आहारीय संकल्पना

    05-Nov-2024
Total Views |
 

DIET
 
पथ्य म्हणजे आहारीय पथ्य, विहारीय पथ्य आणि आचारीय (आचरण-वागणे) पथ्य. या सगळ्यांचा समावेश ‘पथ्य’ कल्पनेत होतो. आजच्या लेखामध्ये ‘आहारीय पथ्य’ ही कल्पना याविषयी जाणून घेऊया.
 
आयुर्वेदशास्त्रात औषधी चिकित्सेइतकेच महत्त्व पथ्याला देखील आहे. रुग्णाला होणारा त्रास याला ‘हेतू’ (रोग उत्पन्न करणारे कारण) म्हटले जाते आणि पथ्यपालनाने या हेतूंचा परिणाम कमी करण्यास मदत होते. पथ्यपालन हे केवळ आहारीय पथ्यापुरते मर्यादित नसते. बरेचदा रुग्ण जेव्हा चिकित्सेला येतो, तेव्हा ‘पथ्य खूप करावे लागेल का?’ असा विचार मनात घेऊन येतो. एका समारंभात एका प्रतिष्ठित व्यक्तीने मला सांगितले की, पथ्यपालन म्हणजे मांसाहार वर्ज्य असे आधी सांगितले जाते व त्यामुळे आयुर्वेदीय चिकित्सा घ्यायला रुग्ण तयार होत नाहीत. मी त्यांना सांगितले की, आयुर्वेदाने मांसाहार वर्ज्य सांगितलेला नाही. याउलट, विविध व्याधींमध्ये विशिष्ट मांसाचे पदार्थ खाण्यास सांगितले आहे. यामध्ये विविध पक्षी, प्राणी इत्यादींचा समावेश आहे.
 
काही रुग्ण स्वतःहून सांगतात, मला आंबट खाल्ले की त्रास होतो. अंगाला सूज येते किंवा वातुळ खाल्ले की पोटाला तडस लागते. काही वेळेस लहान मुलांना थंड खाल्ले की लगेच सर्दी-पडसे-ताप येतो. हे सगळे काय आहे? तर त्या त्या रुग्णांना त्या व्याधी, लक्षणे उत्पन्न करणारी ही पूरक कारणे (म्हणजेच हेतू) आहेत आणि म्हणून ते टाळल्यास रोग लवकर बरा होतो. त्याची तीव्रता कमी होते व सातत्यसुद्धा जाते. जुनाट तक्रारींमध्ये काही वेळेस अधिक काळ पथ्य पाळावे लागते व काही विशिष्ट आजारांमध्ये एखादे पथ्य नियमित पाळावेच लागते. पथ्य म्हणजे आहारीय पथ्य, विहारीय पथ्य आणि आचारीय (आचरण-वागणे) पथ्य. या सगळ्यांचा समावेश पथ्य कल्पनेत होतो. आजच्या लेखामध्ये ‘आहारीय पथ्य’ ही कल्पना याविषयी जाणून घेऊया.
 
आहार सेवनाचे, ग्रहणाचे काही नियम आहेत, जे सर्वांसाठी सारखेच आहेत आणि काही विशिष्ट नियम ऋतू आणि व्याधीसापेक्ष असतात. त्याबद्दल इथे सांगत नाही. आहार हा षड्रसात्मक असावा (म्हणजे मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय रसाचा चवीचा असावा.) याचाच अर्थ काय तर गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट चवीचे असावे. इथे जी गोड चव सांगितली आहे, ती स्वाभाविक गोड पदार्थांची आहे. साखर, गूळ घालून गोड जिन्नसांची चव अभिप्रेत नाही. उदा. गहू, तांदूळ, फळ इ. पदार्थ स्वभावाने गोड असतात. शरीरात पचन होतेवेळी त्याची चव मधुर राहते. मधुर रसाने समाधान, तृप्ती होते. जेवल्याचे समाधान होते. पोषक (पुष्टी) मिळते. शरीराला ताकद मिळते, ऊर्जा मिळते. पोट भरते, थकवा नाहीसा होतो आणि शरीराला विभिन्न कार्य करण्यामध्ये उत्साह येतो.
 
