स्वत:ला लॉरेन्सचा भाऊ म्हणणारा आरोपी अटकेत, सलमान खानला धमकी देत ५ कोटींची मागितली होती खंडणी

05 Nov 2024 16:46:36
 
salman khan
 
 
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली होती आणि यात धमकी देणारा स्वत:ला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे म्हणाला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलमान खानच्या नावाने ट्रॅफिक पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो कर्नाटकचा आहे. विक्रम असं या व्यक्तीचं नाव असून कर्नाटक पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांचं पथक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी विक्रमला घेऊन मुंबईत येणार आहे.
 
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच, त्या व्यक्तीने ५ कोटींची खंडणी देखील मागितली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा देखील केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा मेसेज आला आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, पाठवलेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी रुपये द्यावेत. त्याने तसं केलं नाही तर आम्ही त्याला ठार मारू, आमची गँग अजूनही सक्रिय आहे असं धमकीमध्ये म्हटलं होतं.
Powered By Sangraha 9.0