प्रशांत दामले हिटलर तर चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे; ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित
06-Nov-2024
Total Views |
मुंबई : विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी निर्मित 'मु.पो.बोंबिलवाडी' या चित्रपटात अभिनेते प्रशांत दामले हिटलरची भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करत त्याची माहिती देण्यात आली. आता परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात चर्चिल कोण साकारणार हे देखील जाहिर झाले आहे. अभिनेते आनंद इंगळे या चित्रपटात चर्चिलची भूमिका साकारणार आहेत.
१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होवू घातलेल्या या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट मल्टी-स्टारर आहे. प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.
परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांच्या गतवर्षी चित्रपटगृहांमध्ये धमाल उडवून देणाऱ्या ‘वाळवी’ला अलीकडे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘नाच गं घुमा’ने यंदा प्रचंड प्रतिसाद मिळविला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची. व ची. सौ. का., आत्मपॅम्प्लेट यांसारख्या त्याधीच्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद द्विगुणीत करत परेश आणि मधुगंधा यांनी त्यांच्या ‘मु.पो.बोंबिलवाडी'ची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली.
चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रदर्शित केलेल्या मोशन पोस्टरवरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते. या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजेलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून ही चित्रपट निर्मिती संहितेत काही बदल करून केली गेली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी म्हणाले, “मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक लोकांना इतके आवडले की तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता! ‘बोंबिलवाडी’सारख्या छोट्या गावात इंटरनॅशनल घटना घडतात आणि त्यावर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा निकाल लागतो ही फार्सिकल गोष्ट आजही तितकाच व्यायाम देईल फुप्फुसांना!”
चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच इतर कसलेले कलाकार चित्रपटात आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत. ही एक धमाल लाफ्टर राईड झाली आहे.”
विवेक फिल्म्सचे भरत शितोळे या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले, “आपल्या मातीतील ही कथा आहे आणि आपल्या मातीमध्ये येणारी आंतरराष्ट्रीय पात्रे व त्यांची होणारी भीड याची गम्मत आहे या चित्रपटामध्ये. हे नाटक आम्ही बघितले आहे. नाटक आणि चित्रपटात ह्युमर आणि फार्स समान आहे. चित्रपट इतका सुंदर आणि विनोदाच्या इतक्या वेगळ्या पातळीला जातो कि हसून हसून पुरेवाट होते.”