आम्ल पदार्थ तोंडाला चव आणतात. तोंडाला पाणी सुटते (लिंबू, चिंच, कैरी). याने शरीरातील अग्निचे (पाचकाग्नि-जठराग्निचे) संधुक्षण उत्तम होते, म्हणजे अग्निला, पचनशक्तीला पूरक आहे. बरेचदा रुग्ण सांगतात की, वेळ झाली म्हणून आम्ही जेवतो, विशेष अशी भूक लागत नाही. बहुतेक वेळेस आधी खाल्लेले अन्न पूर्ण पचले नसल्यामुळे भूकेची संवेदना होत नाही. काही वेळेस मानसिक ताण, उदासीनतेमुळे खावेसे वाटत नाही. पण, आंबट चवीने पचनालाही मदत होते आणि खाण्यात रुची उत्पन्न होते. आंबट चवीबरोबरच खारट चवीचीही गरज शरीरास असते. भूकेची चाहूल देण्यास आंबट चव अग्रक्रमावर आहे. पण, पचनाला मदत करण्यास खारट चवीची गरज असते. अन्न शिजविताना (भाजी, आमटी, इ) त्यात नेहमी थोडे मीठ अवश्य घातले जाते. याचे कारण अन्नाची चव वाढविण्यास ही खारट चव महत्त्वाची आहे
.
याच पद्धतीने कडू, तिखट व तुरट चवी गरजेच्या आहेत. भाज्या, डाळी, कोशिंबिरी, चटण्या या सर्व मुख्यत्वे करून याच चवीच्या असतात. त्यावर फोडणी देणे, शिजविणे (म्हणजेच, अग्निची प्रक्रिया-संस्कार इ.) केले जाते. हे करतेवेळी आधीच्या तीन चवींना (गोड, आंबट व खारट) त्यात घातले जाते. सर्व चवींची शरीराला जरी गरज असली, तरी सर्व सम प्रमाणात लागत नाहीत. भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकात व जेवणात ही मात्रा (PORTIONS) पाळली जाते. म्हणजे भात, पोळी-भाकरी अधिक प्रमाणात, आमटी-डाळी व भाज्या भात, पोळीपेक्षा कमी, त्यापेक्षा कोशिंबिरी कमी, मीठ, लिंबू अगदी चवीला. हे खरे पूर्णान्न - A-Balanced Food Diet. यामध्ये प्रदेशानुसार जिन्नस बनविण्याच्या कृतींमध्ये भिन्नता दिसून येते. पण, त्या त्या प्रदेशासाठी ते गरजेचे आहे, पूरक आहे.
 
अशा भिन्न भिन्न प्रदेशांतील व्यक्तींनी त्याच प्रदेशात तो आहार केला, तर तो पोषक ठरतो. पण, अन्य प्रदेशांत जाऊन पूर्वीचाच आहार ग्रहण केला, तर तो बाधू शकतो. कारण, प्रत्येक प्रदेशामध्ये ऋतू, तापमान इ.मध्ये फरक असतो. हल्ली एकाच खाण्यामध्ये विविध प्रदेश, राज्य नव्हे, तर परदेशांतील आहारीय पदार्थ एकाचवेळी खाल्ले जातात. उदा. छोले-भटुरेबरोबर चायनीज किंवा पिझ्झा-पास्ता बरोबर वडापाव-समोसा इ. किंवा सकाळी इडली-डोसा, दुपारी मासे आणि संध्याकाळी अन्य प्रदेशांतील, राज्यांतील, देशातील! एवढे पाककृतीतील वैविध्य पोटाला सहन होईल का? याबद्दल कधी विचार केलाय का?
 
