पाकचे पुन्हा लॉकडाऊन

    05-Nov-2024   
Total Views |
 
Lockdown At Pakistan
 
पाकिस्तानने लाहोरमध्ये ‘ग्रीन लॉकडाऊन’ लावला आहे. लाहोरमध्ये भयंकर वायुप्रदूषण झाले आणि प्रदूषणाचा एक्यूआय एक हजारांच्या वर गेला. लाहोरमध्ये सध्या हजारो लोक आजारी पडले. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. लाहोर पंजाबची प्रांत मंत्री मरियम औरंगजेब हिने या आपत्तीबद्दल म्हटले की, “हे वायुप्रदूषण भारतातूनच आले.” पाकिस्तानी प्रशासनाने याबाबत भारताला कळवावे, असे मरियमचे म्हणणे. वायुप्रदूषण काय वस्तू आहे का, ती भारतातून पाकिस्तानमध्ये पाठवता येईल? पण, मरियम औरंगजेबच्या म्हणण्याला पाकिस्तानी मंत्र्यांनी दुजोरा दिला. त्यांचे म्हणणे असे की, पाकिस्तानमधील भयंकर वायुप्रदूषणासाठी भारतच जबाबदार आहे, तर या वायुप्रदूषणामुळे पाकिस्तानने लाहोरमध्ये एक आठवडा शाळांना सुट्टी दिली आहे. ५० टक्के कर्मचार्‍यांनी घरून काम करावे, असेही आदेश दिले.
 
पाकिस्तानने लाहोरमध्ये ‘ग्रीन लॉकडाऊन’ लावला आहे. लाहोरमध्ये भयंकर वायुप्रदूषण झाले आणि प्रदूषणाचा एक्यूआय एक हजारांच्या वर गेला. लाहोरमध्ये सध्या हजारो लोक आजारी पडले. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. लाहोर पंजाबची प्रांत मंत्री मरियम औरंगजेब हिने या आपत्तीबद्दल म्हटले की, “हे वायुप्रदूषण भारतातूनच आले.” पाकिस्तानी प्रशासनाने याबाबत भारताला कळवावे, असे मरियमचे म्हणणे. वायुप्रदूषण काय वस्तू आहे का, ती भारतातून पाकिस्तानमध्ये पाठवता येईल? पण, मरियम औरंगजेबच्या म्हणण्याला पाकिस्तानी मंत्र्यांनी दुजोरा दिला. त्यांचे म्हणणे असे की, पाकिस्तानमधील भयंकर वायुप्रदूषणासाठी भारतच जबाबदार आहे, तर या वायुप्रदूषणामुळे पाकिस्तानने लाहोरमध्ये एक आठवडा शाळांना सुट्टी दिली आहे. ५० टक्के कर्मचार्‍यांनी घरून काम करावे, असेही आदेश दिले. वायुप्रदूषण करणार्‍या सगळ्याच घटकांवर नियंत्रण आणले आहे. नियंत्रणाचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा देणार आहे वगैरे वगैरे. लाहोरमधल्या भयंकर वायुप्रदूषणला भारतच कारणीभूत आहे, या हास्यास्पद आरोपाचे पुरावे अर्थातच पाकिस्तानकडे नाहीत.
 
तसेही गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये भारताचे गुुन्हेगार शत्रू मोजून ठेचले गेले, त्या प्रत्येकवेळी पाकिस्तानी सरकार आणि माध्यमांनीही त्या हत्यांसाठी भारतालाच जबाबदार ठरवले. पण, या सगळ्या घटनांमध्येही पाकिस्तान भारताविरोधात एकही पुरावा देऊ शकला नाही.
 
सध्या ‘तहरीक-ए-तालिबान’ पाकिस्तान आणि ‘बलुच लिबरेशन आर्मी’ या दहशतवादी संघटना दररोज पाकिस्तानवर दहशतवादी हल्ले करत आहेत. यावर पाकिस्तानी मंत्री जियाउल्लाह लुंगाऊ याने पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, ’‘तहरीक-ए-तालिबान’ पाकिस्तान संघटनेचे ध्येय आहे, पाकिस्तान पूर्णत: इस्लाममय व्हावा आणि ‘बलुच लिबरेशन आर्मी’चे ध्येय आहे की, पाकिस्तानपासून बलुचिस्तानने वेगळे व्हावे. अशा परस्पर विरोधी विचारांच्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करताना एकत्र कशा येतात? भारतानेच या संघटनांना एकत्र आणले आणि त्यांना मदत करत आहे.” काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये ‘हमास’चा नेता इस्माईल हानिया याची हत्या झाली. यावर पाकिस्तानी माजी राजदूत अब्दुल बासित याने म्हटले, ‘’हानियाच्या हत्येत भारताने इस्रायलला नक्कीच मदत केली आहे.” तसेच, पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात नेमके पाकिस्तानमधले चिनी नागरिक मरू लागले. चीनने याबाबत पाकिस्तानला धारेवर धरले. यावर पाकिस्तानी उपप्रधानमंत्री इशाक डार याचे म्हणणे, “पाकिस्तान आणि चीनमध्ये वैमनस्य निर्माण व्हावे म्हणून काही लोक पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले करत आहेत.” इशाक डारने इशार्‍याने भारतावर आरोप केले.
 
इतकेच काय? ‘पाकिस्तानी अंडरवर्ल्ड डॉन’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी अमिर तांबावर २०२४ साली मास्क लावलेल्या दोन व्यक्तींनी हल्ला केला. त्यात तो तडफडून मेला. त्याची हत्यासुद्धा भारतानेच घडवून आणली असे पाकिस्तानचे म्हणणे. अमिरचे काय तर? २०१३ साली दहशतवादी अफजल गुरूला फाशी झाली. त्यानंतर लगेचच पाकिस्तानच्या तुरूंगात १९९० सालापासून कैद असलेल्या सरबजित सिंग यांच्यावर तुरूंगातच हल्ला झाला. त्यात ते मृत्यू पावले. सरबजित सिंग यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख होता, अमिर तांबा आणि त्याचा सहकारी मुद्दसर. पाकिस्तानी न्यायालयाने पुराव्या अभावी या दोघांचीही निर्दोष म्हणून सुटका केली. मात्र, सुटका झाल्यावर अमिर तांबा सहजगत्या मारला गेला.
 
तर, पाकिस्तान असे विनाकारण भारतावर आरोप करतो. या पार्श्वभूमीवर वाटते की, २०१४ सालापूर्वी पाकिस्तानने भारतात हिंसेचा धुमाकूळ घातला होता. पण, आता काळाची चक्र फिरली. केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात सरकार बदलले. देशनिष्ठ सरकार आले आणि त्यानंतर पाकिस्तानचे दुर्देवी दिन सुरू झाले, असे दिसू लागले. धर्मांध मुघलांच्या सैन्याला जळीस्थळी छत्रपती शिवरायांचे धर्मनिष्ठ मावळे दिसावेत, तसे पाकिस्तानला सगळ्या घटनेत भारताचाच हात आहे असे वाटते. २०१४ सालानंतरची ही भारताची वास्तव प्रतिमा, पाकिस्तानला धडकी भरवते. मात्र, भारतीयांना नक्कीच अभिमानास्पद आहे. पाकिस्तानी ‘ग्रीन लॉकडाऊन’ निमित्त इतकेच!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.