मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर यांच्या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या रथयात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी कांदिवलीतील वार्ड क्रमांक २७ मध्ये साई मंदिर परिसरातून काढण्यात आलेली रथयात्रा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि विविध घोषणांच्या जल्लोषात पार पडली.
याप्रसंगी अतुल भातखळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "कांदिवलीतील जनतेने या रथयात्रेला मोठा प्रतिसाद दिला आहे. उत्तर मुंबईतील सहाही जागांवर महायूतीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. विरोधकांनी जनतेला जात, प्रांत, भाषेच्या मुद्यावर वाटण्याचा आणि भेदभाव मूळ काँग्रेसी व्यवसाय आता बंद करावा. या व्यवसायामुळेच २५ वर्षांपासून गुजरातमध्ये काँग्रेस जिंकू शकली नाही."
"मी १० वर्षे कुणाचीही जात, पंथ, भाषा, मजहब, पक्ष यातलं काहीही न बघता सेवाभावाने जनतेची कामं केलीत. त्यामुळे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय हे सगळेच बांधव माझ्या सोबत आहेत. यावेळी बऱ्याच लोकांनी फुलांचा वर्षाव करत माझं स्वागत केलं. तसेच 'अतुलजी फिरसे' अशा रांगोळ्या काढल्या. जनतेचं हे प्रेम बघून मला खूप आनंद होत आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.