बहुतेक वेळेस रात्री उशिरा जेवले जाते किंवा लवकर जेवल्यास रात्री परत थोडे खाल्ले जाते. गृहिणी किंवा शिफ्ट ड्युटी करणार्‍यांमध्ये दिवसाही जेवल्याजेवल्या वामकुक्षी करण्याची सवय असते. वामकुक्षी म्हणजे छोटी डुलकी जी १५ ते २० मिनिटांची अपेक्षित आहे. पण, दोन-अडीच तासापर्यंत व काही वेळेस यापेक्षाही अधिक काळ दुपारी झोपले जाते. जेवणामध्ये आणि त्यानंतर झोपण्यामध्ये दोन-अडीच तासांचे अंतर असावे. याचे कारण पोटात सर्वाधिक खाल्लेल्या अन्नावर पचनक्रिया होत असते. त्यासाठी एवढा वेळ लागतो. जो आहार आपण ग्रहण करतो, तोच आहार पुढे जाऊन शरीराचे पोषण करतो. हे घडण्यासाठी अन्नाचे पचन, विघटन व सार (पोषक भाग) आणि (मल-टाकाऊ भाग) किट्ट यामध्ये विभाजन अपेक्षित आहे. याचे बहुतांशी कार्य उदरात होते. यासाठी तिथे उत्तम रक्तपुरवठा असणे गरजेचे आहे. म्हणून, जेवल्याजेवल्या आडवे पडू नये, वामकुक्षी करू नये. शतपाऊली (शत - शंभर, पाऊले - Steps) म्हणजेच काय, तर थोड्या येरझार्‍या घालाव्या. हे झाले विहारीय पथ्य. असे न केल्यास पचनाच्या तक्रारी आम्लपित्त, मलबद्धतेपासून स्थूलता व अन्य तीव्र-जीर्ण स्वरूपातील व्याधी या सगळ्यांचे हेतू यात दडलेले आहेत. Healthy routine - Healthy Lifestyle याचा अर्थ काय? तर रात्रीची शांत झोप, पहाटे लवकर उठून प्रातःस्मरण (Meditation) व्यायाम, पूरक आहार व सकारात्मक विचार. उत्तम आरोग्यासाठी या सर्व गोष्टींची गरज आहे. हल्ली आयुर्मान वाढले आहे. पण, बरेचदा तिशी-चा़ळीशीतच मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडचे त्रास, स्त्रियांमध्ये पीसीओएस (विशी मध्येच) आणि वंध्यत्व इ. आजार जडून त्यांची आयुष्यभर चिकित्सा सुरू होते. वेळीच हेतू परिवर्जन जर केले, तर हे त्रास होऊ न देणे, त्यावर प्रतिबंध लावणे (Prevention) हे शक्य आहे.
 
आयुर्वेदात ‘विरुद्धान्न’ ही संकल्पना खूप विस्ताराने मांडलेली आहे. कारण, जे खातो त्यानेच आरोग्य प्राप्त होते, तर चुकीच्या खाण्याच्या सवयींनी अनारोग्याला सामोरेही जावे लागते. हे ‘विरुद्घान्न’ म्हणजे काही आहारीय पदार्थ एकत्र खाल्ल्यास, विशेष पद्धतीने तयार केल्यास, विशिष्ट वेळेत खाल्ल्यास रोगाचे हेतू होऊ शकतात. याला ’Incompatible Diet’ असे म्हणता येईल. असे ‘विरुद्धान्न’ खाल्ल्यामुळे शरीराला ते मानवत नाही. शरीराच्या प्राकृत कार्यात ते बाधा आणू शकते किंवा शरीराला अपायकारक ठरू शकते. तसेच, शरीराच्या पोषणप्रक्रियेस थांबवू शकतात. या विरुद्धान्नाबद्दल पुढील लेखात सविस्तर वाचूया.(क्रमशः)
 
वैद्य कीर्ती देव
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९