मुंबई : ओडिया लेखिका प्रतिभा रे यांना ‘गोदरेज जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या ‘लिटफेस्ट २०२४’ मध्ये त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. प्रतिभा रे यांना त्यांनी १९७४ मध्ये लिहिलेल्या ‘बसंत बर्शा’ या कादंबरीने प्रसिद्धी मिळवून दिली होती. १० पेक्षा जास्त कादंबऱ्या, २६ लघुकथा संग्रह, १० प्रवासवर्णने, समीक्षात्मक निबंधांची पाच पुस्तके, दोन काव्यसंग्रह आणि अमृत अन्वेषा (अमृताच्या शोधात) नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. प्रतिभा रे यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मभूषण, पद्मश्री, साहित्य अकादमी, ओडिशा साहित्य अकादमी, मूर्तिदेवी आणि सप्तर्षी पुरस्कारांसह प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारतीय ज्ञानपीठ हा भारताचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या ओडिया महिला लेखिका आहेत. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहे. याव्यतिरिक्त त्यांचे ओडिशातील आदिवासी जीवन आणि संस्कृती यावर संशोधन प्रकाशित केले आहे.