योगी आदित्यनाथ यांचा झारखंडमध्ये प्रचार, ‘बटेंगे तो कटेंगे’चा पुनरुच्चार
06-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : “उत्तर प्रदेशप्रमाणेच झारखंडमधील माफियांचाही इलाज करण्याची क्षमता केवळ भाजपमध्येच ( BJP ) आहे,” असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये केला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोडरमा, बरकागाव आणि जमशेदपूर येथे जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सत्ताधारी झारखंडमुक्ती मोर्चासह काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “राज्यात माफियांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
गरिबांना त्यांचे घर बांधण्यासाठीदेखील वाळू उपलब्ध होत नाही. मात्र वाळू माफियांना विद्यमान राज्य सरकारचे संरक्षण आहे. त्यामुळेच दारू माफिया, भूमाफियाही येथे प्रस्थापित झाले आहेत. उत्तर प्रदेशातही २०१७ सालापूर्वी माफियांचे वर्चस्व होते आणि गरीब, शेतकरी, महिला, तरुण यांचे बळी घेण्याचे काम सुरू होते. मात्र, २०१७ सालापासून भाजप सरकारचे बुलडोझर सुरू होऊन सर्व प्रकारचे माफिया आज उत्तर प्रदेशातून बाजूला होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे माफियांचा इलाज करण्याची क्षमता केवळ भाजपमध्येच असल्याची ग्वाही योगी आदित्यनाथ यांनी दिली.
औरंगजेबाने भारतास लुटले. त्याचप्रमाणे, राज्यातील मंत्री आलमगीर लुटमार करत असल्याचा घणाघात योगी आदित्यनाथ यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “ज्या ज्या वेळी देश जात, प्रदेश आणि भाषेच्या वादात सापडला, त्या त्या वेळी देशाला क्रौर्याचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे जातीच्या नावावर विभाजित होणे टाळा. आपल्यामध्ये फूट पाडणारे हे देशाशी गद्दारी करत आहेत. त्यांच्या अजेंड्यात भारताचे हित नव्हे, तर भारताचा द्वेष आहे. ही वेळ विभाजित होण्याची नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या ध्येयानुसार काम करण्याची आहे,” असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले.