लातूर : संपूर्ण मराठवाडा हा आधी हिंदुत्वाने भारावलेला होता. पण महान संत शरदचंद्रजी पवार यांनी लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी जातीचं राजकारण आणलं, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. बुधवारी लातूरच्या रेणापूरमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, "संपूर्ण मराठवाडा हा आधी हिंदुत्वाने भारावलेला होता, आजही आहे. मग १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाच्या जन्म झाला. त्यानंतर महान संत शरदचंद्रजी पवार यांना वाटलं की, हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा? लोकांना यातून बाहेर कसं काढायचं? यासाठी त्यांनी जातीचं राजकारण आणलं. तेव्हापासूनच महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरु झालं. जात ही प्रत्येकाला प्रिय असते. आपल्या जातीबद्दल प्रेम असणं यात काही वावगं नाही. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं इथून सगळा संघर्ष सुरु होतो. नेमक्या याच गोष्टी या सर्वांनी केल्या आणि तुमची माथी भडकवली," अशी टीका त्यांनी केली.
हे वाचलंत का? - मतदारांशी बोलताना वडेट्टीवारांची शिवीगाळ! भाजपकडून व्हिडीओ ट्विट
ते पुढे म्हणाले की, "आज आम्ही मूळ विषयाकडे जाण्यास तयार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय. त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. आज आमचा तरूण शेतीकडे न वळता शहराकडे का वळतोय, याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. आमची कृषी विद्यापीठे नुसती थंडगार बसलेली आहेत. तिथे काय चालतं हे कुणालाच माहिती नाही. आकडे काढून पाहिल्यास मराठवाड्यात महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. लहान मुलींवर बलात्काराचे प्रमाण वाढले. महाराष्ट्र असा नव्हता. मराठवाड्यात ८०० फूटांच्या खाली पाणी लागत नाही. तुम्ही कशी शेती करणार आहात? या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये, यासाठी तुमच्यासमोर हा जातीपातीचा विषय आणला आहे," असेही ते म्हणाले.