मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात बारामतीच्या प्रगतीसाठी विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "निवडणूकीत सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे जाहीरनामे जाहीर होत आहेत. महायूतीचा जाहीरनामादेखील येणार आहे. पण त्यासोबतच एक पक्ष म्हणून आमचा जाहीरनामा आम्ही जाहीर केला आहे. आम्ही ज्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहोत त्या प्रत्येक मतदारसंघाचा जाहीरनामादेखील आम्ही देत आहोत."
"एक वेगळा दृष्टीकोन घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करून त्या त्या भागाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही काम करतोय. या जाहीनाम्यात आमच्या आमदारांच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल आणि पुढील पाच वर्षे आमचे उमेदवार कोणती कामे करणार आहेत, याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघातील रहिवाशी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांसोबत सखोल चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि गरजांना जाहीरनाम्यात प्राधान्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आपल्याला जे शक्य आहे आणि आपण जे पार पाडू शकतो त्याच गोष्टींचा आम्ही विचार केला आहे. बारामतीचा उमेदवार म्हणून बारामतीचा जाहीरनामा सादर करण्याचा मला अभिमान आहे," असे ते म्हणाले.
जाहीरनाम्यातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे :
१) गेल्या ३३ वर्षांपासून बारामतीत प्रगतीचा नवीन आलेख गाठणं हे एकमेव ध्येय.
२) बारामतीला देशातील सर्वात आदर्श आणि प्रगत तालुका बनवण्यासाठी कटिबद्द.
३) बारामतीमध्ये महाराष्ट्रातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारणार.
४) बारामतीतील शेतकऱ्यांसाठी ५ हजार कृषी आधारित एमएसएमई फुड प्रोसेसिंग युनिटचं एक नेटवर्क स्थापन करणार. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
५) बारामतीत एक लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार
६) बारामतीला भारतातील पहिलं सौर ऊर्जा शहर बनवण्याचा मानस.