली ही योजना मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून कौशल्य विकास मंत्रालयाकडे स्थानांतरित करण्यात आली.बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील जवळपास २०० गावांपर्यंत ‘जनशिक्षण संस्थान’ पोहोचले आहे.अशा प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ जवळपास ४५ हजार लोकांनी घेतला असून साधारणतः ४० टक्क्व् लोकांनी स्वतःचे उद्योग-व्यवसाय सुरू केलेले आहेत.
 
-: काही विशेष प्रशिक्षण :-
 
नियमित लाभार्थ्यांबरोबरच दरवर्षी काही विशेष लोकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांमध्ये जिल्हा कारागृहातील कैदी महिला व पुरुषांना इलेक्ट्रिकल टेक्निशियन, टेलरिंगचे प्रशिक्षण दिले जाते.
 
 दिव्यांगांना प्रशिक्षण
 
सामान्य लोकांबरोबरच दिव्यांग लोकांना इलेक्ट्रिकल टेक्निशियन, प्लंबिंग यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवण्याचे कार्य केले जाते.
 
पारधी वस्तीतील महिलांना प्रशिक्षण
 
पारधी समाज हा सामान्य लोकांपासून दूर राहिलेला समाज आहे. इतर समाजाजवळ जाण्यासाठी किंवा त्यांच्यात मिसळण्यासाठी आजही त्यांना भीती वाटते. म्हणूनच, ज्यावेळेस समाज बदलत नाही, तेव्हा आपण स्वतः बदलले पाहिजे, या भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या विचारांना अनुसरून ‘जनशिक्षण संस्थान’ बीडद्वारा अनेक पारधी वस्त्यांवर जाऊन टेलरिंग, हॅण्ड एम्ब्रोईडरी विषयाचे प्रशिक्षण दिले आहे.
 
तृतीयपंथीयांना प्रशिक्षण
 
हा वर्ग सामान्य माणसांत मिसळण्यासाठी आजही तयार नाही. 
अंबेजोगाई येथील पाच तृतीयपंथीयांना जूट बॅग शिवण्याचे साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
स्किल हब व संकल्प प्रोजेक्ट
 
कौशल्य विकास मंत्रालयद्वारा या योजनेअंतर्गत टेलरिंग, पार्लर व डेटा एन्ट्री ऑपरेटर या विषयाचे १४६ युवक-युवतींना निशुल्क प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तसेच पूर्ण देशभरातून ५० ‘जनशिक्षण संस्थान’च्या संकल्प प्रोजेक्ट अंतर्गत निवड करण्यात आली असून त्यामध्ये ‘जनशिक्षण संस्थान’ बीडचा समावेश आहे.
 
उपजीविका केंद्र
 
‘जनशिक्षण संस्थान, बीड‘द्वारा प्रशिक्षण घेऊन बचतगटाच्या माध्यमातून तसेच काही वैयक्तिक स्वरूपाच्या व्यावसायिकांचे ‘भारतरत्न नानाजी देशमुख उपजीविका केंद्र’ या नावाने एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये साडी, पेटिकोट, फ्रिज कव्हर, न्यू बॉर्न बेबी किट, जूट बॅग, कापडी बॅग, शबनम बॅग, हँडीक्राफ्टच्या वस्तू, आर्टिफिशियल ज्वेलरी इत्यादी प्रकारचे उत्पादने उपजीविका केंद्राद्वारा विक्रीस उपलब्ध असतात.
 
शासनाच्या योजना समाजापर्यंत पोहोचवणे
 
‘जनधन योजना’, ‘प्रधानमंत्री विमा योजना’, ‘पी. एम. विश्वकर्मा योजना’ इत्यादी योजनांची लोकांना माहिती दिली जाते. जाणीव जागृती स्वच्छता पंधरवडा, जन भागीदारी, स्वच्छता ही सेवा अभियान, युवा कौशल्य दिन, योग दिन, कौशल दीक्षान्त समारंभ, जनजाती गौरव दिन, भारतीय भाषा दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, रोजगार मिळावे इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या त्या कार्यक्रमाविषयी जाणीव जागृती केली जाते.
 
‘पी. एम. विश्वकर्मा योजने’अंतर्गत १८० प्रकारच्या कारागिरांना व्यवसायवृद्धीसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थसाहाय्य देऊन सक्षम करण्यासाठी ही योजना अमलात आणली असून त्यानुसार (सुतार, न्हावी, शिंपी) अशा प्रकारच्या कारागिरांना प्रशिक्षण दिले आहे. सर्वांच्या बँक खात्यात प्रत्येकी चार हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा झाली असून अनेकांना एक लाख रुपयाचे बँकेद्वारा कर्ज मिळाले आहे. युवा कौशल्य दिन, योग दिन, स्वच्छता पंधरवडा, जनभागीदारी, जनजाती गौरव दिन, भारतीय भाषा दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, महिला मेळावे, रोजगार मिळावे इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणीव जागृती केली जाते.
 
उत्तम प्रकारच्या प्रशिक्षणातून स्वावलंबनामुळेच बीड जिल्ह्यातील जनतेचा मोठ्या विश्वासाने प्रशिक्षण घेण्याकडे कल आहे. तसेच, बीड जिल्ह्यातील विकासात्मक कामामध्ये ‘जनशिक्षण संस्थान, बीड’चा महत्त्वाचा सहभाग आहे.
डॉ. सीमा जोशी
८२७५३८७०६४
Powered By Sangraha 9.0