पिंपरी - चिंचवड : शरद पवार (Sharad Pawar) हे फेक नॅरेटिव्हचे मालक असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पवार साहेब तुमच्याकडून तरीही ही अपेक्षा नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड मतदारसंघात मतदारांना संबोधित करत असताना त्यांनी ६ ऑक्टोबर २०२४ रोजी केलेल्या भाषणात महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला.
सभेदरम्यान बोलत असताना त्यांनी उद्योगधंद्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यातील उद्योगदंधे महायुती सरकारने गुजरातला नेल्याची टीका विरोधक करत होते. शरद पवार सांगतात की राज्यातील उद्योग हे गुजरात येथे पाठवण्यात आले आहेत. राज्यात उद्योग आणले जात नाहीत. मात्र मी सांगतो येणाऱ्या काळात पुणे जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र, आयटी हब आहे. आम्ही आता याला टेक्नॉलॉजी हबमध्ये परिवर्तीत केलेलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी बोलत असताना केंद्र सरकारने देशातील एकूण गुंतवणूकींपैकी ५२ टक्के गुंतवणूक राज्यात करण्यात आली असल्याचे सांगितले. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्य सरकारने राज्याला गुंतवणूकीबाबत पहिल्या क्रमांकावर ठेवले होते. तसेच त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा कर्नाटक पहिल्या क्रमांकार गेले, त्यानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर गेले. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर आपले सरकार सत्तेत आलं आणि आपल्या सरकारने गुजरातला ओव्हरटेक केलं असे म्हणत फडणवीस यांनी जाहीर सभेत विकासाचा पाढा वाचून दाखवला.
ते पुढे म्हणाले की, मला सांगताना आनंद वाटतो की २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. पवार साहेब मला आश्चर्य वाटतं की तुम्ही उद्धव ठाकरे दोघेही गुजरातचे भूखंड असल्यासारखे वागत आहात. गुजरात सरकारला कोणतीही जाहीरात देण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांच्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे बॅटींग करत असल्याची जळजळीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
येत्या काळात पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या ५० वर्षाच्या कारकीर्दीत हे इन्फ्रास्ट्रक्चर का तयार झाले नाही? असा सवाल पुणे जिल्हा विचारेल याचे उत्तरही पवार साहेबांना द्यावे लागेल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर घणाघात केला.