Iffi 2024: राज कपूर, तपन सिन्हा, अक्कीनेनी नागेश्वर राव,मोहम्मद रफी यांची जन्मशताब्दी साजरी करणार

06 Nov 2024 14:06:15
 
iffi 2024
 
 
मुंबई : ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फी यंदा भारतीय चित्रपटाच्या अनेक पैलूंना आकार देणाऱ्या चार व्यक्तिमत्वांना आदरांजली अर्पण करणार आहे. राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) आणि मोहम्मद रफी यांच्या संपन्न वारशाचे स्मरण त्यांनी चित्रपट जगतासाठी दिलेले योगदान चित्रपट प्रदर्शन, प्रत्यक्ष चर्चा, परिसंवाद आदी विविध कार्यक्रमांमार्फत उपस्थितांसमोर मांडण्यात येणार आहे.
 
भारतीय चित्रपट जगतातील या चार मानबिंदूंना विशेष आदरांजली म्हणून इफ्फी त्यांच्या एनएफडीसी-एनएफएआयने पुनरुज्जीवित केलेल्या काही अभिजात कलाकृती प्रेक्षकांना अनुभवता याव्यात म्हणून घेऊन येत आहे. बारकाव्यांकडे लक्ष पुरवून निर्माण केलेल्या या चित्रपटांच्या पुनरुज्जीवित प्रतींमुळे प्रेक्षकांना अतिशय भव्य आणि कलासंपन्न अनुभव घेणे शक्य होईल.
राज कपूर यांचा ‘आवारा’ हा चित्रपट डिजिटली पुनरुज्जीवित केला असून कपूर यांच्या चित्रपटातील सामान्य माणसाच्या जीवनप्रवासातील जिव्हाळा, विनोद आणि सहानुभूती यांची अनुभूती महोत्सवात विशेष ठरणार आहे.
 
तपन सिन्हा दिग्दर्शित ‘हार्मोनियम’ हा कालातीत चित्रपट, क्लिष्ट विषय कथाकथनातून मांडण्याच्या त्यांच्या कौशल्याचे प्रेक्षकांना दर्शन घडवेल. लक्षवेधी संकल्पना आणि सखोल कथन असलेला ‘हार्मोनियम’, सिन्हा यांचा कलात्मक वारसा आणि चित्रपट साकारण्याच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे.
 
चित्रपटाच्या इतिहासात एएनआर यांचा ठसा उमटवलेल्या ‘देवदासू’ चित्रपटाची पुनरुज्जीवित प्रत इफ्फीमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. एएनआर यांनी पडद्यावर साकारलेला देवदास समकालीन प्रेक्षकांना भारतीय सांस्कृतिक ओळख असलेल्या या भावनिक व्यक्तिमत्वाशी जोडून घेण्याची संधी देईल.
 
‘हम दोनो’ या आणखी एका कालातीत चित्रपटाच्या वर्धित ऑडिओ-व्हिज्युअल प्रतीचे प्रदर्शन केले जाणार आहे. मोहम्मद रफी यांनी अमर केलेली गीते असलेल्या या चित्रपटाच्या पुनरुज्जीवित प्रतीचे प्रदर्शन रफी यांचे भारतीय संगीत आणि चित्रपटातील अपवादात्मक योगदान साजरे करते, त्यांच्या आवाजाची जादू सर्व पिढ्यांसाठी पुनरुज्जीवित झाली आहे.
 
 
 
कालातीत चित्रपटांच्या पुनरुज्जीवित प्रतींच्या प्रदर्शनासह इफ्फीमध्ये यंदा या चार व्यक्तिमत्वांच्या वारशाचाही गौरव होणार आहे. उद्‌घाटन सोहळ्यात या चौघांच्या जीवनाचा, यशाचा गौरव करणारा नेत्रदीपक कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमाला चौघांच्या चित्रपट जगतातील प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाची जोड दिली जाणार आहे.
इफ्फी या चार दिग्गजांच्या सन्मानार्थ विशेष सन्मानभाव म्हणून त्यांना समर्पित एका अनोख्या माय स्टॅम्पचे प्रकाशन करेल. माय स्टॅम्प हे या चार दिग्गजांनी भारतीय संस्कृती आणि चित्रपटांवर उमटवलेल्या ठशाचे प्रतीक आहे.
Powered By Sangraha 9.0