मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sikhs Council on Khalistani) कॅनडाच्या 'ओंटारियो शीख एण्ड गुरूद्वारा कौन्सिल'ने हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. कौन्सिलने खलिस्तानींना फटकारत त्यांना शिष्टाचारात राहण्यास सांगितले आहे. कॅनडाच्या सरकारने हिंसक खलिस्तानी फुटीरतावादी घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नुकतीच त्यांनी एका पत्रकातून जारी केली आहे.
हे वाचलंत का? : कॅनडात झालेल्या हिंदूंवरील हल्ल्यात तीन आरोपी गजाआड
कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे दि.३ नोव्हेंबर रोजी खलिस्तानवाद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हिंदू सभा मंदिरावर हल्ला केला. त्याची तोडफोड केली आणि भाविकांना मारहाण केली. आरोपींवर कोणतीही कारवाई करण्याऐवजी कॅनडाच्या पोलिसांनी हिंदूंना दोषी असल्यासारखे वागवले. या घटनेबाबत पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारचा जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे. सरकारने गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कौन्सिलने पत्रकाद्वारे केली आहे.
ओंटारियो शिख एण्ड गुरूद्वारा कौन्सिलच्या पत्रकात म्हटले आहे की, शीख समुदायात हिंसा आणि धमक्या यासारख्या गोष्टींना स्थान नाही. सर्वांमध्ये शांतता, एकता असावी आणि प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. श्रद्धेचे ठिकाण हे हिंसाचाराचे आणि अशांततेचे ठिकाण नाही. ते एक पवित्र स्थान आहे. अध्यात्म आणि सर्वांच्या समान चिंतनासाठी ते बाजूला ठेवले पाहिजे. आम्ही आवाहन करतो की प्रत्येकाने संयमाने वागावे, सर्व समाजाचा आदर केला पाहिजे आणि यासाठी एकत्र काम करावे. सर्वांनी संघटित होऊन अशा घटकांविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहनही शीख समुदायाने समाजाला केले आहे. असे केल्यानेच शांततामय समाजाची स्थापना होऊ शकते.
भारत सरकारने यापूर्वीच कॅनडातील घटना गांभीर्याने घेतल्या आहेत आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण ट्रुडो यांनी खलिस्तानींवर कोणतेही नियंत्रण लादण्याची शक्यता कमी दिसते. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही भारतीय समुदायाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून सरकारने ठोस व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.