योगाने स्वास्थ्य

05 Nov 2024 10:17:53
 

YOGA
 
आपण मागील काही लेखांपासून स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था - श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्या अर्ध आणि पूर्ण स्थिती आसनांचा अभ्यास आपण केला. त्यासाठी सकाळचा वेळ हा केव्हाही उत्तम. स्वास्थ्यरक्षणासाठी काही विशिष्ट आसनांचा सायंकाळी अभ्यास करावयाचा असतो. सायंकाळी आपण शरीराने आणि मनाने थकलेलो असतो. दिवसभरात केलेल्या कामाचा ताण शरीर व मनावर असतो. आपण घरी येतो, हात धुतो आणि जेवतो. शरीरातील व मनातील ताण तसाच राहतो. तो काढण्यासाठी विशिष्ट आसनांचा अभ्यास सायंकाळी केल्यावर तो ताण नाहीसा होऊन, रात्री झोपसुद्धा चांगली लागते. त्या आसनांच्या अर्ध स्थितीचा अभ्यास आज येथे करूया.
 
१) शवासन-२ : लेखांक-१७ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे.
 
२) विपरित करणी :
 
कृती :
 
अ) शवासनातून दोन्ही पाय जोडून ९० अंशांत उचलून थांबा. गरज असल्यास दोन्ही हातांनी पाय गुडघ्यामागून धरून थांबावे. गुडघे आकाशाकडे दाबत राहा. पाऊले स्वतःकडे खेचत राहा. डोळे बंद करून ताणाचा अनुभव करा. याला ‘अर्ध हलासन’ असे म्हणतात. 
ब) आता दोन्ही हात नितंबाखाली घालून कोपरावर जोर देत शरीर १२० अंशांत वर उचला. शरीराचा पूर्ण भार हातांवर पेला.
क) डोळे उघडून बघा, पायांचे अंगठे डोक्याच्या सरळ रेषेत आणा; त्यासाठी पाऊले आडवी करा.
ड) आता डोळे बंद करून जीभेचे टोक घशात घालून थांबा.
इ) घशातील ग्रंथींना मनाने उपचार करा. स्वस्थ, सुदृढ, ताणविरहित.
ई) पायातून सगळे रक्त कमरेपर्यंत, तेथून खांद्यापर्यंत येत आहे, असा अनुभव करा.
उ) ताण नको असेल तेव्हा हळूच ९० अंशांत खाली येऊन थांबा.
ऊ) शवासनात जाऊन विश्राम करा. सर्व रक्त पायापर्यंत वाहत आहे, असा अनुभव करा.
 
फायदे : १) रक्तसंचालन उत्तम होते. २) शरीरातील थकवा नाहीसा होतो. ३) गळ्यातील ग्रंथी उत्तम राहून चयापचय क्रिया सुधारते. ४) शरीरात शक्ती येते, मरगळ कमी होते व उत्साह वाढतो. ५) शरीर कृश राहण्यास मदत होते.
 
पथ्य : हे आसन एकदाच करावे. चुकूनही आवर्तन करु नये. त्याऐवजी अवधी वाढवावा.
 
२) अर्ध - सुप्त वज्रासन :
 
कृती : १) वज्रासनात बसा. २) दोन्ही हात शरीराच्या मागे आशा रितीने ठेवा की हातांची बोटे पायांच्या बोटांना चिकटतील. ३) मान मागे सोडून, कमरेतून शरीर पुढे खेचत राहा. ४) कंबर, पाठ, मान येथे छान ताण अनुभवा. ५) शरीर लवचिक असल्यास, मनात आत्मविश्वास असल्यास एक एक कोपर जमिनीवर ठेवून हात बाहेर काढा. ६) मान मागे सोडून डोळे बंद करा. त्रिकास्थीमध्ये उत्तम ताण अनुभवा. ७) मग एक एक कोपर क्रमाने खाली सरकवून, डोक्याचा मध्य जमिनीवर ठेवा. ८) हात नाभीच्या बाजूला ठेवून कोपर शरीराच्या बाजूला ठेवा. ९) गुडघे एकमेकांना जोडून, कोपर जमिनीवर दाबत राहा. १०) डोळे बंद करून ताण अनुभवा. ११) उठून बसा. पुनश्च एकदा करा.
 
फायदे : १) अत्यंत आवश्यक, उपकारक आसन. २) पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक करते. ३) पाठ, कंबर, मानदुखी होत नाही. ४) किडनी स्वस्थ राहून, मधुमेह नियंत्रण साधते.
 
पथ्य : ज्यांना गुडघेदुखीचा त्रास होतो, त्यांनी साधी मांडी घालून लोडच्या आधारे करावे.
 
३) मकरासन : आधीच्या भागात चर्चिल्याप्रमाणे मकरासन करावे. त्यानंतर वेळ असल्यास, कंबर व पाठदुखी असल्यास अर्ध शलभासन सहा-सहावेळा व भुजंगासन दोन-तीन वेळा करावे.
 
४) शशांकासन : आधीच्या भागांत चर्चिल्याप्रमाणे, शशांकासन तीनवेळा करावे. ईश्वरप्रणिधान करावे.
 
(क्रमशः)
डॉ. गजानन जोग
 
(लेखक योगोपचारतज्ज्ञ समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५
Powered By Sangraha 9.0