हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कथा! अभिषेक बच्चनच्या ‘I want to Talk’चा भावुक ट्रेलर प्रदर्शित
06-Nov-2024
Total Views |
मुंबई : मनोरंजनसृष्टीत गेले काही दिवस अभिषेक बच्चनबद्दल बऱ्याच चर्चा होत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाबद्दल एकीकडे चर्चा सुरु असताना दुसरीकडे त्याच्या I Want To Talk या चित्रपटाच्या कथेबद्दल बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर समोर आलं होतं ज्यात अभिषेकचं पोट वाढलं होतं आणि त्याला काहीतरी सांगायचं आहे असा आर्विभाव त्याच्या चेहऱ्यावर होता. आता याच चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
अभिषेक बच्चनच्या I want to Talk ट्रेलरच्या सुरुवातीला अभिषेक बच्चनच्या गळ्याला पट्टा दिसतो. नंतर त्याची मुलगी त्याला इंग्रजीमधील काही अक्षरं बोलायला सांगत असते. अभिषेक अडखळत अडखळत ती अक्षरं बोलताना दिसतो. पुढे तो डॉक्टरांकडे जाताना दिसतो. एकूणचं असं दिसतं की अभिषेककडे जगण्यासाठी फार कमी दिवस आहेत. दुसरीकडे त्याच्या मुलीसोबत त्याचे मतभेद दिसून येतात.
अभिषेकला एकीकडे आपले उर्वरीत दिवस आनंदात जगायचे आहेत तर दुसरीकडे त्याला मुलीसोबतचं नातं चांगलं करायचंय. एक बाप आणि माणूस म्हणून अभिषेकची तारेवरची कसरत यात दिसून येते. हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारा I want to Talk चा ट्रेलर भावूक करतो.
पिकू, पिंक, ऑक्टोबर, विकी डोनर या चित्रपटांचे दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी I want to Talk चं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत जॉनी लिव्हर यांचीही खास भूमिका असणार आहे.