अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असून निकालही लवकरच समोर येतील. पण, यंदाच्या अमेरिकन निवडणुकीचे एक वैशिष्ट्य ठरले ते उद्योजक एलॉन मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला जाहीर पाठिंबा आणि त्यांच्या समर्थनासाठी ऑनलाईन-ऑफलाईन सक्रिय केलेली यंत्रणा. तेव्हा, मस्क यांची भूमिका आणि अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचार आणि निकालानंतरचे परिणाम यांचा उहापोह करणारा हा लेख...
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल काही तासांवर आले आहेत. असे म्हटले जात आहे की, हे निकाल आजवर कधी झाले नाहीत इतके चुरशीचे असतील. अमेरिकेत राज्यांच्या लोकसंख्येनुसार त्या त्या राज्यांतून लोकप्रतिनिधी निवडले जातात. ५० राज्ये आणि राजधानीचे वॉशिंग्टन शहर ज्यात येते तो कोलंबिया जिल्हा, यामध्ये मिळून ५३८ प्रतिनिधी असून, त्यापैकी २७० लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असलेला उमेदवार अध्यक्ष होतो. लोकांनी पक्षांना मतदान करणे आणि त्या-त्या राज्यात जो पक्ष विजयी होतो, त्याच्या प्रतिनिधींनी त्या पक्षाच्या अध्यक्षपदाला पाठिंबा देणे ही प्रक्रिया काही आठवडे चालणार असली, तरी निकालांचा कल एका दिवसात समोर येईल. अमेरिकेत बहुतांश जनमत चाचण्या डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात बरोबरी असल्याचे दाखवत असून मिशिगन, पेन्सिल्वानिया, एरिझोना, नेवाडा, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना ही राज्ये कोण विजयी होणार ते ठरवणार आहेत. या राज्यांमध्ये मिळून ९३ मते आहेत. त्यांच्यातही ट्रम्प आणि कमला यांच्या मतांमधील फरक एक टक्क्यांहूनही कमी आहे.
या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रम्प यांच्या खालोखाल सर्वाधिक चर्चा सुप्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्या एलॉन मस्क यांची आहे. ‘टेस्ला’ वाहन कंपनी, ‘स्पेस एक्स’ ही खासगी अवकाश कंपनी, ‘स्टार लिंक’ ही उपग्रहाद्वारे इंटरनेट पुरवणार्या कंपनीसोबतच मस्क आता ‘एक्स’ या नावाने ओळखल्या जाणार्या ‘ट्विटर’चेही मालक आहेत. ऑक्टोबर २०२२ साली मस्क यांनी ‘ट्विटर’ ४४ अब्ज डॉलर्सला विकत घेतले. मस्कने ‘ट्विटर’मधील ८० टक्के कर्मचार्यांना कामावरुन काढण्यात येऊनही ते चालू राहिले, या गोष्टीचे कौतुक झाले असले तरी या वर्षाच्या सुरूवातीला ‘ट्विटर’चे मूल्य विकत घेतल्याच्या किमतीपेक्षा ७० टक्के खाली घसरुन १५ अब्ज डॉलर्सच्या आसपास होते. त्यामुळे मस्कचा निर्णय थट्टेचा विषय झाला होता. जर या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला, तर त्यामध्ये ट्विटरचा मोठा वाटा असेल. मूळचे डावे उदारमतवादी असलेले एलॉन मस्क उजव्या विचारसरणीचे ध्वजवाहक कसे झाले, ही कथा अत्यंत रंजक आहे. ते स्वतःला ‘सत्याचे संरक्षक’ म्हणतात. त्यांनी ‘ट्विटर’ विकत घेतल्यापासून ‘ट्विटर’ने वंश, धर्म, राजकीय विचारधारा इ. आधारांवर मजकूराला कात्री लावणे मोठ्या प्रमाणावर कमी झाले असले, तरी अमेरिका आणि युरोपबाहेरच्या जगात तेथील लोकनियुक्त शासनव्यवस्थेने उपद्रवमूल्य असलेल्या ट्विट किंवा खातेधारकांबद्दल घेतलेल्या आक्षेपांचे त्यांचे समाधान होईल, अशा पद्धतीने निराकारण केले जाते. त्यासाठी मस्क यांना डाव्या-उदारमतवादी वर्गाची टीका ही सहन करावी लागली आहे.
मस्क जसे जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत, तसेच ‘ट्विटर’वर सगळ्यात लोकप्रिय व्यक्तीही आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या नरेंद्र मोदींच्या दुप्पट म्हणजे तब्बल २० कोटी इतकी आहे. या निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ तीन हजारांहून जास्त ट्विट केली असून, त्यांच्या प्रचारासाठी १०० कोटी रुपयांच्या देणग्याही दिल्या आहेत.
अमेरिकेतील निवडणुकांचे तंत्र गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये अत्यंत विकसित झालेले आहे. त्यामध्ये मतदारांची राज्य, वर्ण, लिंग, वय, विचारधारा अशा डझनावरी निकषांवर विभागणी करुन त्यांना भावेल अशा पद्धतीने साद घातली जाते. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोडीला भाडोत्री प्रचार यंत्रणाही प्रचारासाठी राबविली जाते. अमेरिकेत केवळ मतदार म्हणून नोंदणी केलेले नागरिकच मतदान करु शकतात. नागरिक स्वतःहून नोंदणी करु शकत असले, तरी दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहिमा राबवण्यात येतात. अमेरिकेतील काही मतदार दोन्हींपैकी एकाही राजकीय पक्षाशी संलग्न न राहता, स्वतंत्र बुद्धीने मतदान करतात. मतदानापूर्वीचे काही आठवडे अध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार या कुंपणावर बसलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करतात. याबाबत एलॉन मस्क यांनी वेगळी रणनीती वापरली.
‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, आजवर रिपब्लिकन पक्षाचे नेते मतदानाच्या दिवसापूर्वी किंवा ‘पोस्टल बॅलेट’द्वारे मतदान करणार्या मतदारांवर सडकून टीका करायचे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश होता. रिपब्लिकन पक्षात मतदानाच्या दिवशी रांगेत उभे राहून मतदान करणे हे देशभक्तीशी जोडले जात असे. पण, एलॉन मस्कने जास्तीत जास्त मतदारांनी पक्षाला मतदान करावे यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना आपली भूमिका बदलण्यास भाग पाडले. यावर्षी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षाशी संबंधित संघटनांना मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निधी संकलनाची मुभा दिली. असे म्हटले जाते की, एलॉन मस्क यांच्या ‘अमेरिका पॉलिटिकल अॅक्शन कमिटी’ने ज्या राज्यांमध्ये अटीतटीच्या लढती आहेत, तिथे ट्रम्प यांच्यासाठी सुमारे आठ ते दहा लाख मतदारांची नोंदणी केली. त्यासाठी चार कंपन्या स्थापन करण्यात आल्या. २ हजार, ५०० पगारी प्रचारक नेमण्यात आले. प्रत्येकाला दररोज १५० घरांपर्यंत जाण्याचे लक्ष्य देण्यात आले. कमला हॅरिस यांची प्रचारयंत्रणा पगारी प्रचारकांचा वापर करत असली, तरी एलॉन मस्क यांच्या यंत्रणेइतकी कार्यक्षमता त्यांच्यात नव्हती. मस्क यांच्यापाठोपाठ आणखी धनाढ्य उद्योगपतींनी ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेला पैसे पुरवायला सुरूवात केली. कमला हॅरिस यांचे नाव अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पुढे आल्यानंतर त्यांनी निधी संकलनाच्या बाबतीत ट्रम्प यांच्यावर चांगलीच आघाडी घेतली होती. त्यांनी ट्रम्प यांच्या दुप्पट म्हणजे एक अब्ज डॉलरहून अधिक निधी मिळवला. गेल्या दोन महिन्यांत कमला हॅरिस यांनी आघाडीच्या वृत्तसमूहांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला. ‘फॉक्स’ ही अमेरिकेतील सगळ्यात लोकप्रिय वाहिनी वगळता जवळपास सगळ्या वाहिन्या आणि वर्तमानपत्रे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात आहेत. त्यातून कमला हॅरिस यांच्या मर्यादा अधिक प्रकर्षाने जाणवू लागल्या होत्या. अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील माध्यमे एकतर्फी कमला हॅरिस यांच्या बाजूने झुकली असताना एलॉन मस्क आणि ‘फॉक्स’ वाहिनीने त्यात समतोल आणला. ‘ट्विटर’ हे माध्यम म्हणून अजूनही तटस्थ असले, तरी ट्रम्प समर्थकांनी माध्यमांऐवजी त्याला किंवा ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या समाज माध्यमाला पसंती दिली. अध्यक्षपदाची लढाई मस्क यांच्यामुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेचाही विषय बनली. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे मालक असलेले उद्योगपती जेफ बेझोस यांनी आपल्याच वर्तमानपत्राचे अध्यक्षपदाच्या उमेदवाराला उघड पाठिंबा देण्याचे धोरण बदलले. त्यासाठी त्यांनी माध्यमांची विश्वासार्हता कमी झाल्याचे सांगितले.
या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला, तर एलॉन मस्क त्यांच्या खालोखाल अमेरिकेतील सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती बनतील. असे म्हटले जात आहे की, जर ट्रम्प निवडून आले, तर एलॉन मस्क यांना सरकारी यंत्रणांची कार्यक्षमता वाढवण्याच्या आयोगाचे अध्यक्षपद देतील. मस्क यांनी “आपण अमेरिकेतल्या करदात्यांचे किमान दोन लाख कोटी डॉलर्स वाचवू,” याची ग्वाही दिली आहे. जर ट्रम्प यांचा विजय झाला, तर अमेरिकेतल्या उद्योजकांची आणि त्यातही तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांच्या राजकारणातील ढवळाढवळीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येणार आहे. यापूर्वीही तंत्रज्ञान कंपन्यांचा राजकारणाबद्दलचा दृष्टिक्षेप निष्पक्ष नव्हता. जगाच्या पाठीवर इतरत्र हुकुमशहांना तसेच लोकशाहीची गळचेपी करणार्या राजवटींना मानाचे स्थान देणार्या समाजमाध्यम कंपन्यांनी दि. ६ जानेवारी २०२१ रोजी ‘कॅपिटॉल हिल’वर झालेल्या हिंसक आंदोलनाचे निमित्त बनवून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी लादली. तेव्हा या कंपन्यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाची भूमिका मांडली होती. ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवल्यावर त्यांनी एक एक करुन ही स्वघोषित बंदी मागे घेतली. एलॉन मस्कनी उघड उघड ट्रम्प यांची बाजू घेतल्याने समाजमाध्यमांतही दरी निर्माण झाली आहे. या निवडणुकांचे निकाल माध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये कोणाचे महत्त्व जास्त आहे, ते अधोरेखित करणार आहेत.
अनय जोगळेकर